|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दक्षिण गोव्यात वीज सुधारणेसाठी शंभर कोटी

दक्षिण गोव्यात वीज सुधारणेसाठी शंभर कोटी 

प्रतिनिधी/ पणजी

दक्षिण गोवा जिल्ह्य़ात सुमारे 18 तास वीज नसल्याने आणि तेथे विजेची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे धारबांदोडा येथून पश्चिम ग्रीडमार्फत तेथे वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. त्याकरिता फोंडा ते शेल्डे अशी 220 केव्ही वीजवाहिनी ओढण्यात येणार असून या सर्व कामासाठी रु. 100 कोटी एवढा अंदाजे खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच 11 केव्ही आणि 33 केव्ही या खांबावरून जाणाऱया प्रमुख वीजवाहिन्या भूमिगत करण्याचाही प्रस्ताव असून वीजपुरवठा सुरळीत-सुधारणा करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे तसेच अडवणूक करू नये, असे आवाहन काब्राल यांनी केले आहे.

… तर दक्षिण गोवा बनतोय हतबल

पणजी येथील विद्युत भवनात काल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी  वरील माहिती दिली. गोव्यासाठी पश्चिम आणि दक्षिण ग्रीडमधून वीज आणून ती पुरवावी लागते. तेथून येणारी वीजच जर खंडित झाली तर वीजखाते काहीच करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पश्चिम ग्रीडमधून 500 मेगा वॅट वीज मिळते आणि ती उत्तर गोव्यामध्ये पुरवली जाते. दक्षिण ग्रीडमधून 90 मेगा वॅट वीज येते ती दक्षिण गोव्याला देण्यात येते अशी माहिती त्यांनी दिली.

कर्नाटकात वीज वाहिनीची देखभाल कमी

दक्षिण गोव्यात पुरवली जाणारी वीज कर्नाटकातून जंगली भागातून येते आणि तो मार्ग सुमारे 80 कि. मी. आहे. गोव्यातील 40 कि. मी. मार्गाच्या वीजवाहिनीची देखभाल राज्याचे वीजखाते करते तर कर्नाटकातील 40 कि. मी. मार्गाची देखभाल त्यांचे वीजखाते करते. गेल्या सहा महिन्यातील सर्वेक्षणानुसार दक्षिण गोव्यात एकूण 90 वेळा विविध कारणांनी वीज खंडित झाली. त्यातील 83 कारणे कर्नाटकातील होती तर 7 कारणे गोव्यातील होती.

वीज चालू करण्यासाठी युद्धपातळीवर

सध्या त्या वीजवाहिनीतून मिळणारी वीज बंद असून ती चालू करण्यासाठी युद्धपातळीवर    प्रयत्न चालू आहेत. वारंवार उद्भवणारी ही समस्या कायमची सोडवण्यासाठी आता पश्चिम ग्रीडमधून दक्षिण गोव्याला वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम ग्रीडमधून येणाऱया विजेत फारशी समस्या उद्भवत नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

गोव्यातच अजूनही वीज स्वस्तच

इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात ग्राहकांना कमी दरात वीज देण्यात येते. इतर राज्यात प्रती युनिट रु. 3 ते 4 असा दर असून गोव्यात मात्र तो दर रु. 1.40 असल्याचा दावा त्यांनी केला. गोव्यात वीज पुरेशी असून ती वितरीत तसेच पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती साधनसुविधा उभारण्याची गरज आहे. 

सुधारणांसाठी लोकांनी सहकार्य करावे

वीज कंडक्टर्स, ट्रान्सफॉर्मर बदलणे तसेच काही नवीन वीज उपकेंद्र उभारणे असे विविध प्रस्ताव असून ते बदल झाल्यावर 24 तास अखंड वीज पुरवठा होऊ शकेल, अशी आशा त्यांनी प्रकट केली. वीज घरापर्यंत पोहोचावी म्हणून वीजखांब, कंडक्टर्स, ट्रान्सफॉर्मर हे योग्य त्या ठिकाणी जमिनीत उभारावे लागतात. तेथे अनेकजण विरोध करतात त्यामुळे समस्या निर्माण होते असे श्री. काब्राल यांनी निदर्शनास आणले. गोव्यातील लोकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना अखंडित वीज मिळावी म्हणून वीजखाते प्रयत्नशील असल्याची ग्वाही काब्राल यांनी दिली.