|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रश्न आरोग्याचा मनाच्या, शरीराच्या!

प्रश्न आरोग्याचा मनाच्या, शरीराच्या! 

तुमच्या समोर आलेली व्यक्ती दिसायला धडधाकट आहे, म्हणून ती निरोगी आहे असे तुम्ही खात्रीने सांगू शकता का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे द्यायला कोणीच तयार होणार नाही. ‘दिसते तसे नसते’ या न्यायाने वरवर ‘छानपैकी तब्येती’चा दिसणारा मनुष्य-स्त्राr अथवा पुरुष खरोखरच तसा असेल असे नाही. थोडे वेगळय़ा शब्दात सांगायचे तर कित्येक आशियाई आणि आफ्रिकी देशात तुम्हाला फेरफटका मारताना दर चार व्यक्तींनंतर भेटणारी पाचवी व्यक्ती मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ असू शकते. हो ना! कदाचित ती वेडीही असू शकते!

‘लॅन्सेट’ या ब्रिटनमधल्या नामांकित वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका विस्तृत विश्लेषणावरून हे स्पष्ट झाले आहे आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (WHO) या गोष्टीची दखल घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याचा प्रारंभ केला आहे. संघर्षग्रस्त देशांमधील विविध विकारांनी त्रस्त असलेल्या लक्षावधी रुग्णांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून तयार झालेल्या एक दोन नव्हे, तब्बल 129 अहवालांची नीट छाननी आणि विश्लेषण करून काढलेल्या निष्कर्षाद्वारे ‘लॅन्सेट’ करिता फियोना कार्लसन यांच्या नेतृत्वाखालील विद्वानांच्या एका पथकाने हा सविस्तर लेख लिहिला आहे. याकरिता माहितीचा जो तपशील वापरला आहे तो देखील तात्पुरत्या किंवा जाता येता गोळा केलेल्या माहितीवर आधारलेला नाही तर 1980 ते 2017 या 37 वर्षांच्या प्रदीर्घ काळातील नानाप्रकारच्या माहितीच्या आधारे संकलित केलेला आहे. जगातील 39 देशातील रुग्णांची ही माहिती आहे.

युद्धे, यादवी, उपासमार, युद्धजन्य परिस्थितीमुळे वाटय़ाला आलेले अत्याचार, दारिद्रय़, स्थलांतर, बेकारी, अपंगत्व, विकलांगता, एकाकीपण अशा विविध कारणांमुळे ज्यांच्या मानसिक अवस्थेत कमालीची अस्वस्थता उद्भवली आहे, अशी फार मोठी जनसंख्या ‘संघर्ष-ग्रस्त भूप्रदेशा’त राहते. हे सगळे भूप्रदेश आशिया (प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय), जवळ जवळ सगळे उत्तर आफ्रिकी देश, पूर्व युरोपिय आणि बाल्कन देश आणि लॅटिन, अमेरिकेतील देश यांनी व्यापलेले आहेत. यात पश्चिम आशियातील पर्वतमय (अफगाणिस्तान वगैरे) आणि तेलसमृद्ध आखाती देशाचाही समावेश आहे. या ‘संघर्ष-ग्रस्त’ भूप्रदेशात कोणत्या ना कोणत्या मानसिक विकाराने अथवा तणावाने पछाडलेल्या माणसांचे तेथील एकूण लोकसंख्येत 22 टक्के एवढे प्रमाण आहे म्हणजे एक पंचमांशाहून थोडे जास्तच!

‘लॅन्सेट’मधील लेखात या मानसिक विकारग्रस्तांची वर्गवार माहिती दिली आहे. यांचे सौम्य, मध्यम आणि तीव्र असे तीन वर्ग पाडले आहेत, त्यामध्ये तीव्र विकारग्रस्त आणि सौम्य विकारग्रस्तांपेक्षा मध्यम विकारग्रस्तांची संख्या जास्त आहे. शिवाय या सगळय़ांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे दु:खाच्या खाईत लोटले गेलेले आणि अलीकडेच बोकाळलेल्या ‘एबोला’सारख्या रोगाच्या साथीमुळे यातना भोगाव्या लागून विफल झालेले असे लोक समाविष्ट केलेले नाहीत. तरीही ‘संघर्षग्रस्त’ भूप्रदेशातील या 22 टक्के विकारग्रस्तांचे एकूण जागतिक लोकसंख्येत 12 टक्के एवढे प्रमाण आहे. याचा अर्थ जगात कोठेतरी तुम्हाला भेटलेल्या अकरा व्यक्ती खरोखरच निरोगी असतील तर त्यानंतर भेटणारी बारावी (स्त्री अथवा पुरुष) व्यक्ती अर्धवट, विमनस्क, भयग्रस्त, शीघ्रकोपी, बडबडी, अत्यंत अबोल, शून्यात नजर लावलेली अथवा ठार वेडी असू शकते.

हे झाले विशिष्ट भूप्रदेशात मनोविकारांनी ग्रासलेल्या विशिष्ट परिस्थितीतील लोकांचे. ही मंडळी विशिष्ट परिस्थितीत किती काळ जगत आहेत तर दुसऱया महायुद्धानंतरची जवळजवळ पाऊणशे वर्षे, एवढा प्रदीर्घ काळ विकसित राष्ट्रांना या परिस्थितीची थेट झळ पोहोचली नाही. ‘संघर्ष ग्रस्त’ भूप्रदेशांच्या यादीत इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया तीन या महासत्ता नाहीत, स्वित्झर्लंड, स्वीडन, डेन्मार्क नि कॅनडा यासारखे पर्यटनासाठी आकर्षक देश नाहीत, बऱयापैकी वंशविद्वेषाची लागण झालेला ऑस्ट्रेलिया नाही. किंबहुना भारतही या ‘संघर्षग्रस्तां’च्या प्रादेशिक यादीत नाही. फारतर काश्मीरचा अंशतः समावेश होईल.

असे असले तरी या समाविष्ट नसलेल्या देशातील जनतेचे आरोग्य (विशेषतः मानसिक आरोग्य) उत्तम आहे, अशातला भाग नाही, पण सध्या या मंडळींपुढे असलेला प्रश्न मानसिक आरोग्यापेक्षा शारीरिक आरोग्याच्या बाबतीत जास्त गंभीर आहे. ज्या देशांची अथवा भूप्रदेशांची गणना विकसित आणि आर्थिक पुढारलेपणाच्या गटातले म्हणून होते, तेथे नवसुबत्तेमुळे निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न आहेत. वरवर पाहता ते शारीरिक अनारोग्याचे विषय असले तरी त्यांची परिणती कालांतराने गंभीर मानसिक अस्वस्थतेत होणार आहे. याकरिता स्मृतिभ्रंश, चिंताक्रांतता अशा विकारांपासून सावध राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. शारीरिक सुदृढता टिकविण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करावा, पोषक आणि आरोग्यवर्धक आहार घ्यावा, धूम्रपान अथवा मद्यपान प्रमाणाबाहेर करू नये अशी सूचना करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या मनोविकारांचे अथवा त्यामुळे शरीरावर होणाऱया दुष्परिणामांचे बळी दरवषी दहा लाखांवर लोक जातात. पुढच्या तीस वर्षात ही संख्या तिप्पट होण्याची भीती आहे. जगभर पाच कोटीहून जास्त लोक अल्झायमर आणि अन्य तीव्र मनोविकारांनी ग्रस्त आहेत, त्यात प्रतिवषी एक कोटींची तरी भर पडत आहे. भवितव्यात काय वाढून ठेवले आहे पहा!

राजेंद्रप्रसाद मसुरकर,  9960245601

Related posts: