|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जगणे शतखंडित झाले

जगणे शतखंडित झाले 

कोणत्याही विचारशील कवीचे नाते हे समाजाशीच असते. तो स्वतःपुरता विचार करू शकत नाही. या जगात आपल्यापुरते काहीच नसते. त्यामुळे अर्थातच अशा घडामोडींचा त्याच्या जगण्यावर परिणाम होत असतो. खरेतर जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत राजकारण असतेच. स्वातंत्र्यानंतर देश प्रगतीपथावर जाण्यासाठी काही विशिष्ट राजकीय विचारसरणीने, मूल्यांनी देश घडविण्याचा प्रयत्न केला.

आजचे जगणे तुकडय़ा तुकडय़ाने माणूस जगत आहे. ते जगणे एकरेषीय नाही. त्यामुळे आपल्यावर कोसळणाऱया काळाचा एकच एक अर्थ आपण लावू शकत नाही. जगणे शतखंडित झाले आहे. त्यामुळे ढोबळपणे दिसणाऱया वास्तवाच्याही पलीकडे अनेक वास्तव आणि त्याचे अनेक स्तर-अतःस्तर असल्याचे दिसून येते. 90 नंतरच्या जगण्याचे नेमके असे वर्णन करताना आजच्या मराठी कवितेतही याचेच चित्र उमटताना दिसते. पण या शतखंडित जगण्याच्या मुळाशी जी कारणे आहेत त्याचा आपल्याला प्राधान्याने विचार करावा लागेल. याच काळाच्या प्रारंभा पासून देशात खुली अर्थव्यवस्था स्वीकारली गेली. जागतिकीकरण या गोंडस नावाखाली ही व्यवस्था स्वीकारताना त्याचा एकूणच जगण्यावर परिणाम काय होईल याचा विचार करण्यात आला नाही. अर्थात तसा विचार केला असता तरी अपरिहार्यपणे खुले अर्थ धोरण स्वीकारावेच लागले असते. मात्र तसे धोरण स्वीकारल्यामुळे माणूस दोन विभागात विभागला गेला. एक खालचा स्तर आणि दुसरा वरचा स्तर. या दोन्हा स्तराचा संघर्ष म्हणजेच गेल्या पंचवीस वर्षात झालेल्या घडामोडींचा परिपाक आहे. मग तो आर्थिक संघर्ष असेल, शिक्षणाच्या बाजारीकरणातून सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आलेला असेल, जातीय आणि धार्मिक संघर्ष, त्यातून निर्माण झालेल्या राजकीय दंगली, राजकारणाची मसल आणि मनी पॉवरच्या दिशेने झालेली वाटचाल किंवा भारतासारख्या पुरोगामी आणि शांतताप्रिय अशी जगभरात प्रतिमा असलेल्या देशात धार्मिक आणि जातीय उन्मादातून झालेले विचारवंतांचे खून. या सगळय़ाचा 90 नंतरच्या प्रमुख घडामोंडीमध्ये समावेश करावा लागेल. कोणत्याही विचारशील कवीचे नाते हे समाजाशीच असते. तो स्वतःपुरता विचार करू शकत नाही. या जगात आपल्यापुरते काहीच नसते. त्यामुळे अर्थातच अशा घडामोडींचा त्याच्या जगण्यावर परिणाम होत असतो. खरेतर जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत राजकारण असतेच. स्वातंत्र्यानंतर देशप्रगती पथावर जाण्यासाठी काही विशिष्ट राजकीय विचारसरणीने, मूल्यांनी देश घडविण्याचा प्रयत्न केला. त्या विचारसरणी, ती मूल्ये एकूण समाजासाठी लाभदायी ठरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्याच विचारसरणीतून नेतृत्वही जन्माला आले. पुढे या नेतृत्वाचा प्रभाव जनमानसावर झाला आणि समाजात एक राजकीय प्रगल्भताही निर्माण झाली. तोपर्यंत राजकारणाला काही एक नैतिकता आणि वैचारिक मूल्य प्राप्त झाले होते. परंतु पुढे कोणतीच राजकीय विचारधारा नसलेली माणसे राजकारणात स्थिरावू लागली आणि समाजातील एक विशिष्ट राजकीय धारा संपुष्टात आली. इथूनच राजकीय अराजकतेला प्रारंभ झाला. या अर्थाने राजकीय रूपकात्मक कविता लेखन होतानाही दिसते आहे. राजकीय अराजकतेच्या मुळांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे अशावेळी क्रमप्राप्त ठरते. मानवी मूल्यांच्या आधारावरच राजकारण करू पाहणारी विचारधारा आपल्याकडे क्षीण होत गेली आणि याच काळात धर्मनिष्ठ आणि त्यातून व्यक्तिनिष्ठ राजकारणाला प्रारंभ झाला. यामुळे बेसिक मानवी मूल्यांची विचारधारा अशा राजकारणाला नसल्याने कोणतीही विचारधारा नसलेला समूह या धर्मनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ राजकारणाच्या कळपात सहभागी होऊ लागला. असा समूह जेव्हा राजकारणात स्थिरावला, त्यातून समाज विध्वंसाकडे जाण्याच्या घटना घडल्या. याच काळात धर्माचे स्तोम माजू लागले. जात, धर्म घरात जपली जात होती. ती खुलीआम  चव्हाटय़ावर आली. ती सार्वजनिक होत समाजविघातक कृत्ये त्यातून घडू लागली. समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम धर्मनिष्ठ राजकारणातून होऊ लागले. यात मानवी मूल्याच्या आधारावर जो समूह जगत होता त्याचीच मानसिकता धर्मनिष्ठ बनविण्यात धर्मनिष्ठ राजकीय नेतृत्वाने पुढाकार घेतला आणि त्यात हे नेतृत्व यशस्वी झाले. यातून प्रारंभी राजकारण आणि त्यातून एकूण समाजव्यवस्थाच अराजकतेकडे जाण्यास प्रारंभ झाला. कोणतीही विचारधारा नसलेला माणूस राजकारणात स्थिरावला आणि राजकारणाची ‘मसल आणि मनी पॉवर’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली. पूर्वीचे राजकारण व्यक्तीकडून समष्टीकडे जात होते ते समाजाकडून व्यक्तीकडे जायला लागले. यातून सध्याचे राजकारण व्यक्तीनिष्ठ झाले. जेव्हा जेव्हा जी गोष्ट व्यक्तीनिष्ठ होते, तेव्हा तेव्हा समाज संकुचित होत असतो. संकुचित समाजातून मानवी मूल्यांना धोका पोहोचतो. आजचे राजकारण या पद्धतीने घडत असून आता पूर्वीपेक्षा अधिक याचे प्रतिबिंब मराठी कवितेत उमटताना दिसते. ती लिहिण्यामागे त्यांची विशिष्ट अशी भूमिका आहे. कवीनेच नाही तर कलावंताने आपण स्वतःला आपल्या कलेबाबतचे प्रश्न विचारायला हवेत. कवीची याबाबतची जबाबदारी अधिक आहे. कारण सगळय़ाच वाङ्मय प्रकारात कवितेला अधिक नैतिकतेचे अधिष्ठान आहे. आज सगळीकडेच चंगळवाद बोकाळला असताना अशा नैतिकतेच्या जबाबदारीने लिहिणे हे मूर्खपणाचे लक्षण असा मानणाराही कवींचाच एक वर्ग मराठीत आहे. असे कवी आपापले ‘गोत्र’ शोधत फिरत असतात. यापलीकडची कविता लिहिणाऱयाला आपल्या मानसिक जडण घडणीत बदल करावा लागतो. आज सगळीकडे आपल्या भवताली प्रचंड कोलाहल उभा आहे. पुढे काय घडेल हे आपल्याला सांगता येत नाही. माणसाचा माणसाशीच संवाद हरवत चाललेल्या आणि माणसापासून माणूसच दूर जाणाऱया या काळात माणसातल्या माणुसकीसाठी माणसातल्या माणसालाच शोधावे लागत आहे. समकालीन कवीमित्र वीरधवल परब हा या संदर्भात आपल्या कवितांमधून सुरेख भाष्य करतो.

मी माणूस शोधण्यासाठी धडपडतो/तर तो कुठेच सापडत नाही, पुसटशी चाहू लागते की इथूनच आता सुरू होईल माणसांचा आवाज/हाकारे एकू येतील, एकमेकांत मिसळून गेलेल्या आदिम गीतांचे शब्द कानावर पडतील/गाईगुरांच्या शेणामातीचा दरवळ घेऊन गुराख्यांना मळवलेल्या पायवाटा दिसतील/ तर एकाएकी प्रचंड कोलाहलच उभा ठाकतो समोर/ माणसं दुर्मिळ होत जाण्याची ही वेळ फारच लवकर आलीय का आपल्या आयुष्यात?

बुद्धाची करुणा आणि यशूची वेदना आपल्या आत जपणारा एक चांगल्या कवींचा वर्ग माझ्या आजुबाजूला वावरत आहे. तो आपल्यातील संवेदनशीलता जपू पाहतो आहेच, परंतु समाजातील संवेदनशीलताही जपण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत आहे. आजच्या काळात एकूण समाजामधून आणि सर्वच प्रकारच्या बहुसंख्य कलावंतांमधून ही भावना नष्ट होत चालली असल्याचे वेगवेगळय़ा घडणाऱया सामाजिक घटनांमधून दिसून येते. पण आज ज्याप्रकारे समाज दुभंगत चालला आहे, त्यातून हा काळच समाज विघटनाचा काळ आहे असे वाटत राहते आणि त्यातून समाजातील संवदेनशीलता जपण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नही करायचे असतात. याच काळात खरेतर माणसाने सहृदयी असणे गरजेचे आहे. याचाच उद्गार कवीमित्र श्रीधर नांदेडकर यांच्या कवितेत उमटलेला दिसतो.

कुणाच्या सर्जनशील एकांतावर माझी सावली नको म्हणून तिकडे येणाऱया सगळय़ा गृहा मी मनाचा दगड करून बुजवून टाकीन सगळी कवाडे बंद करून मी सगळा अंधार सांभाळीन काचांचा खच तुडवीन तुमच्या यातनामय वेगवान शब्दांच्या आगीनगाडीला मी हिरवा झेंडा दाखवीन!

अजय कांडर