|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पोषण आहार स्वयंपाकी संघाचा आज मोर्चा

पोषण आहार स्वयंपाकी संघाचा आज मोर्चा 

प्रतिनिधी / ओरोस:

जि. प. च्या शिक्षण व वित्त विभागासह प्रशासकीय प्रमुख असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना बिलावर सह्या करण्यासाठी लागणारा एका मिनिटाचा वेळ मिळत नसल्यानेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाचे मानधन तीन-तीन महिने रखडत असल्याचा आरोप शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाच्या अध्यक्षा कमलताई परुळेकर यांनी केला आहे. या प्रशासकीय दिरंगाईच्या विरोधात 15 जून रोजी जि. प. भवनावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शालेय पोषण आहार स्वयंपाकींच्या मानधनात प्रशासनाकडून वारंवार दिरंगाई होते. यापूर्वीही याकडे अनेकवेळा लक्ष वेधण्यात आले. मात्र, तरीही यावेळी मार्च पासून मागील तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. शिक्षण विभाग, वित्त विभाग व मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना बिलांवर सह्या करण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप कमलताई परुळेकर यांनी केला आहे.

दरम्यान, शाळांना सुट्टी पडल्यानंतर शाळांकडे मानधन पाठविल्याने आणि सुट्टी कालावधीत शिक्षक सुट्टीवर असल्याने मार्चचे मानधन अडकून पडले आहे. भाजीपाला व इंधन बिले अद्याप पुण्यावरून आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अंगणवाडीप्रमाणेच जिल्हय़ाच्या सर्व तालुक्यातून स्वयंपाकींनी लवकरात लवकर शालेय पोषण आहार संघाकडे नोंदणी करावी. शासनावर दबावगट निर्माण करावा, असे आवाहन परुळेकर यांनी केले आहे.