|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ओटवणे येथे कालव्यात आढळली पाच फुटी मगर

ओटवणे येथे कालव्यात आढळली पाच फुटी मगर 

वार्ताहर / ओटवणे:

ओटवणे गावात भरवस्तीत तिलारी कालव्यात शुक्रवारी सकाळी मुक्त संचार करणाऱया पाच फुटी मगरीला ग्रामस्थांनी जेरबंद केले. या मगरीला वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले. वनखात्याने या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले.

ओटवणे येथील तिलारी कालवा पूर्ण क्षमतेने वाहन असून यात गेले दोन दिवस मगरीचा मुक्त संचार सुरू होता. अनेकांनी या मगरीला पाहिले होते. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जाधववाडी लगतच्या तिलारी कालव्यात ही मगर मुलांना दृष्टीस पडली. यावेळी मुलांनी केलेल्या आरडाओरडीमुळे ही मगर शेरवाळीवाडीच्या दिशेने कालव्यातून मार्गस्थ झाली. शेरवाळेवाडीतील कालव्यात येताच ही मगर पाहण्यासाठी बघ्याची मोठी गर्दी झाली.

या मगरीला अंकुश नाईक यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने जेरबंद करुन त्याची माहिती वनखात्याला दिली. यावेळी पोलीस पाटील शेखर गावकर, गजानन गावडे, गौरव गावडे, अकुंश वारंग, रमेश गावकर, मंदार नाईक आदी उपस्थित होते.

वनपाल चंद्रसेन धुरी, वनरक्षक ज्ञानेश्वर राठोड, वनमजुर श्री. काळसेकर, पुंडलिक गावडे घटनास्थळी दाखल झाले. वनखात्याच्या कर्मचाऱयांनी मगरीला ताब्यात घेत तिला नैसर्गिक अधिवासात सोडले.