|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदींनी पुन्हा पाकिस्तानला दहशतवादप्रश्नी सुनावले

मोदींनी पुन्हा पाकिस्तानला दहशतवादप्रश्नी सुनावले 

 • दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया राष्ट्रांची कोंडी करा : एससीओ परिषदेत मोदींची स्पष्टोक्ती
 • वृत्तसंस्था/ बिश्केक
 • किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे सुरु असणाऱया एससीओ परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले. दहशतवाद पोसणाऱया देशांची आर्थिक कोंडी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दहशतवाद ही सद्यस्थितीत मोठी समस्या आहे. त्याविरोधात मानवतावाद्यांनी सर्व सीमा ओलांडून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. दहशतवादाविरोधातील लढा अधिक मजबूत करण्यासाठी भारत पुढाकार घेत असून लवकरच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले
 • एससीओ परिषदेमध्ये मोदी यांनी दहशतवाद विरोधातील आणि पर्यायाने पाकिस्तानविरोधातील भूमिका अधिक स्पष्ट केली. दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले, गेल्याच आठवडय़ात श्रीलंका दौऱयावेळी दहशतवादाचा आणखी एक घृणास्पद चेहरा आपण पाहिला आहे. निरपराध आणि निष्पापांचा बळी घेणाऱया दहशतवादाला रोखण्यासाठी सर्व मानवतावादी देशांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. दहशतवाद पोसणाऱया देशांना अशा बाबींना जबाबदार ठरवण्याची वेळ आली आहे. याकरता एससीओच्या सदस्य देशांनी एकत्रित कृती कार्यक्रम आखण्याची गरज आहे. त्यासाठी परस्पर संपर्क आणि संवाद अत्यावश्यक असल्याचे मत मोदी यांनी मांडले.
 • जिनपिंग-मोदी भेटीमुळे बदलत्या राजकारणाची चाहूल
 • दरम्यान, गुरुवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय चर्चेमध्येही पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. पाकिस्तान आणि चीनमधील संबंधांच्या पार्श्वभूमीवर या मुद्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाचवेळी होऊ शकत नसल्याच्या मुद्यावर भारत ठाम असल्याचेही मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितले. यामुळे जिनपिंग यांनी भारत भेटीचे आमंत्रणही स्वीकारले असल्याने यापुढील सामरिक आणि राजकीय परिस्थिती बदलत असल्याचेही चित्र या भेटीमुळे समोर आले आहे.
 • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परिषदेपूर्वी पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत आणि पाकिस्तानचे सर्वच स्तरातील संबंध अतिशय नाजूक बनल्याचे मान्य केले. मोदी दुसऱयांदा बहुमताने निवडून आल्यामुळे काश्मीरसह सर्वच मुद्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. तर एससीओ परिषदेच्या निमित्ताने भारतासह सर्वच शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची पाकिस्तानला संधी असल्याचे मत मांडले होते. शांततापूर्ण तोडग्याकरता पाकिस्तान तयार असल्याचेही ते म्हणाले.
 • एससीओच्या घोषणापत्रात दहशतवादाच्या मुद्याला स्थान
 • भारतीय मुसद्देगिरीचे लक्षणीय यश
 • एससीओ परिषदेत भारताने दहशतवादाचा उपस्थित केलेला मुद्दा सर्वच सदस्य देशांनी एकमुखाने उचलून धरला. दहशतवादाला विरोध करण्याच्या भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून दहशतवाद मुक्तीचा मुद्दा एससीओच्या घोषणापत्रामध्येही ठळकपणे घेण्यात आला आहे. भारताच्या आधुनिक मुसद्देगिरीचे, ठाम भूमिकेचे आणि जागतिक राजकारणाच्या पटलावरील भारताचे महत्त्व यामुळे स्पष्ट झाले आहे. हा मुद्दा घोषणापत्रात घेणे हेही लक्षणीय यश असल्याचे मानले जात आहे.
 • इम्रान खान यांना एकाच दिवसात दोनवेळा टाळले
 • बिश्केकमधील एससीओ परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोनवेळा आमने-सामने आले. परंतु मोदी यांनी त्यांची साधी दखलही घेतली नाही. त्यांच्याशी बोलण्याची औपचारिकताही न दाखवता दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका परखडपणे अधोरेखित केली. किर्गिस्तानच्या राष्ट्रपतींच्या भोजनावेळी आणि परिषदेवेळी दोघेही समोरासमोर आले. परंतु मोदी यांनी इम्रान यांच्याकडे पाहिलेही नाही.