|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » म्हैसाळमध्ये दीड कोटीच्या मातीचे अवैध उत्खनन

म्हैसाळमध्ये दीड कोटीच्या मातीचे अवैध उत्खनन 

म्हैसाळ गावच्या हद्दीत जमीन मालक आणि वीटभट्टी चालक यांच्या संगनमताने गेली वर्षभर अवैधरित्या माती उत्खनन सुरू आहे. यामध्ये महसूल विभागाने निर्धारीत केलेल्या माती उत्खननापेक्षा कित्येक पट अधिक उत्खनन करण्यात आले आहे. सुमारे 1 कोटी 64 हजार रूपयांची 16 हजार 434 ब्रास माती काढण्यात आली आहे. या प्रकरणी चौघा जमीन मालकांसह 19 जणांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

गुन्हा नोंद झालेल्या मध्ये दादासाहेब बाबगोंडा पाटील, रावसाहेब बाबगोंडा पाटील, वसंत नरसाप्पा मगदूम, ( सर्व रा. अंकली), महेश दिनकर बोंद्रे ( रा. हरिपूर ) यांच्यासह.पुष्पराज केदारराव शिंदे, सुभाष बाबू बजंत्री, जयपाल शिवाप्पा कुंभार, शरद दादू वनमोरे, मनोहर दादू वनमोरे, कृष्णकांत प्रकाश चव्हाण, शांतीनाथ आप्पसो पाटील, ( सर्व रा. म्हैसाळ ),अनिल यदगोंडा, पाटील, सुरज श्रीधर कुंभार, जयगोंडा चुडगोंडा पाटील, जयेंद्र रविंद्र कुंभार (सर्व रा.अंकली), रविंद्र शालीवाहन कुंभार, सुनील शालीवाहन कुंभार, चंद्रकांत कृष्णा हुलवान ( सर्व रा. मिरज), झाकीर हुसेन बापूलाल वजीर, (वड्डी), अरविंद गोविंद तांबवेकर (हरिपूर) यांचा समावेश आहे.

म्हैसाळ गावच्या हद्दीत गट क्रमांक 1131, 1140, 1638, 1639, 1640 या जमिनी आहेत. या जमिनी दादासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, वसंत मगदूम, महेश बोंद्रे यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्याकडे माती उत्खननाचा परवाना आहे. त्यांना महसूल विभागाने 2018 मध्ये माती उत्खनन करण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी किती माती काढायची याची मोजणी निर्धारीत करून दिली होती.

मात्र, निर्धारीत माती उत्खनन झाल्यानंतरही या ठिकाणची माती काढण्यात आली. सुमारे एक कोटी, 64 लाख, 34 हजार रूपयांची 16 हजार, 434 ब्रास मातीचे अवैध उत्खनन करण्यात आले. महसूल विभागाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक माती त्यांनी काढली होती. ती वीटभट्टीचालकांना पुरवण्यात आली. ही बाब महसूल विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यांना बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे मंडल अधिकारी राजू जाधव यांनी संबंधीत 23 जणांवर ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौण खजिन उत्खनन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Related posts: