|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विधानसभेच्या वेळी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्या

विधानसभेच्या वेळी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्या 

प्रतिनिधी/ सोलापूर

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देशात भाजप सरकारच्या विरुध्द वातावरण असतानाही लोकसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला असल्याने   ई.व्ही.एम. मशीनबाबत संशय निर्माण झाला आहे. राज्याची विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असून त्या निवडणुकीत मतदान मतपत्रिकेद्वारे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. शुक्रवारी सोलापूर दौऱयावर खासदार भोसले आले होते. यावेळी प्रारंभी त्यांनी सिध्देश्वर महाराजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

खासदार भोसले म्हणाले, देशात लोकशाहीवरचा विश्वास दृढ करायचा असेल तर मतदारांचा ज्या ई.व्ही.एम. मशीनवर संशय आहे त्यात बदल करुन पूर्वीप्रमाणे मतदान पत्रिका छापून त्यावरच मतदान घ्यावे. देशात अनेक ठिकाणी ई.व्ही.एम. वर दाखवण्यात आलेले मतदान आणि प्रत्यक्ष झालेले मतदान यात तफावत असून भरवशाच्या उमेदवारांचेही मताधिक्य कमी झाले आहे. जगातील अनेक प्रगत राष्ट्रांनी ई.व्ही.एम.मशीन वापरणे बंद करुन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु भारतात ई.व्ही.एम. मशीनवरच मतदान होत आहे. येणाऱया विधानसभा निवडणुकीला ई.व्ही.एम. मशीनवर मतदान न होता छापील मतपत्रिकेत द्वारे मतदान घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

  राज्यात तीव्र दुष्काळ पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही    दुष्काळ होताच पण महाराजांनी नियोजन करुन दुष्काळावर मात केली होती.  परंतु आताच्या सरकारकडे दुष्काळाबाबत नियोजन दिसत नसून लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागल असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत असून यावर सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.