|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दोन कोटी रुपये खर्चून म्हापसा गांधीचौक ते देव बोडगेश्वर मंदिर दरम्यान सुशोभिकरण

दोन कोटी रुपये खर्चून म्हापसा गांधीचौक ते देव बोडगेश्वर मंदिर दरम्यान सुशोभिकरण 

 

प्रतिनिधी/ म्हापसा

गांधीचौक म्हापसा ते देव बोडगेश्वर मंदिर जवळील नालापर्यंत 14 व्या फायनेस 1920 चे 1 कोटी 85 लाख 91 हजार खर्चून सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या  नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत विविध विकासकामासंदर्भात व अन्य विषयावर गरमागरम चर्चा झाली. या बैठकीत म्हापशाचे नवनिर्वाचित युवा आमदार जोशुआ डिसोजा यांचा अभिनंदनपर ठराव सर्वानुमते घेण्यात आला. म्हापशाचा विकास पुढे नेण्यासाठी पुढील 50 वर्षांचा दूरदृष्टीकोन ठेवून व विकासकामे साधताना कोणताही भेदभाव न करता म्हापसा मतदार संघातील सर्व कामे पुढे न्यावी अशी मागणी हा ठराव मांडताना नगरसेवकांनी केली.

म्हापसा मतदार संघात 197 सिंगल सिटर शौचालये बसण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पालिकेसाठी नवीन 2 कंपेक्टर खरेदी करावा, नवीन कन्सलटन्टची नियुक्ती करावी. याबाबत निर्णय घेण्यात आले. 28 कामगार जे कामचुकारपणा करतात त्यांना काढून त्याजागी नवीन कामगारांची भरती करावी असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

पालिकेतील ग्रंथालय कलासंस्कृती खात्याकडे देणार

म्हापसा जुन्या पालिका इमारतीमध्ये असलेले ग्रंथालय कला आणि सांस्कृतिक खात्याकडे सुपूर्द करावे. हे ग्रंथालय मोफत त्यांच्याकडे देऊन ते या ग्रंथालयाची देखभाल करणार आहेत. जिल्हास्तरावर हे ग्रंथालय आता नव्याने हे खाते चालविणार आहे. या इमारतीत असलेले रेडक्रॉसचे कार्यालय अन्यत्र स्थलांतरीत करण्यात येणार आहे. असा निर्णयही झाला.

28 पालिका कर्मचाऱयांना काढणार

म्हापसा पालिका क्षेत्रात काम करणारे 28 कामगार गेल्या पाच महिन्यापासून कामावर येत नाही. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका मधुमिता नार्वेकर यांनी केली. हा प्रश्न इतर नगरसेवकांनी उचलून धरून हा प्रश्न गंभीर असून पालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन या सर्वांना काढून टाकावे अशी मागणी रोहन कवळेकर, तुषार टोपले, फ्रँकी कार्व्हालो, राजसिंग राणे व संदीप फळारी यांनी केल्यावर अखेर या 28 कामगारांना कमी करून त्याजागी अन्य नवीन 28 जणांची भरती करावी असा ठराव घेण्यात आला. अरवींद्र सातार्डेकर नामक कामगार तर पालिकेत कधीच येत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. याला सुपरवायझरही तितकाच जबाबदार असल्याचे सांगितले.

ज्यांच्या घरी कुत्रे आहे त्यांच्यासाठी प्रतिवर्ष रु. 100 कर आकारावा अशी मागणी नगरसेवक सुशआंत हरमलकर यांनी केली. यावर भटक्या कुत्र्यांचे काय? असा प्रश्न नगरसेवक अनंत (संजय) मिशाळ यांनी उपस्थित केला.

अभियंता तुकारामची बदलीची मागणी

म्हापसा पालिकेतील अभियंता तुकाराम एनजीओना घाबरून सर्वेक्षण वा तपासणी करण्यासाठी जाताना सोबत पोलीस घेऊन जातात विशेष म्हणजे नगरसेवकांच्या घरी जातानाही पोलीस पहारा नेण्यात येतो. ही हास्यस्पद गोष्ट असून नगरसेवकांनाही अभियंता घाबरतात काय असा प्रश्न नगरसेवक रोहन कवळेकर यांनी उपस्थित केला. इतका पगार घेऊनही ते काहीच करित नाहीत मग त्यांचा उपयोग काय? हे काम मार्केट निरीक्षकाकडे सोपवावे अशी मागणी त्यांनी नगराध्यक्षांकडे केली. व या अभियंत्याची अन्यत्र बदली करावी असा एकच जोर नगरसेवकांनी धरला. अखेर या अभियंत्यासाठी पुढील तीन महिन्यासाठी काम पाहावे अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

चालकांना प्रशिक्षण द्यावे

पालिकेसाठी नवीन जेसीबी मशीन खरेदी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. हे मशीन खरेदी करताना याकामी नवीन चालकाची नियुक्ती करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. यावर चर्चा होऊन तिघा चालकांना याकामी प्रशिक्षण द्यावे अशी मागणी नगरसेवक तुषार टोपले, संदीप फळारी, मार्टीन कारास्को यांनी केली. म्हापसा पालिकेच्या गॅरेज ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी सरकारकडून 20 लाख रुपये आले आहे. ती इमारत उभारण्याचे काम त्वरित हाती घ्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हाऊसिंगबोड गाळय़ावर कारवाईची मागणी

म्हापसा हाऊसिंगबोर्ड येथे रस्त्याच्या बाजूला दोन्ही ठिकाणी ये-जा करताना कोमुनिदादच्या जागेत गाळे उभारण्यात आले आहे असा प्रश्न नगरसेवक रोहन कवळेकर यांनी उपस्थित करून याकडे कोणतेही ट्रेड लायसन्स नाही. हेल्थ कडून नाहरकत दाखला घेऊन ते वीज घेतात. येथे मटन शॉप पासून सर्व गाळे उभारण्यात आले आहे. पालिकेला त्याचा काहीच फायदा नाही असा आरोप कवळेकर यांनी करून हे गाळे जमिनदोस्त करावे अशी मागणी यावेळी अन्य नगरसेवकांनी केली असता यावर बरीच चर्चा झाली. या सर्व गाळय़ांची तपासणी करावी अशी मागणीही यावेळी झाली. ही तपासणी करताना कोणताही भेदभाव करू नये अशी मागणी नगरसेवकांनी केली.

दरम्यान पालिकेत बायोडिझास्टर समिती नेमण्यात आली. त्यात नगराध्यक्ष रायन ब्रागांझा- अध्यक्ष, मुख्याधिकारी-क्लेन मदेरा, दिप्ती लांजेकर, कविता आर्लेकर, सुधीर कांदोळकर तसेच नागरिक किरण शिरोडकर व संदीप आजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

जोशुआ डिसोजावर अभिनंदनाचा वर्षाव

म्हापसा मतदार संघात नव्याने निवडून आलेले युवा आमदार जोशुआ डिसोजा यांच्यावर यावेळी अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी या ठरावावर बोलताना फ्रँकी कार्व्हालो, अनंत (संजय) मिशाळ, संदीप फळारी, राजसिंग राणे, तुषार टोपले, रोहन कवळेकर, सुधीर कांदोळकर, रायन ब्रागांझा यांनी अभिनंदन केले. जोशुआ हे युवा आमदार असून पुढील 30 वर्षांचा दूरदृष्टीकोन ठेवून  म्हापसावासियांनी त्यांना निवडून दिले आहे. त्यांच्याकडून म्हापसावासियांसाठी खूप अपेक्षा आहेत. म्हापसा बसस्थानक, रवींद्र भवन यांच्यासह अनेक गोष्टी अद्याप पडून आहेत त्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. म्हापशाचा विकास साधताना कोणताही भेदभाव करू नये. म्हापशाचा विकासावर विश्वास ठेवून कामे करीत राहावी. असे आवाहन यावेळी नगरसेवकांनी केले.

स्व. पर्रीकरांना श्रद्धांजली

गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी राज्यासाठी खूप काही केले. देशाचे संरक्षणमंत्रीपदी त्यांनी मजल मारली. म्हापशाच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी केलेले सर्जीकल स्ट्राईक कधीही न विसरणारे आहे. त्यांची आठवण तमाम गोमंतकीयांना सदैव राहील अशा शब्दात त्यांना नगरसेवक संदीप फळारी यांनी श्रद्धांजली वाहिली.

Related posts: