|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करा-नागरिकांची मागणी

फोंडा तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करा-नागरिकांची मागणी 

प्रतिनिधी/ फोंडा

फेंडा तालुक्यातील पंचायत क्षेत्रात वारंवार वीजेच्या लंपडावाच्या तक्रारीसाठी येथील ग्रामस्थांनी पंचसदस्यासह कुर्टी फोंडा येथील वीज अभियंत्याला काल शुक्रवारी घेराव घातला. यावेळी जाब विचारताना वारंवार खंडित होणाऱया वीज प्रावाहाचे तसेच यासंबंधी तक्रारींचे निवारण करताना वीज कर्मचाऱयांचे अरेरावीची भाषा यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी वाडी तळावलीचे सरपंच दिलेश गावकर, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, रामचंद्र नाईक, मनोज बोरकर, जि.प.सदस्य मोहन वेरेकर, बबिता गावकर, मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर आदी उपस्थित होते. फोंडय़ातील बहुतेक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कवळे, उंडिर, नागेशी, बेतोडा निरंकाल, तोर्ल शिरोडा, मंगेशी, म्हार्दोळ, प्रियोळ, आर्ल केरी, कुर्टी खांडेपार आदी भागांचा समावेश आहे.  गेल्या काही महिन्यापासून वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारात रात्री काढाव्या लागत आहेत. खंडित विजेमागील नेमके कारणही वीज खात्याने स्पष्ट केलेले नाही तसेच यासंबंधी तक्रार केल्यास वीज कर्मचारी अरेरावीची भाषा बोलतात. तसेच अभियंतेही अशा प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. गेल्या दोन महिन्यांपासून या भागात सतत विजेचा लंपडाव सुरु असून गेल्या दोन दिवसांमध्ये तर वीज प्रवाह पूर्णपणे खंडित झालेला आहे याचे मुख्य कारण फोंडा तालुक्याचा वीज प्रवाह दक्षिण गोव्य़ासाठी वळविण्यात आल्याचा ग्रामस्थांना समज आहे.

खंडित वीज प्रवाहामुळे पाणी प्रकल्पावरही परिणाम

राज्यातील फोंडा व तिसवाडी तालुक्याला पाणी पुरवठा करणारा ओपा जलशुद्धिकरण प्रकल्पालाही वारंवार होणाऱया खंडित वीज प्रवाहामुळे बंद पडत असल्याच्या तक्रारी आहेत. फोंडा तालुक्यातील वीज प्रवाह दक्षिण गोव्यात वळविण्यात असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. फोंडा तालुक्यातील वजनदार लोकप्रतिधीनीचे स्थान डळमळीत झाल्याने वीज पुरवठा खंडित, पाणी समस्या व अन्य समस्या एकदम उफाळून येत असल्याची चर्चाही फोंडयातील काही सुज्ञ नागरिक करताना दिसतात.

वीज कर्मचाऱयांची कमतरता-अभियंता सुनिल वाडेकर

  वीज अभियंते सुनिल वाडेकर यांच्यांशी माहिती जाणून घेताना वीज पुरवठा दुसरीकडे वळविण्यात आलेला नसून तो केवळ नागरिकांनी करून घेतलेला गैरसमज असल्याचे त्यांनी सांगितले. फोंडय़ातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार काही तांत्रिक तसेच पुरेश्या वीज कर्मचाऱयाच्या अभावामुळे झालेला आहे. येत्या काही दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फोंडा शहराचा व्याप जास्त असून वीज ग्राहक सुमारे 75 हजार आहेत त्यांना सेवा देण्यासाठी लाईनमॅन, असिस्टंड लाईनमनची कमतरता भासत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Related posts: