|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बिहारमध्ये मेंदूज्वर बळींची संख्या 93 वर

बिहारमध्ये मेंदूज्वर बळींची संख्या 93 वर 

बिहारमधील आरोग्य संकट कायम : केंद्रीय मंत्र्यांनी घेतला आढावा

वृत्तसंस्था/  मुजफ्फरपूर

बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्हय़ात मेंदूज्वराने मृत्युमुखी पडणाऱया मुलांची संख्या वाढतच चालली आहे. या आजाराने शनिवारी रात्रीपर्यंत 80 मुलांना जीव गमवावा लागला होता, तर रविवारी आणखीन 13 मुलांनी अखेरचा श्वास घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे स्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले असतानाच 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. अक्यूट इंसेफलायटिस सिंड्रोम (एईएस) ने पीडित रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे.

हर्षवर्धन यांनी श्री कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा दौरा करत डॉक्टरांशी चर्चा केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी आणखीन तीन मुलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी दिली आहे. तर बिहार सरकारमधील मंत्री सुरेश शर्मा यांनी आजार रोखण्यासाठी काम सुरू असल्याचे सांगत औषधांचा तुटवडा नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

तज्ञांचे पथक दाखल

सातत्याने होत असलेल्या मृत्युंच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आरोग्य तज्ञांचे पथक मुजफ्फरपूरमध्ये पोहोचले आहे. संबंधित भागातील उष्मालाटेमुळे हायपोग्लायसीमियाने (शरीरातील रक्तशर्करा अचानक घटणे) लोकांचा मृत्यू होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे. रुग्णालयात दररोज मुलं मरत असूनही तेथे सुविधांचा मोठा अभाव असल्याचा आरोप रुग्णांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मेंदूज्वराच्या प्रकोपाबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चिंता व्यक्त केली असली तरीही अद्याप त्यांनी मुजफ्फरपूरचा दौरा न केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. उष्मालाटेमुळे लोकांचा मृत्यू होणे अत्यंत दुदैवी आहे. तापमानात घट होईपर्यंत घरातून बाहेर पडणे शक्यतो टाळा, असे ते म्हणाले.

मंत्र्याचे वादग्रस्त विधान

बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मुलांच्या मृत्यूसाठी प्रशासन तसेच सरकार जबाबदार नाही. मुलांचे नशीबच चांगले नव्हते. हवामान देखील याकरता जबाबदार आहे. सरकारने उपचाराची पूर्ण व्यवस्था केली होती, असे विधान पांडे यांनी केले आहे.

Related posts: