|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उपनगराध्यक्षांनी चौकशी अहवाल सभागृहात भिरकावला

उपनगराध्यक्षांनी चौकशी अहवाल सभागृहात भिरकावला 

प्रशासनाकडून गोरगरिबांवर अन्याय होत असल्याचा आरोप

धनदांडग्यांना पाठिशी घालण्यासाठी बनविला चुकीचा चौकशी अहवाल!

मालवण नगरपालिका विशेष सभा वादळी

प्रतिनिधी / मालवण:

मालवण नगरपालिकेच्या विशेष सभेत पुन्हा एकदा कॉम्लेक्समध्ये करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाईचा मुद्दा गाजला. गेल्या दीड वर्षांपासून सभागृहाच्या निदर्शनास आणलेल्या कारवाईला टाळाटाळ का? असा सवाल उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी केला. गोरगरिबांच्या किरकोळ घर दुरुस्तीच्या बांधकामांना पालिकेकडून पावसाळा असूनही 24 तासांत बांधकाम तोडण्याची नोटीस बजावणी होत असेल, तर मग धनदांडग्यांना अभय आणि गोरगरिबांचा संसार उघडय़ावर टाकायचा, असा प्रकार प्रशासकीय पातळीवरून होत आहे, असा आरोप वराडकर यांनी केला. पालिकेच्या अधिकाऱयाने सादर केलेल्या एका कॉम्प्लेक्सचा तपासणी अहवालही त्यांनी सभागृहात भिरकावून निषेध नोंदविला.

दरम्यान, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत मुख्याधिकारी रंजना गगे यांनी पंधरा दिवसांत प्रशासकीय पातळीवर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन महिने उलटूनही प्रशासकीय पातळीवरून कोणतेही कामकाज योग्य पद्धतीने होत नसल्याने या सर्वांसाठी जबाबदार म्हणून मुख्याधिकारी यांच्यावरच कारवाई करण्याचा विचार करावा लागेल, असे स्पष्ट केले.

मालवण नगरपालिकेची विशेष सभा मंगळवारी झाली. उपनगराध्यक्षांनी मांडलेल्या या विषयामुळे तब्बल दोन तास शहरातील कॉम्प्लेक्सच्याच विषयावर वादळी चर्चा झाली. मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या अनुपस्थितीत सभा झाल्याने प्रशासनाकडून सभागृहात योग्य माहिती सादर करण्यात आली नाही. त्यामुळे सदस्यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

सर्वच कॉम्प्लेक्सची चौकशी करा

सगळ्य़ा कॉम्प्लेक्सची चौकशी करून भोगाधिकार प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय वास्तव्य होत असले, तर कॉम्प्लेक्सच्या मालकावर कारवाई करा. केवळ विशिष्ट कॉम्प्लेक्सवरच कारवाईचा अट्टाहास का? कॉम्प्लेक्सधारकाने वाढीव बांधकाम केलेले असेल आणि दंडात्मक रक्कम भरून हे बांधकाम अधिकृत होत असेल, तर प्रशासनाने तसा विचार करावा, अशी सूचना मंदार केणी यांची केली. मुळात प्रशासकीय अधिकाऱयांना कायद्याचेच ज्ञान नसल्याने त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने कार्यवाही होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बांधकाम सभापती गणेश कुशे, आप्पा लुडबे यांनीही सर्वच कॉम्प्लेक्सची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली. शीला गिरकर यांनी रेवतळे परिसरातील कॉम्प्लेक्सधारकाने पालिकेसाठी सोडलेल्या जागेवरही बांधकाम केल्याचे सांगितले.

सोडलेल्या जागा ताब्यात कधी घेणार?

शहरात उभारलेल्या कॉम्प्लेक्स अगर व्यापारी बांधकाम करताना पालिकेसाठी सोडण्यात आलेल्या जागी पुन्हा बांधकाम करून त्याचा वापर संबंधितांकडून होत आहे. त्यामुळे या जागा ताब्यात घेण्याबाबत गतवर्षी ठराव झाला होता. त्यावर कार्यवाही कधी करणार, असा सवाल गणेश कुशे यांनी केला. सभागृहात चर्चा केली जात असलेल्या विषयावर कधीही नंतर कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले आहे. नाटय़गृह परिसरातील बिअर शॉपीला मुदतवाढ दिलेली नसतानाही अद्याप बिअरशॉपी सुरू आहे. प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होणार नसेल, तर करायचे काय? असा सवालही कुशे यांनी केला.

…तर ठेकेदारावर फौजदारी का केली नाही?

फोवकांडा पिंपळ येथील पालिकेचे विश्रामगृह चालविणाऱया ठेकेदाराने आपला ठेका संपल्यानंतर तेथील बाथरुममधील नळ, सिलिंग फॅन, दरवाजे काढून नेल्याने पालिकेचे नुकसान केले आहे. तब्बल 8 लाख 15 हजार रुपये भरून ज्याने नवीन ठेका घेतला, त्याला तब्बल चार महिने उलटूनही विश्रामगृहाचा ताबा देण्यात आलेला नाही, असा आरोप राजन वराडकर यांनी केला. त्यावर कर विभागाचे विजय रावले यांनी सर्व साहित्य आहे, तेथेच आहे, असे सांगितले. यावर वराडकर यांनी सभा संपल्यानंतर विश्रामगृहाची पाहणी करण्याची मागणी केली. त्यावर नगराध्यक्षांनी पाहणी करण्याचे मान्य केले. सभा संपल्यावर विश्रामगृहाची पाहणी केल्यानंतर बाथरुममधील मिक्सर गायब असल्याचे दिसून आले. नळही साधे लावण्यात आल्याचे दिसले. एक सिलिंग फॅन नुकताच आणून ठेवल्याप्रमाणे दिसत होता. त्यावर उपनगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

केणी-कुशे यांच्यात रंगली जुलगबंदी

मेढा येथील भुयारी विद्युत वाहिनीचे काम स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांनी अडविल्याबद्दल भाजपचे बांधकाम सभापती गणेश कुशे यांनी नाराजी व्यक्त केली. चुकीच्या पद्धतीने काम अडविल्यामुळे मेढा प्रभागात विजेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांच्या घरात आठ-आठ दिवस लाईट नाही, याला आंदोलनकर्ते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या प्रभागात त्याच ठेकेदाराकडून काम करवून घ्यायचे आणि दुसऱयाच्या प्रभागात काम रोखायचे हे बरे नाही, असे सुनावले. केणी यांनी आरोप फेटाळले. काम चुकीच्या पद्धतीने होत असल्यानेच काम थांबविले. आता ठेकेदाराने योग्य पद्धतीने कामास सुरुवात केली आहे, असेही सांगितले. कुशे आणि केणी यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली.

नाटय़गृह व्यापारी संकुलावर हॉलचे बांधकाम

पालिकेच्या मामा वरेरकर नाटय़गृह संकुल परिसरातील व्यापारी गाळय़ांच्या इमारतीवर प्रशस्त हॉल साकारण्यासाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी सभागृहाने दिली. याठिकाणी सध्या पावसाळय़ात पाणी गळतीचा त्रास होत असल्याने या इमारतीवर फॅब्रिकेशन कामासह लोखंडी पत्र्यांचे छप्पर बनविण्यात येणार आहे. हे छप्पर झाल्यानंतर हा हॉल इच्छुक व्यावसायिकाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.

Related posts: