|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पानसरे हत्येमध्ये स्थानिकाचा सहभाग

पानसरे हत्येमध्ये स्थानिकाचा सहभाग 

विशेष सरकारी वकीलांचा न्यायालयात दावा

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणामध्ये कोल्हापुरातील स्थानिकाचा सहभाग असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. या स्थानिकाचे वर्णन कळसकरने एसआयटीला सांगितले आहे. त्या स्थानिकाचे नाव सांगण्यास कळसकर टाळाटाळ करत आहे. या दोन्ही गोष्टींचा उलगडा होण्यासाठी शरद कळसकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील ऍड. शिवाजी राणे यांनी जिल्हा न्यायालयात केली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत नववे  कनिष्ठस्तर सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. राऊळ यांनी कळसकरला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    दरम्यान, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास कॉ. पानसरे हत्येप्रकरणातील नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय 25, रा. केसापुरी, ता. दौलताबाद, जि. औरंगाबाद) याची पोलीस कोठडी मंगळवारी संपली. त्याला एसआयटीने पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर केले. सात दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये काही महत्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. यामध्ये पानसरे हत्येमागील कोल्हापूर कनेक्शन, पिस्टलची निर्मिती आणि विल्हेवाट, कळसकर कोल्हापूरमध्ये कुठे राहिला, बेळगावमधील बैठकीमध्ये डॉ. विरेंद्र तावडे, भारत कुरणे, शरद कळसकर यांच्यासोबत कोण होते, याची माहिती समोर आली आहे. न्यायालयामध्ये अपर पोलीस अधिक्षक डॉ. तिरूपती काकडे, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, रमेश ढाणे, उपनिरीक्षक युवराज आठरे उपस्थित होते.

कळसकरचे कोल्हापूर कनेक्शन

पानसरे यांच्या हत्येपूर्वी पाच ते सहा दिवस आणि हत्येनंतर काही काळ शरद कळसकर कोल्हापुरात वास्तव्यास होता. उद्यमनगर येथील लेथ मशिनवर कामास होता. पानसरे यांच्या हत्येपूर्वी कळसकरकडे अमित डेगवेकर, डॉ. विरेंद तावडे यांनी पिस्टल तयार करण्याची जबाबदारी दिली. कळसकरने या पिस्टलची निर्मिती कोठे केली, तो कोल्हापुरात कोठे राहात होता, याची माहिती पोलिसांना घ्यावयाची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील ऍड. राणे यांनी केला.

पाटील नावाने कोल्हापुरात वावर

कळसकर कोल्हापुरात उद्यमनगर, जवाहरनगर परिसरामध्ये खोली भाडय़ाने घेऊन राहत होता. उद्यमनगर येथील कारखान्यामध्येही तो कामास होता. या दोन्ही ठिकाणी त्याने खोटे नाव सांगितले होते. कळसकरने आडनाव पाटील असल्याचे कारखान्याचे मालक, खोलीमालकांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

 औरंगाबादमध्ये मोबाईल, डायरीची विल्हेवाट

कळसकरकडे मोबाईल व काही डायरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याची  विल्हेवाट कळसकरने औरंगाबाद येथे लावली आहे. या अनुषंगाने कळसकरला औरंगाबाद येथे न्यायचे आहे. तेथील काही साक्षीदारांच्या साक्षी घेऊन खातरजमा करायची आहे. यामुळे कळसकरला पोलीस कोठडी द्यावी. अशी मागणी ऍड. राणे यांनी केली.

तो स्थानिक कोण

कोल्हापुरातील स्थानिकाचा पानसरे हत्येत सहभाग असल्याचे समोर आले आहे. पानसरे हत्येपूर्वी आणि हत्येनंतर काही काळ हल्लेखोर कोल्हापुरातच थांबून होते. त्या स्थानिकानेच हल्लेखोरांना मदत केल्याची माहिती यापूर्वी समोर आली आहे. तो स्थानिक कोण, पानसरे हत्याप्रकरणामध्ये काही पोलीस ठाण्यामध्ये काही स्थानिकांना रोज हजेरी लावावी लागत होती. यापैकीच कोणी यामध्ये आहे काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. हा स्थानिक बेळगांव येथील बंदुक प्रशिक्षण व बेळगांव एसटीस्टँडवरील बैठकीत उपस्थित होता, असेही युक्तिवादात मांडले गेले.

तपासाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

एआयटी पथकाने शुक्रवारी पानसरे हत्या प्रकरणाचा गोपनीय तपास अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर केला आहे. यामध्ये केसडायरीतून काही महत्वाचे खुलासे एसआयटीने केले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान जिल्हा न्यायालयामध्येही उच्च न्यायालयातील अहवालाचे दाखले देण्यात आले आहेत.

स्थानिकाचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी द्या : ऍड. राणे

पानसरे हत्येचा तपास केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित नाही. तो राज्यातील काही बडय़ा शहरांशी संबंधित आहे. त्यामुळे कळसकरला आणखी सात दिवसांची कोठडी मंजूर करावी, असा युक्तिवाद ऍड. राणे यांनी केला. पानसरे हत्येपूर्वी पाच ते सहा दिवस बेळगांवमधील स्टँडवर बैठक झाली. यामध्ये डॉ. विरेंद्र तावडे, अमित डेगवेकरसह आपण स्वतः उपस्थित होतो, अशी माहिती कळसकरने दिली आहे. मात्र अन्य दोघांची नावे तो सांगत नाही. एकजण कर्नाटकचा तर दुसरा कोल्हापूरातील असल्याचे तो सांगत आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मंजूर करण्याची मागणी ऍड. शिवाजी राणे यांनी केली.

युनिव्हर्सल आरोपी करण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न : ऍड. पटवर्धन

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येममध्ये तेच तेच आरोपी दाखवून तपास यंत्रणा आरोपींना युनिर्व्हल डोनर करत आहेत. तपासामध्ये कोणतीच नवीन बाब समोर आली नसल्याने त्याच त्याच आरोपींना इतर गुह्यांमध्ये अटक केली जात आहे. डॉ. विरेंद्र तावडे व अमित डेगवेकर यांच्या कोठडीवेळीच कळसकरकडील हत्याराची माहिती का समोर आली नाही, शस्त्र प्रशिक्षणाची माहिती संशयीत भरत कुरणे याच्यावरील दोषारोपपत्रातून समोर आली आहे. कळसकरने 2015 मध्ये वापरलेल्या मोबाईलचा आत्ता शोध लागणे शक्य नाही. तो मोबाईल शाबूत असेल का असा युक्तिवाद संशयीत कळसकरचे वकील ऍड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयामध्ये केला.

Related posts: