|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला अटक

बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला अटक 

सातारा पोलिसांची कारवाई, चेक बाऊन्स प्रकरणी होते न्यायालयाचे वॉरंट : आज न्यायालयात हजर करणार

प्रतिनिधी/ सातारा

छोटय़ा पडद्यावरील ’बिग बॉस मराठी’ हा रिऍलिटी शो गाजवत असलेला सातायातील स्वयंघोषित राजकीय नेता अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. एका जुन्या चेक बाउन्स प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रसिध्द होताच त्याच्या चाहत्यामध्ये खळबळ उडाली. दिवसभर सोशल मिडियासह शहरात बिचुकलेच्या अटकेची चर्चा होती. 

कलर्स वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या बिग बॉसमधील सर्वाधिक चर्चित असलेला स्पर्धक म्हणून अभिजित बिचुकलेची ओळख राज्यभरात झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील अन्य स्पर्धकांसोबत त्याचे रोजच्या रोज वाद झडत होते. स्वत:ला महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणारा बिचुकले त्याच्या विरोधात काहीही सहन करण्याच्या मनस्थितीत नसायचा. अन्य स्पर्धकांशी तो नेहमीच चढय़ा आवाजात वाद घालताना दिसायचा.

अलीकडेच बिचुकलेनं शोमधील एक स्पर्धक रुपाली भोसले हिच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. महिला वर्गात याचे तीव्र पडसाद उमटले. भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बिचुकलेला ‘बिग बॉस’च्या बाहेर काढण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली होती. 

हे सगळं सुरू असतानाच चेक बाउन्स प्रकरण उजेडात आले. त्याच्या विरोधात सातारा स्थानिक न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होते. त्यानंतर सातारा पोलिसांनी बिचुकलेच्या अटकेसाठी थेट मुंबई गाठली आणि त्याला बेडय़ा ठोकल्या. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.  

आता अभिजित दिसणार की नाही?

बिग बॉसमध्ये गेल्यानंतर अभिजित बिचुकलने त्याच्या स्वभावाप्रमाणे तिथेही चांगलाच गोंधळ घातला आहे. कवीमनाचा नेता म्हणून मिरवणारा अभिजित बिगबॉसमध्ये वरचढ ठरु लागला होता. त्याच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली होती. राज्यभर बिचुकलेला चाहत्यांचा पाठिंबाही मिळत होता तर काहीजण त्याची थट्टाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडे त्याला बिग बॉसमधून बाहेर काढण्याची मागणीही एका भाजप नगरसेविकेने केली होती. त्यातच आता अटक झाल्याने अटकेमुळं बिचुकलेची ‘बिग बॉस’मधील इनिंग संपणार की तो पुन्हा एन्ट्री घेणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Related posts: