|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आषाढी यात्रेsवर अन्न व औषध प्रशासनाची नजर

आषाढी यात्रेsवर अन्न व औषध प्रशासनाची नजर 

पालखी मार्गावरील खाद्यान्न विक्रेत्यावर राहणार लक्ष

प्रतिनिधी/ सोलापूर

 

आषाढीवारी सोहळा पंधरा दिवसावर आला असून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त खाद्यान्नाची विक्री होऊ नये यासाठी आषाढी यात्रेच्या सात पालखी मार्गावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नजर ठेवणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी तरुण भारत संवादशी बोलताना दिली.

  आषाढी वारी यात्रेनिमित्त पंढरपुरात सुमारे 10 ते 12 लाख वारकरी दाखल होत असतात. वारीत आलेला वारकरी हा पंढरपुरातून प्रसाद म्हणून पेढे, खवा, साखरेपासून बनविलेले इतर खाद्य पदार्थ भाविक घरी घेऊन जात असतो. त्यामुळे हा बनविण्यात आलेला पदार्थ भेसळयुक्त आहे का? याची चौकशी अन्न व औषध प्रशासन अधिकारी करणार आहेत.

आषाढीवारी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे पंढरपूर आणि पालखी मार्गावर अनेक प्रकारचे छोटे, मोठे व्यावसायिक खाद्यान्न भेसळ करुन विक्री करीत असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने 20 अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे.  सोमवार 24 जून रोजीपासून आठ अन्न व औषध प्रशासन अधिकारी पालखी मार्गावरील दुकाने तपासणी करणार आहेत.

   आषाढी पालखी सात मार्गावरील नोंदणी नसलेल्या आणि भेसळयुक्त खाद्यान्न दुकानात आढळल्यास दुकानदाराचा परवाना बंद करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने तयारी पूर्ण केली आहे. तसेच या विभागाच्या वतीने वारीतील प्रत्येक आत्पकालीन सेंटरवर एक अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे.  

पुणे येथील 12 अधिकाऱयांची नेमणूक

आषाढी यात्रेनिमित्त अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने एकूण वीस अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामधील बारा अधिकारी हे पुणे विभागातील मागविण्यात आली आहेत. बाकीचे आठ अधिकारी हे सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभागातील आहेत. सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत आणि पुणे येथील सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.

भेसळयुक्त खाद्यान्न आढळल्यास कारवाई करणार

वारीच्या कालावधीत पालखी मार्गावरील व पंढरपुरातील व्यावसायिकांनी स्वच्छ अन्न पदार्थ विक्री करावी. तसेच खराब आणि शिळे झालेल्या खाद्य पदार्थ, अन्न याची विक्री  होणार नाही याची दक्षता घ्यावी. भेसळयुक्त खाद्यान्न आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

प्रदीप राऊत, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त, सोलापूर

Related posts: