|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » क्रिडा » पाकला द.आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यकच

पाकला द.आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यकच 

लंडन :

येथील ओव्हल मैदानावर विजयासाठी झगडत असलेला पाकिस्तान व विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेलेला दक्षिण आफ्रिकन संघ यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत पाकिस्तान उपांत्य फेरीच्या रेसमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दक्षिण आफ्रिकन संघाकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. उभय संघातील ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळवण्यात येईल.

 सध्या पाकिस्तान संघ गुणतालिकेत 3 गुणासह नवव्या स्थानावर आहे. अद्याप पाकचे 4 सामने बाकी असून या सर्व सामन्यात त्यांना विजय आवश्यक असणार आहे. मागील सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाक संघ या सामन्यात चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल.

 अर्थात, भारताविरुद्ध पराभवानंतर पाक संघाला मोठय़ा प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. यातच कर्णधार सर्फराज अहमद व अन्य खेळाडूतील वाद चव्हाटय़ावर आल्यानंतर पाक संघात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे संघातील हेवेदावे मागे टाकत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वपूर्ण सामन्यात पाक खेळाडूंना विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. आजच्या सामन्यात कर्णधार सर्फराज अहमद, बाबर आझम, फखर झामन, इमाम उल हक, हॅरिस सोहेल यांच्यावर फलंदाजीची मदार असणार आहे. सध्याच्या घडीला अनुभवी शोएब मलिक व इमाम उल हकचे अपयश ही पाक संघासाठी चिंतेची बाब ठरली आहे. आजच्या सामन्यात तरी या खेळाडूंना सूर गवसणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

गोलंदाजीत मोहम्मद आमीर, वहाब रियाज यांनी उपयुक्त योगदान दिले आहे. आज आफ्रिकेविरुद्ध या जोडगोळीकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तसेच हसन अली, मोहम्मद हॅन्सेन, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद हाफीज यांच्यावर गोलंदाजीची धुरा असणार आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

चोकर्स या नावाने ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकन संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही सपशेल अपयशी ठरला आहे. गुणतालिकेत त्यांचे सहा सामन्यात केवळ तीनच गुण आहेत. यामुळे स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. आता, त्यांचे तीन सामने बाकी असून या सामन्यात चांगली कामगिरी करत शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

 मागील सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून अगदी थोडय़ा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. आज पाकविरुद्ध लढतीत मात्र मागील अपयश मागे टाकत विजय मिळवण्यासाठी त्यांना चांगलेच प्रयत्न करावे लागणार आहेत. अनुभवी हाशिम आमला, कर्णधार डु प्लेसिस, डिकॉक, डेव्हिड मिलर, ऍडम मॅरक्रम यांच्यावर फलंदाजीची मदार असणार आहे. विशेष म्हणजे, पाकच्या मोहम्मद आमीर व वहाब रियाज यांच्या भेदक माऱयासमोर आफ्रिकन फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.

 कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेज शाम्सी, फेहलुकवियो व इम्रान ताहीर यांच्यावर गोलंदाजीची धुरा असणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत आफ्रिकन फलंदाजांनी निराशा केली असली तरी गोलंदाजांनी मात्र लक्षवेधी कामगिरी साकारली आहे. आजच्या सामन्यात देखील गोलंदाजाकडून उपयुक्त योगदानाची अपेक्षा असेल.

संभाव्य संघ 

@पाकिस्तान : सर्फराज अहमद (कर्णधार), असीफ अली, बाबर आझम, फखर झामन, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासीम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हॅन्सेन, शादब खान, शाहिन आफ्रिदी, शोएब मलिक व वहाब रियाज.

@दक्षिण आफ्रिका – डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम आमला, डिकॉक, जेपी डय़ुमिनी, ब्युरेन हेड्रिंक्स, इम्रान ताहीर, ऍडम मॅरक्रम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, फेहलुकवियो, ड्वेन प्रिटोरियस, रबाडा, तबरेज शाम्सी व व्हॅन डर हुसेन.

सामन्याची वेळ – भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वा.