|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडच्या मार्गातील ‘गुलाबी काटे’

इंग्लंडच्या मार्गातील ‘गुलाबी काटे’ 

साऊदम्प्टनमध्ये काल मला बांगलादेशी पत्रकार भेटले. एक प्रश्न उपस्थित होईल की, बांगलादेशी पत्रकार भारत-अफगाणिस्तान सामन्याला कशासाठी आले? तर ते अफगाणिस्तानचेही सामने कव्हर करत होते. बांगलादेशचे कोणते सामने बाकी आहेत, भारताविरुद्धची लढत कशी असेल, यावर त्यांच्यात चर्चा झडत होती आणि त्यांच्यातील एक जण मला म्हणाला, ‘बांगलादेशचा संघ इथे वर्ल्डकप जिंकण्यासाठी, वर्ल्ड चॅम्पियन ठरण्यासाठी तर नक्कीच आलेला नाही. तो इथे आलेला आहे तो दोन-एक धक्के देण्यासाठी! आणि त्यांनी हे कर्तव्य केव्हाच पार पाडले आहे’!

पण, हे छोटे-छोटे मानले जाणारे संघ मोठे-मोठे धक्के देण्यासाठीच इमानइतबारे मैदानात उतरत असतात. शनिवारी येथे अफगाणने नाही का आपली कडवी परीक्षा घेतली?

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दुबळय़ा संघापैकी एक मानल्या जाणाऱया श्रीलंकेने तर चक्क इंग्लंडची झाडाझडती तर घेतलीच. शिवाय, जणू त्यांच्याकडच्या सर्व चीजवस्तू लुटल्यासारखे करत त्यांना कंगाल करुन टाकले. इंग्लंडचा हा 6 सामन्यातील दुसरा पराभव. (यापूर्वी, पाकिस्ताननेही त्यांना अस्मान दाखवले होते). आता आणखी एखाद-दुसरा पराभव त्यांच्या वाटचालीत आणखी बाधा आणू शकेल आणि आणखी बिकट स्थिती म्हणजे त्यांच्या तिन्ही लढती दिग्गज संघाविरुद्धच आहेत. त्या म्हणजे भारत, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध!

मुळात लंकेचा संघ असा काही चमत्कार करेल, असे लंकन चाहत्यांना, त्यांच्या व्यवस्थापनाला किंवा दस्तुरखुद्द संघालाही वाटले नसेल. पण, हा चमत्कार घडला. भारत-न्यूझीलंडच्या बरोबरीने इंग्लंडला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, त्याच इंग्लंडला येथे लंकेसारख्या संघाकडून चारीमुंडय़ा चीत व्हावे लागले.

या निकालाने ‘ब्युटी ऑफ क्रिकेट’ कशाला म्हणतात, ते अधोरेखित झाले. शिवाय, हा खेळ ‘अनप्रेडिक्टेबल’ का आहे, ते ही अधोरेखित झाले. एका अर्थाने इंग्लंडसाठी वाजलेली ही धोक्याची घंटा आहे. यापासून ते किती बोध घेतील, हे त्यांच्या मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया सामन्यातून दिसून येईल.

इंग्लंडच्या या पराभवाने इंग्लिश चाहते देखील मनातून का होईना, पण, चांगलेच खचले आहेत. मुळात लंकेसारख्या संघाकडून पराभव कसा काय स्वीकारावा लागतो, हे त्यांच्या पचनी पडत नाहीय आणि मी ज्यांच्याकडे राहिलो, त्या सू व मार्टिन यांनाही तोच प्रश्न पडला होता.

त्यांच्या कपाळावरील आठय़ा बघून मी त्यांना म्हणालो, ‘एल, dदहू wदब्, ग्t was रल्st दहा gaस, हदूप्ग्हु स्दा!’

पण, चेहऱयावरील रेषा जैसे थे राहिल्या. आपला संघ इथे हरु शकतो तर कुठेही हरु शकतो, ही जाणीव अशा इंग्लिश चाहत्यांना बैचेन करते आहे.

लंकेविरुद्धच्या या लढतीपूर्वी इंग्लंडचा संघ सेमीफायनलमध्ये आपला प्रतिस्पर्धी कोण असू शकतो, याचे आडाखे बांधत होता. पण, लंकेने त्यांच्या मनातील सेतू उधळून लावला आहे. आता इंग्लंडला सर्वप्रथम उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी जिद्दीने लढावे लागेल आणि त्यानंतरच तेथे आपला प्रतिस्पर्धी कोण असेल, याची चिंता करावी लागेल. 

खरं तर या विजयाने लंकेला काहीच साध्य होणार नाही. पण, इंग्लंडच्या वाटय़ात मात्र त्यांनी गुलाबी काटे पसरुन टाकले आहेत. इंग्लंडचा संघ आता पुढील लढतीत जेथे जेथे पाय ठेवेल, तेथे तेथे हे काटे त्यांना बोचत राहणार आहे.

इंग्लिश हवामानासारखाच आता इंग्लिश संघ देखील लहरी होतो आहे!

क्रीडा प्रतिनिधी

विवेक कुलकर्णी ( साऊदम्प्टन )