|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » क्रिडा » रोमांचक लढतीत भारताची बाजी

रोमांचक लढतीत भारताची बाजी 

वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन

अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत भारताने अफगाणिस्तानचा संघर्ष केवळ सुदैवानेच मोडीत काढला आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 11 धावांनी निसटता विजय नोंदवत नामुष्की टाळली. अफगाणिस्तानचा संघ अनेक निकषावर दुबळा असल्याने येथे त्यांच्याकडून प्रतिकाराची अपेक्षा नव्हतीच. पण, क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखायचे नसते, हा धडा देत अफगाणिस्तान संघाने भारताला चांगलाच घाम फोडला. भारताने हा सामना जिंकत दोन पूर्ण गुण वसूल केले असले तरी या निकालाने टीम इंडियाला आत्मचिंतन करणे जणू भागच पाडले आहे.

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताची ठरावीक अंतराने पडझड होत राहिली आणि संघाला निर्धारित 50 षटकात 8 बाद 224 अशा तुलनेने किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. त्यानंतर अफगाणने 49.5 षटकात सर्वबाद 213 धावांपर्यंत मजल मारली.

विजयासाठी 225 धावांचे आव्हान असताना प्रत्युत्तरात मोहम्मद नबीच्या धुवांधार फटकेबाजीमुळे अफगाणिस्तानने भारताच्या नाकात दम करुन टाकला होता. पण, निर्णायक क्षणी, शेवटच्या षटकात शमीने नबीला बाद करत पुढे शानदार हॅट्ट्रिक नोंदवली आणि इथेच भारताच्या दमदार मात्र निसटत्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

विजयासाठी 225 धावांचा पाठलाग करणाऱया अफगाणिस्तानला शमीच्या निर्णायक माऱयानंतर 49.5 षटकात सर्वबाद 213 धावांवर समाधान मानावे लागले. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना नबीने पहिल्याच चेंडूवर तडफदार चौकार फटकावला होता. पण, दुसरा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर शमीने तिसऱया चेंडूवर नबीचा अडसर दूर केला तर पुढील दोन चेंडूंवर आणखी दोन गडी बाद करत त्याने हॅट्ट्रिक साजरी केली. शिवाय, संघाच्या विजयावर शिक्कामोर्तबही करुन दिले. शमीच्या याच भेदक माऱयामुळे अफगाणचा संघर्ष अखेर शेवटच्या षटकात अपयशी ठरला.

भारतावर सातत्याने दडपण

प्रारंभापासूनच कडवी परीक्षा घेणाऱया अफगाणिस्तानने विजयासाठी 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतावर सातत्याने दडपण ठेवले. पण, निर्णायक टप्प्यात त्यांच्या पदरी अपयश आले. अफगाणची मदार पहिल्या चार फलंदाजांवर होती आणि बुमराहने 2 तर पंडय़ा व शमीने प्रत्येकी एक बळी घेत त्यांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मधल्या फळीत असघर अफगाण (8) स्वस्तात बाद झाला. मात्र, मोहम्मद नबीने निर्णायक टप्प्यात फटकेबाजीवर भर देत सामन्यात जान भरली.

अफगाणचा भेदक मारा

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताला निर्धारित 50 षटकात 8 बाद 224 अशा अगदीच किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. बहरातील धमाकेदार सलामीवीर रोहित शर्मा मुजीब रहमानच्या गोलंदाजीवर अतिशय स्वस्तात त्रिफळाचीत झाल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला तर विजय शंकर (29), धोनी (28) यांनी पुरेसा जम बसल्यानंतरही सपशेल निराशा केली.

त्या तुलनेत विराट कोहलीने या मालिकेत मागील 4 डावात तिसरे शानदार अर्धशतक साजरे केले तर केदार जाधवने 52 धावांसह त्याला समयोचित साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर विराटला नबीने रहमतकरवी झेलबाद केले तर केदार जाधवने  प्रतिस्पर्धी कर्णधार गुलबदिनच्या चेंडूवर बदली खेळाडूकडे झेल देत तंबूचा रस्ता धरल्यानंतर भारताच्या अडचणीत चांगलीच भर पडली.

भारतीय संघ हाणामारीच्या षटकात फटकेबाजी करेल, अशी अपेक्षा होती. पण, ती देखील पूर्णपणे फोल ठरली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चांगलेच जखडून ठेवल्याने भारताला शेवटच्या 10 षटकात केवळ 50 धावा जमविता आल्या. प्रारंभी, रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताला प्रारंभीच जबरदस्त झटका बसला आणि नंतर सातत्याने एका पाठोपाठ एक धक्के बसत असताना संघाला अफगाणवर दडपण असे प्रस्थापित करताच आले नाही.

विराट एका बाजूने किल्ला लढवत राहिला. मात्र, चौथ्या स्थानी आलेल्या विजय शंकरला या नामी संधीचे सोने करता आले नाही. केदार जाधवने 68 चेंडूत 52 धावा जमवल्या असल्या तरी त्यालाही धावांचा वेग उंचावता आला नाही. धोनीने 3 चौकारांसह 28 धावांसाठी 52 चेंडू खेळून काढले तर हार्दिक पंडय़ा फटकेबाजीच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही.

रोहित बहरात असल्याने येथे तो अफगाणच्या दुबळय़ा गोलंदाजीचा सहज समाचार घेईल, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात रहमानच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाल्याने भारतीय संघासाठी हा चांगलाच धक्का ठरला. मागील सामन्यात संघात पुनरागमन करणाऱया केएल राहुलला 30 धावा जमवता आल्या. पण, तो याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकला नाही.

विराट एका बाजूने किल्ला लढवत राहिला. मात्र, चौथ्या स्थानी आलेल्या विजय शंकरला या नामी संधीचे सोने करता आले नाही. केदार जाधवने 68 चेंडूत 52 धावा जमवल्या असल्या तरी त्यालाही धावांचा वेग उंचावता आला नाही. धोनीने 3 चौकारांसह 28 धावांसाठी 52 चेंडू खेळून काढले तर हार्दिक पंडय़ा फटकेबाजीच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. 18 हजार प्रेक्षकक्षमतेच्या रोझ बॉल स्टेडियमवर 17 हजारहून अधिक चाहते उपस्थित होते. पण, या स्पर्धेत प्रथमच भारताकडून फटकेबाजीची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.

जेव्हा 48 व्या षटकात धोनी झाला कर्णधार!

निर्णायक क्षणी धोनीचे नेतृत्व गुण उफाळून वर येतात, याची प्रचिती येथे पुन्हा एकदा आली. शेवटच्या 18 चेंडूत 25 धावांची गरज असताना विराटने 48 वे षटक शमीकडे सोपवले. मात्र, याचवेळी धोनीने क्षेत्ररक्षणात व्यापक फेरबदल केले आाणि शमीने देखील त्याला पूरक मारा केल्यानंतर अफगाणला या पूर्ण षटकात 4 धावा दिल्या. पुढे, बुमराहने 49 व्या षटकात केवळ 5 धावा दिल्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकात 6 चेंडूत 16 धावा असे नवे समीकरण झाले.

 

शेवटच्या षटकात काय घडले?

अफगाणिस्तानला शेवटच्या 6 चेंडूत 16 धावांची गरज असताना नबीने पहिल्याच चेंडूवर दणकेबाज चौकार फटकावला. पण, दुसऱया चेंडूवर एकेरी धाव नाकारली आणि 4 चेंडूत 12 असे समीकरण झाले. त्यानंतर तिसऱया चेंडूवर मात्र नबीने पुन्हा लाँगऑनच्या दिशेनेच उत्तूंग फटका मारण्याच्या प्रयत्नात हार्दिक पंडय़ाकडे झेल दिला आणि साऊदम्प्टनवर तिरंगा फडकणार, हे देखील इथेच निश्चित झाले.

 

मोहम्मद नबीच्या झुंजीला शेवटच्या षटकात अपयश

भारतावर प्रचंड दडपण राखण्यात यशस्वी ठरताना मोहम्मद नबीने विराटसेनेच्या नाकात दम करुन टाकला होता. पण, निर्णायक क्षणी शमीने त्याच्या काटा काढला आणि भारताच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर पुढील चेंडूवर शमीने आणखी दोन बळी घेत अफगाणच्या लढय़ाला पूर्णविराम दिला.

धावफलक

भारत : केएल राहुल झे. हजरतुल्लाह, गो. मोहम्मद नबी 30 (53 चेंडूत 2 चौकार), रोहित शर्मा त्रि. गो. मुजीब रहमान 1 (10 चेंडू), विराट कोहली झे. रहमत, गो. नबी 67 (63 चेंडूत 5 चौकार), विजय शंकर पायचीत गो. रहमत शाह 29 (41 चेंडूत 2 चौकार), महेंद्रसिंग धोनी यष्टीचीत इक्रम, गो. रशीद खान 28 (52 चेंडूत 3 चौकार), केदार जाधव झे. बदली खेळाडू (नूर), गो. गुलबदिन नायब 52 (68 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा झे. इक्रम, गो. आफताब आलम 7 (9 चेंडू), मोहम्मद शमी त्रि. गो. गुलबदिन 1 (2 चेंडू), कुलदीप यादव नाबाद 1 (1 चेंडू), जसप्रित बुमराह नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 7. एकूण 50 षटकांत 8 बाद 224.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-7 (रोहित, 4.2), 2-64 (केएल राहुल, 14.2), 3-122 (विजय शंकर, 26.1), 4-135 (विराट, 30.3), 5-192 (धोनी, 44.3), 6-217 (पंडय़ा, 48.4), 7-222 (शमी, 49.3), 8-223 (केदार जाधव, 49.5)

गोलंदाजी : मुजीब-उर-रहमान 10-0-26-1, आफताब आलम 7-1-54-1, गुलबदिन नायब 9-0-51-2, मोहम्मद नबी 9-0-33-2, रशीद खान 10-0-38-1, रहमत शाह 5-0-22-1.

अफगाणिस्तान : हजरतुल्लाह त्रि. गो. मोहम्मद शमी 10 (24 चेंडूत 1 चौकार), गुलबदिन नायब झे. शंकर, गो. पंडय़ा 27 (42 चेंडूत 2 चौकार), रहमत शाह झे. चहल, गो. बुमराह 36 (63 चेंडूत 3 चौकार), हशमतुल्लाह शाहिदी झे. व गो. बुमराह 21 (45 चेंडूत 2 चौकार), असघर अफगाण त्रि. गो. चहल 8 (19 चेंडू), मोहम्मद नबी झे. पंडय़ा, गो. शमी 52 (55 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), नजिबुल्लाह झद्रन झे. चहल, गो. पंडय़ा 21 (23 चेंडूत 2 चौकार), रशीद खान यष्टीचीत धोनी, गो. चहल 14 (16 चेंडूत 1 चौकार), इक्रम अलिखिल नाबाद 7 (10 चेंडू), आफताब आलम त्रि. गो. शमी 0 (1 चेंडू), मुजीब-उर-रहमान त्रि. गो. शमी 0 (1 चेंडू). अवांतर 17. एकूण 49.5 षटकात सर्वबाद 213.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-20 (हजरतुल्लाह, 6.3), 2-64 (गुलबदिन, 16.5), 3-106 (रहमत, 28.4), 4-106 (हशमतुल्लाह), 5-130 (असघर, 34.6), 6-166 (नजिबुल्लाह, 41.3), 7-190 (रशीद खान, 45.3), 8-213 (नबी, 49.3), 9-213 (आफताब, 49.4), 10-213 (मुजीब, 49.5).

गोलंदाजी : मोहम्मद शमी 9.5-1-40-4, जसप्रित बुमराह 10-1-39-2, यजुवेंद्र चहल 10-0-36-2, हार्दिक पंडय़ा 10-1-51-2, कुलदीप यादव 10-0-39-0.

Related posts: