|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विकासकामांचा मास्टर प्लॅन तयार : सुरेश खाडे

विकासकामांचा मास्टर प्लॅन तयार : सुरेश खाडे 

प्रतिनिधी/ सांगली

 पुढे संधी मिळेल न मिळेल. पण, मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करणार तसा कामांचा मास्टर प्लॅन तयार केला असल्याची माहिती, सामाजिक व न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. मागासवर्गीय संस्थांमध्ये उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतानाच नव्याने उद्योग, व्यवसायासाठी मागासवर्गीयांना चालना देणार असल्याची ग्वाही देतानाच दलीत वस्ती सुधारचे 500 कोटी तात्काळ वितरीत करण्यात येणार असल्याची घोषणाही ना. खाडे यांनी यावेळी केली.

 नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात सामाजिक न्यायविभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ना. सुरेश खाडे यांचे सांगलीत प्रथमच आगमन झाले. पेठनाका, आष्टा, लक्ष्मीफाटा, सांगलीवाडी येथे त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांकडून  जल्लोषात स्वागत झाले. टिळक चौक येथे आ. सुधीर गाडगीळ, माजी आ. दिनकर पाटील, महापौर सौ. संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, प्रकाश बिरजे  महापालिकेतील भाजपाचे गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. सांगलीचे अराध्य दैवत श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर टिळक स्मारक मंदिर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 ना. खाडे म्हणाले, आपल्या मंत्रीपदामुळे सांगली जिल्हय़ाला अखेर न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपण सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून पदभार घेताच अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटी रूपयांची वाढ केली. त्यामुळे आपल्या खात्याचे बजेट 12303 कोटीवर पोहोचले आहे. यापुढे आपल्याला संधी मिळो अथवा न मिळो पण पक्षाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासाने दिलेल्या संधीचे दलित, वंचितासाठी सोने करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अधिवेशन सुरू असतानाच आपण कार्यालयाचे 40 टक्के काम पूर्ण केले आहे. कमी वेळात जास्त काम करण्याची कसरत करावी लागणार आहे. पण त्यासाठीचे नियोजन आपण केले आहे. एका महिन्यात सामाजिक न्याय विभागात वातावरण बदललेले दिसेल. असा विश्वास व्यक्त करून ना.खाडे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेच्या रकमेत वाढ केली आहे. तर दिव्यांगाना मोफत घरकुलासाठी शंभर कोटींची तरतुद केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेसाठी 500 कोटी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेसाठी 50 कोटी आणि केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी 750 कोटींची भरीव तरतुद केली आहे.

 यावर्षी शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शंभर कोटींची तरतुद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी आणि सवलतीसाठीही नियोजन करण्यात येत असल्याचे ना. खाडे यांनी यावेळी सांगितले. आरग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करण्यासाठी त्यांच्या स्मारकासाठी यापूर्वी दोन कोटी आठ लाख रूपये निधी मंजूर केला होत. त्यातून इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. आता अंतर्गत कामासाठी एक कोटी 46 लाखा तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

सांगलीला झुकते माप

आपण गरिबासाठी आमदार झालो होतो. आता मंत्रीपदाचा वापरही गरिबासाठीच करणार. त्यातून वाढपी सांगली जिल्हय़ाचा असल्याने सांगलीसाठी झुकते माप निश्चित असेल अशी ग्वाहीही ना. खाडे यांनी यावेळी दिली.

नवीन व्यवसायांना चालना

 मागासवर्गीय संस्थांमध्ये यापूर्वी भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. त्यातून आतापर्यंत 82 जणांवर कारवाई करून 29 कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत. यापुढेही ही चौकशी सुरूच राहणार आहे. पण, त्याचवेळी नवीन उद्योग व्यवसायांना चालना देणार असल्याची ग्वाही ना. खाडे यांनी यावेळी दिली.

Related posts: