|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वास्तव लेखन परिणामकारण ठरते

वास्तव लेखन परिणामकारण ठरते 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोणतीही कादंबरी अथवा लेख लिहिताना लेखकाच्या मनातील कल्पित विश्वाला सत्याची, प्रत्यक्ष अनुभवाची आणि वास्तवाची जोड दिली तरच ते लेखन अधिक परिणामकारक ठरते असे प्रतिपादन वसंत वसंत लिमये यांनी केले. अक्षरदालन आणि निर्धार यांच्यातर्फे आयोजित अक्षरगप्पा 104 या कार्यक्रमातील मुलाखतीच्या निमित्ताने ते बोलत होते.

कॅम्पफायर, लॉक ग्रिफीन या कादंबऱयानंतर आलेली त्यांची विश्वस्त ही रहस्यमय कादंबरी अल्पावधीतच रसिकप्रिय ठरली. त्याचबरोबर 2018 मध्ये त्यांनी सिक्कीम ते लडाख असा जो हिमालयातील कमी प्रसिध्द वाटांवरची भटकंती केली त्यालाही उदंड प्रसिध्दी मिळाला. या भटकंतीतले त्यांचे अनुभव, त्या भटकंतीवर आधारलेल्या साद हिमालयाची या पुस्तकाचा प्रवास त्यांच्या मुलाखतीतून उलगडत गेला.

लेखक, पत्रकार सुधांशु नाईक यांनी नेमक्या शब्दांत संवाद साधत त्यांना अधिकाधिक बोलते केले. हिमयात्रेविषयी बोलताना वसंत लिमये म्हणाले की, या सुमारे 12 हजार किलोमीटर्सच्या प्रवास टप्प्याटप्प्यानं निसर्ग बदलत केला मात्र तिथल्या माणसांचं कष्टप्रद जीवन, त्यांच्यापुढील अडचणी, मोजक्या सोईसुविधा अन् सगळ्या प्रतिकूलतेतही त्यांच्या चेहे-यावर सतत विलसत असलेलं निर्मळ हास्य मात्र कधीच बदललं नाही. बरेचदा निसर्ग तसाच असतो मात्र माणूस बदलतो असं आपल्याला पहायला मिळतं. या प्रवासात जे उलटं अनुभवता आलं त्यामुळे स्वत: चं विश्व अधिक समृध्द झाल्यासारखं वाटतं. लेखनासोबतच त्यांचं आयआयटीमधील शिक्षण, व्यवस्थापन कौशल्यासाठी केलेल्या साहसी खेळांचा वापर, गरुडमाची सारख्या प्रशिक्षण केंद्राची निर्मिती आदि गोष्टीतून लेखकामधील माणूस जाणून घेण्यासाठी रसिकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड या संस्थेचे उपाध्यक्ष पी डी देशपांडे यांनी या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले तर रवींद्रनाथ जोशी यांनी सर्वांचे आभार मानले