|Sunday, February 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील

भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील 

अमेरिकेचे भारताला ठोस आश्वासन

वृत्तसंस्था/ ओसाका

साऱया देशाचे लक्ष लागून राहिलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यातील चर्चा यशस्वी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. भारत हा अमेरिकेचा अत्यंत जवळचा मित्रदेश असून भारताला अमेरिकेची जशी आवश्यकता आहे, तशी अमेरिकेलाही भारताची आहे. दोन्ही देश एकमेकांना समजून घेऊन वादाच्या सर्व मुद्दय़ांवर समाधानकार तोडगा काढण्यास सज्ज आहेत. व्यापार, कर आणि संरक्षण या सर्व विषयांवर संबंध अधिकाधिक दृढ केले जातील, असे ठोस आश्वासन ट्रंप यांनी भारताला दिले. त्यांनी स्वतः ही माहिती बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

भारताने अमेरिकेच्या मालावर अवाजवी कर लादले आहेत. ते भारताला मागे घ्यावे लागतील असा इशारेवजा संदेश या बैठकीआधी ट्रंप यांनी भारताला दिला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार विषयक तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते.  दोन्ही देशांमधील संबंध नेमकी कोणती दिशा घेतात याकडे चिंतायुक्त औत्सुक्याने  पाहिले जात होते. पण दोन्ही नेत्यांच्या प्रत्यक्ष भेटीत वादग्रस्त मुद्दय़ांना बाजूला ठेवून सहकार्याची जपणूक कशी केली जाईल याकडेच लक्ष केंद्रीत करण्यात आले. तसेच वादाच्या मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत परस्पर व्यापार  व एकमेकांच्या मालावर आयात कर या विषयांवर व्यापक नीती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तज्ञांनीही या भेटीचे वर्णन ऐतिहासिक अशा शब्दात केले आहे.

 पंतप्रधान मोदी यांनी नंतर जपानचे पंतप्रधान आबे यांच्याशीही स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा केली. तर त्यानंतर या तिनही देशांनी एकत्रित बैठक घेतली. जगाच्या प्रगत भवितव्यासाठी कटीबद्ध आहे, असे ट्विट करुन मोदी यांनी ओसाका येथे जपान, अमेरिका आणि इंडिया अर्थात ‘जय’ ही बैठक यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. तर ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेमध्ये एवढे घनिष्ट संबंध कधीच निर्माण झाले नसल्याचे सांगत ही आणखी दृढ होईल, असे आश्वासन दिले.

पंतप्रधान मोदी यांनी व्यापार, संरक्षण तसेच 5 जी नेटवर्क, इराणबरोबरचे संबंध व व्यापार याविषयी मते ठामपणे मांडली. अमेरिकेबरोबर आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आणखी मजबूत बनवण्याची इच्छा प्रकट केली. या बैठकीनंतर मोदी यांनी अमेरिकेबरोबर चर्चा यशस्वी ठरल्याचे ट्विट केले आहे. 

दरम्यान, या दोन नेत्यांच्या चर्चेमध्ये भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या एस 400 क्षेपणास्त्र खरेदी प्रणालीविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले. त्यामुळे या विषयावर अमेरिका भारताची बाजू समजून घेण्यास तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे भारताच्या दृष्टीने लाभदायक मानले जात आहे. भारत व अमेरिका उत्पादन क्षेत्र आणि संरक्षण सामग्री या क्षेत्रांमध्येही अधिकाधिक सहकार्य करण्यास सज्ज आहेत, हे दिसून आले. याचे परिणाम येत्या काही काळात दिसून येणार आहेत.

Related posts: