|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी जिल्हय़ाला पावसाने झोडपले

रत्नागिरी जिल्हय़ाला पावसाने झोडपले 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसाने रत्नागिरी जिल्हय़ाला चांगलेच झोडपून काढले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी मान्सून सक्रिय झाला आणि गुरूवारपासून 24 तास मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्हय़ात रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वरसह खेड, चिपळूण, गुहागर, मंडणगड, दापोली तालुक्यात दमदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले. तसेच ठिकठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार घडून घरांच्या पडझडीचे प्रकारही शुक्रवारी घडले. दरम्यान येत्या 48 तासात याहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

आतापर्यंत सरासरी 354 मिमि इतक्या पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस गेल्या 2 दिवसात पडला आहे. शुक्रवारी सरासरी 112 मिमि पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. बुधवारपासून जिल्हय़ात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. मंडणगड 127 मिमि, दापोली 210 मिमि, खेड 124 मिमि, गुहागर 83 मिमि, चिपळूण 105 मिमि, राजापूर 100 मिमि पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

खेडमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरूच

गेले 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाचा जोर शुक्रवारीही कायम होता. दिवसभर कोसळलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे जगबुडी, नारिंगी नद्या दुथडी भरून वहात होत्या. धुवाँधार पावसामुळे खेड-बिरमणी मार्गावरील चाटव येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. ही वाहतूक हुंबरीमार्गे वळवण्यात आली. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना कळवल्यानंतर झाड बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले.

                  अणसुरे भराडेतील बंधारा गेला वाहून

राजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील अणसुरे-भराडेवाडी येथील 25 मीटरचा खारलॅंडचा बंधारा वाहून गेल्याने सुमारे 12 एकर क्षेत्रातील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सागवे चिंचाड परिसरातील बंधाऱयाला भगदाड पडल्याने त्या ठिकाणीही धोका निर्माण झाला आहे.

  नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत अणसुरे-भराडेवाडी येथील सुमारे 25 मिटर खारलॅंड बंधारा वाहून गेला आहे. त्यामुळे या बंधाऱयालगत असलेल्या सुमारे 7 ते 8 हेक्टर भातशेतीत पाणी घुसल्याने जवळपास 20 शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वाहून गेलेल्या बंधाऱयाच्या दुरुस्तीसाठी 3 लाखाच्या आसपास खर्च अपेक्षित असून खारलॅंड विभागाकडून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले, मात्र ऑक्टोबरशिवाय त्यावर निर्णय होणार नाही, अशीही माहिती पुढे आली आहे.

  अणसुरेपाठोपाठ सागवे चिंचाड येथील बंधाऱयाला भले मोठे भगदाड पडले असून त्यामुळे तेथील परिसरातील शेतीला धोका निर्माण झाला आहे. या बंधाऱयाच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती खारलॅंड विभागाकडून उपलब्ध झाली आहे. या दोन्ही घटनानंतर संबंधित खारलॅंड विभागाचे डेप्युटी इंजिनिअर डी. जे. यादव व एस. एस. राजाध्यक्ष यांनी तत्काळ दोन्ही ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तसा अहवाल वरीष्ठ स्तरावर देण्यात आला.

आरवली बस थांबा पाण्यात

संगमेश्वर तालुक्यातील आरवली-माखजन रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. चौपदरीकरण करताना भराव टाकताना काळजी न घेतल्याने नाक्याचे तळय़ात रुपांतर झाले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा फटका वाहनांना बसत आहे. रस्त्याला चांगली गटारे न काढल्याने वाहने रस्त्यात रुतत आहेत. तर धामणीदरम्यान रस्त्याला मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

गुहागरात दूरसंचारच्या  कार्यालयावर झाड कोसळले

गुहागर येथील बीएसएनलच्या येथील दूरध्वनी केंद्राच्या इमारतीच्या छतावर पायरीचे मोठे झाड कोसळल्याने भिंतीसह पत्र्यांचे नुकसान झाले आहे. येथील दूरध्वनी केंद्राच्या समोरच असलेले जुने पायरीचे मोठे झाड गुरूवारी मुळासकट कोसळले. हे झाड केंद्राच्या छतावरच कोसळल्याने पत्रे पूर्णतः वाकले आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत तरी हे झाड छतावर तसेच पडून होते. यात दूरध्वनी केंद्र इमारतीचे मोठे नुकसान झाले असून ऐन पावसाळ्यात संपूर्ण छताची दुरुस्ती करणे अवघड होणार आहे.

                   चिपळूण तालुक्यात घरांची पडझड, 1 महिला जखमी

चिपळूण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाला गुरुवारपासून जोरदार सुरुवात झाली असून शुक्रवारीही संततधार कायम होती. या पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. यात एकजण जखमी झाला आहे. दरम्यान, शहरात पावसाचे पाणी जाण्यास मार्गच मिळत नसल्याने गटार तुंबण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे.

 या पावसामुळे तालुक्यात काही नुकसानीच्या घटना घडल्या असून यामध्ये कुडप येथील सरस्वती धोंडू चौधरी यांच्या घराचे, डेरवण खुर्द येथे जि. प. शाळेची भिंत कोसळून नुकसान झाले. तसेच गोवळकोट बौध्दवाडी परिसरातील अजिम रहिमान पठाण यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले असून यात बेगम रहिमान पठाण ही महिला जखमी झाली. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच गुढे येथे रस्ता खचला असल्याने एस. टी. मार्ग बंद झाला आहे. या पावसाची येथील तहसील कार्यालयात 116.56 मि. मी., तर आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद एकूण 371.13 मि.मी. झाली आहे.

Related posts: