|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गुंड सचिन डोंगरेसह 11 जणांना मोक्का

गुंड सचिन डोंगरेसह 11 जणांना मोक्का 

विशेष पोलीस महानिरीक्षकांची कारवाई : दोन अल्पवयीन मुलांचा समावेश : टोळीवर 12 गंभीर गुन्हे

प्रतिनिधी/ सांगली

वर्चस्ववादातून खुनासह गंभीर गुह्यांची मालिका रचणाऱया ‘जॉय गुप’चा म्होरक्या गुंड सचिन डोंगरेससह टोळीवर मोक्का अंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अकरा सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यापैकी दोघे जण अल्पवयीन आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी त्यांच्यावरील मोक्का प्रस्तावास मंजुरी दिली. जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी याबाबतचा प्रस्ताव डॉ. वारके यांच्याकडे सादर केला होता.

सचिन विजय डोंगरे (वय 27), प्रविण अशोक बाबर (वय 25), सुरेश श्रीकांत शिंदे (वय 23), सुशांत जयवंत कदम (वय 21 सर्व जण रा. गुलाब कॉलनी, शंभर फूटी रस्ता, सांगली), गोपाळ संगाप्पा पुजारी (रा. रेवनाळ), सागर यशवंत महानूर (वय 25 रा. टिंबर एरिया, संभाजी कॉलनी, सांगली), मारुती बिराप्पा शिंदे (वय 19 रा. पांढरेवाडी, ता. जत), प्रशांत दुंडाप्पा सुरगाडे (वय 29 रा. हनुमानगर, सांगली) व स्वप्नील शिवाजी कुंभार (वय 27 रा. कोठावले कॉर्नर, निपाणी, कर्नाटक) अशी मोक्का लावण्यात आलेल्या सराईत गुंडाची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन डोंगरे याने जॉय गुपच्या नावाखाली स्वतःची टोळी निर्माण केली होती. खून, खुनाचा प्रयत्नयासह गंभीर गुह्यांची मालिका या टोळीने सुरु केली होती. सांगलीसह कोल्हापूर जिह्यातील जयसिंगपूर  व गांधीनगर परिसरात या टोळीने दहशत निर्माण केली होती. एक वर्षापूर्वी या गुपमधील प्रविण बाबरने महेश नाईक याला शिवीगाळ केली होती. यावेळी महेशने बाबरला मारहाण केली होती. तसेच गुपचा म्होरक्या सचिन डोंगरे याच्याबरोबरही आर्थिक कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून काही त्यांनी काही महिन्यापूर्वी गुलाब कॉलनी येथे महेश नाईक याचा खून केला होता.

यानंतर या टोळीची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी घेतली होती. टोळीचा म्होरक्या सचिन डोंगरे याच्यासह सदस्यांची कुंडली तयार करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे व विश्रामबाग पोलिसांना दिले होते. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी या टोळीवर मोक्कार्तंगत कारवाईचा प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा पोलीस प्रमख शर्मा यांच्याकडे सादर केला होता. शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1), 3 (2), 3 (4) ही कलमे वाढविण्यास मंजुरी दिली आहे. या गुह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल हे करत आहेत.

टोळीवर 12 गुह्यांची नोंद

गुंड सचिन डोंगरेसह टोळीवर तब्बल 12 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गर्दी, मारामारी, घरात घुसून चोरी करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे यासह अन्य गुह्यांचा समावेश आहे. ‘जॉय गुप’च्या नावाखाली सन 2011 पासून ही टोळी सक्रिय होती. सांगली शहर, संजयनगर, विश्रामबाग, महात्मा गांधी चौक तसेच कोल्हापूर जिह्यातील जयसिंगपूर व गांधीनगर परिसरात या टोळीने दहशत निर्माण केली होती.

 

 

Related posts: