|Thursday, January 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » व्यापारयुद्ध शमण्याची चिन्हे

व्यापारयुद्ध शमण्याची चिन्हे 

ट्रम्प अन् जिनपिंग यांची भेट : नवे शुल्क लादणार नसल्याची घोषणा, चर्चा सुरू राहणार

वृत्तसंस्था/ ओसाका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग या दोघांनीही व्यापार विषयक चर्चा पुढे नेण्याची तयारी दर्शविली आहे. चीनकडून होणाऱया आयातीवर नव्याने शुल्क लादले जाणार नसल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. जपानच्या ओसाकामध्ये जी-20 परिषदेदरम्यान शनिवारी ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात बैठक झाली आहे.

दोन्ही देशांदरम्यान मागील वर्षी सुरू झालेल्या व्यापारयुद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसल्याने आयात शुल्काचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. अमेरिका आणि चीन हे आर्थिक महासत्ता असल्याने त्यांच्यातील व्यापारयुद्धाचा सर्वच देशांवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे.

80 मिनिटांची बैठक

चीनच्या प्रसारमाध्यमानुसार ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यातील बैठक 80 मिनिटे चालली. अपेक्षेनुरुप चर्चेत यश प्राप्त झाले असून चीनसोबतची चर्चा सुरूच राहणार आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत असे ट्रम्प यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले आहे. यापूर्वीही कायमस्वरुपी व्यापारी कराराची तयारी होती. आम्ही कराराच्या समीप पोहोचलो असतानाच अडथळा निर्माण झाला, आता पुन्हा आम्ही पावले टाकत असून निष्पक्ष कराराचा निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याचे ट्रम्प यांनी बैठकीपूर्वी म्हटले होते.

अमेरिकेचे शुल्क अस्त्र

अमेरिका आणि चीन यांच्यात मागील वर्षी मार्च महिन्यात व्यापारयुद्ध सुरू झाले होते. दोन्ही देशांनी परस्परांच्या अब्जावधी डॉलर्सच्या आयातीवरील शुल्क वाढविले आहे. नोव्हेंबर महिन्यात ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात व्यापार विषयक चर्चा सुरू करण्याबद्दल सहमती झाली होती. मार्च महिन्यापर्यंत शुल्क वाढविणार नसल्याची हमी ट्रम्प यांनी दिली होती. चर्चा सुरूच राहिल्याने मार्चमध्ये पुन्हा मुदतवाढ देण्यात आली, पण मे महिन्यात ट्रम्प यांनी चीनवर अनेक आरोप करत चर्चा संपुष्टात आणली होती. तसेच चीनकडून होणाऱया 200 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर 25 टक्के शुल्क लादले होते. चीनने याला प्रत्युत्तर देत 1 जूनपासून 60 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकेच्या उत्पादनांवरील शुल्क वाढविले होते.

Related posts: