|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अमेरिकेची लढाऊ विमाने आखातात

अमेरिकेची लढाऊ विमाने आखातात 

इराणसोबत तणावाची पार्श्वभूमी : कतारमध्ये एफ-22 विमाने तैनात

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

इराणसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या स्थितीदरम्यान पेंटागॉनने पहिल्यांदाच एफ-22 रॅप्टर स्टील्थ लढाऊ विमानांना कतारमध्ये तैनात केले आहे. अमेरिकेच्या सैन्याने शनिवारी याची माहिती दिली आहे. कतारमध्ये लढाऊ विमानांच्या तैनातीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

अमेरिकेचे सैन्य आणि त्याच्या हितसंबंधांच्या रक्षणाकरता, हा निर्णय घेण्यात आल्याचे वायुदलाच्या मिलिट्री कमांडने स्वतःच्या विधानात नमूद केले आहे. पण या विधानात नेमकी किती विमाने तैनात करण्यात याचा तपशील अंतर्भूत नाही.

इराणसोबत तणाव वाढत असतानाच अमेरिकेने मध्यपूर्वेतील स्वतःचे सैन्यबळ वाढविण्याचे धोरण अवलंबिले आहे. अमेरिकेची लढाऊ विमाने कतारची राजधानी दोहा शहराबाहेरील अल उदीद वायुतळावर दाखल झाली आहेत. मध्यपूर्वेत नव्या संरक्षण दलांच्या पूर्वघोषित तैनातीत लढाऊ विमाने सामील आहेत. पूर्ण मध्यपूर्व क्षेत्र, विशेषकरून इराक आणि सीरियातील स्वतःच्या सैन्याच्या रक्षणाच्या अमेरिकेच्या क्षमतेला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे. इराक आणि सीरियामध्ये अमेरिकेचे सैन्य दहशतवाद्यांच्या विरोधात लढत असल्याचे संरक्षण अधिकाऱयाने सांगितले आहे.

इराणचे सैन्य आणि त्याचे समर्थक मध्यपूर्वेत अमेरिकेच्या नागरिकांवर हल्ला करण्याची योजना आखू शकतात, अशी गुप्त माहिती मिळाल्याचा दावा अधिकाऱयांनी केला आहे. उल उदीद वायुतळानजीक अमेरिकेच्या विमानांची उड्डाणे दिसून येत आहेत.

2015 च्या आण्विक करारातून अमेरिकेने अंग काढून घेतल्यापासून इराणसोबतचा तणाव वाढला आहे. मागील आठवडय़ात इराणने अमेरिकेचा ड्रोन पाडल्यानंतर या तणावात मोठी भर पडली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ल्याचा दिलेला आदेश अंतिमक्षणी मागे घेतल्याने युद्धाचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

Related posts: