|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेचा चीनच्या दिशेने मैत्रीचा हात

अमेरिकेचा चीनच्या दिशेने मैत्रीचा हात 

चीनच्या हुवावे कंपनीवरील बंदी हटविली

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन 

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध संपुष्टात आणण्याबद्दल सहमती झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनची कंपनी हुवावेला अमेरिकेत व्यवसाय करण्याची अनुमती दिली आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबतची भेट सकारात्मक राहिली आहे. दोन्ही देश व्यापारयुद्ध संपविण्यास तयार झाल्याचे ट्रम्प यांनी ट्विट करत सांगितले आहे.

जपानच्या ओसाका शहरात झालेल्या जी-20 संमेलनादरम्यान व्यापारयुद्ध महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. जगभरातील नजरा ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या भेटीवर केंद्रीत झाल्या होत्या.

दोन्ही देशांचे संबंध सुरळीत होऊ लागले आहेत. चीनने अमेरिकेच्या शेतकऱयांची उत्पादने खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. स्थिती आता उत्तम दिसून येत असली तरीही मी कुठलीच घाई करणार नाही. चीनवर लादण्यात आलेल्या शुल्कात सध्या कपात केली जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे.

हुवावेला मोकळीक

व्यापारयुद्धादरम्यान जगातील सर्वात मोठी दूरसंचार उपकरण निर्माता कंपनी हुवावेला अमेरिकेच्या बाजारात प्रतिबंधित करण्यात आले होते. स्वतःच्या कंपन्यांचे हित आणि अधिकारांच्या रक्षणासाठी आवश्यक पावले उचलणार असल्याचे चीनने म्हटले आहे. तर हुवावेच्या उपकरणांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा दावा अमेरिकेने केला होता.

अमेरिकेचे शुल्क अस्त्र

मागील वर्षी दोन्ही देशांदरम्यान व्यापारयुद्ध सुरू झाले होते. दोन्ही देशांनी परस्परांच्या अब्जावधी डॉलर्सच्या आयातीवर शुल्क लादले होते. मागील महिन्यात ट्रम्प यांनी चीनशी सुरू असलेली चर्चा संपुष्टात आणत आयातशुल्क वाढविले होते. चीननेही प्रत्युत्तरादाखल 60 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकेच्या सामग्रीवरील शुल्क वाढविले होते.