|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रिंगरोड सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱयांना पिटाळले

रिंगरोड सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱयांना पिटाळले 

वार्ताहर / किणये

संतिबस्तवाड शिवारात रिंगरोड सर्व्हे करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना व सर्व्हे कर्मचाऱयांना संतिबस्तवाड येथील शेतकऱयांनी पिटाळून लावले आहे. दडपशाही मार्गाने पुन्हा सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतकऱयांना कोणतीही नोटीस न देताच मंगळवारी संतिबस्तवाड येथे सर्व्हे करण्यासाठी अधिकारी दाखल झाले होते. त्यांना जाब विचारून कोणत्याही परिस्थितीत आमची पिकावू जमीन देणार नाही, असा इशारा संतप्त शेतकऱयांनी दिला आहे.

मंगळवारी सकाळी संतिबस्तवाड शिवारात रिंगरोडचा सर्व्हे करण्यासाठी अधिकारी गेले होते. या अधिकाऱयांना शेतकऱयांनी विरोध करीत पळवून लावले. पुन्हा दुपारी तीनच्या दरम्यान पोलीस फौजफाटय़ासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी सर्व्हे करण्यासाठी दाखल झाले. यावेळी शेतकऱयांनी आम्हाला नोटीस न देता दडपशाही मार्गाने सर्व्हे करणार आहात का, असा सवाल उपस्थित करून अधिकाऱयांना माघारी पाठविले. सर्कल, तलाठी व पीडीओ यांना नोटीस पाठवून देण्यात आली आहे. मात्र सर्व्हे करण्याबाबत शेतकऱयांना व्यक्तिगत नोटीस देणे बंधनकारक आहे, असे ऍड. प्रसाद सडेकर यांनी अधिकाऱयांना सांगितले.

रिंगरोड प्रस्तावाबाबत शेतकऱयांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. शेतकऱयांची पिकावू जमीन हडप करण्याचा कुटील डाव प्रशासनाने आखला आहे. या रिंगरोडमध्ये शेतकऱयांच्या पिकावू जमिनी जाणार आहेत. 33 गावांतील एकूण 1200 एकर जमीन रिंगरोडमध्ये जात आहे. हा रिंगरोड झाला तर अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.

रिंगरोडसंदर्भात बेळगुंदी, मुतगा, सांबरा, कडोली, होनगा, बेन्नाळी यासह इतर गावांमध्ये सर्व्हे करण्यासाठी कर्मचारी गेले होते. त्यांना विरोध करून सक्त ताकीद देण्यात आली होती. पुन्हा प्रशासनाने रिंगरोडसाठी सर्व्हे करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. मंगळवारी अचानकपणे शेतकऱयांना कोणतीही कल्पना न देता सर्व्हे करण्यासाठी अधिकारी गेले होते. त्यांना विरोध करून आपली सुपीक जमीन देणार नसल्याचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. यावेळी ऍड. प्रसाद सडेकर, महादेव बिर्जे, शावेर गोन्साल्विस, निंगाप्पा मेलगे, बसु सिद्दण्णावर, यल्लाप्पा भुजण्णावर, रामलिंग चन्नीकोप्पी, बाळू पाटील, मारुती होनगेकर, यल्लाप्पा कर्लेकर, जोतिबा आंबोळकर, मोहन वाणी, कृष्णा दिवटगे आदी शेतकरी उपस्थित होते.

Related posts: