|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उड्डाणपुलांच्या दर्जासमोर प्रश्नचिन्ह

उड्डाणपुलांच्या दर्जासमोर प्रश्नचिन्ह 

प्रतिनिधी/ बेळगाव

गोगटे चौक परिसरातील उड्डाणपुलाचा रस्ता आणि फुटपाथ खचल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तिसरे रेल्वेगेट येथे उड्डाणपूल उभारण्याच्या हालचाली सुरू असून सदर काम करण्याची जबाबदारीही बसवेश्वर उड्डाणपुलाचे काम केलेल्या कंत्राटदाराकडेच सोपविण्यात आली आहे. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वर्दळ असल्याने पुलाची उभारणी व्यवस्थित होईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वेमार्ग गेल्याने वर्दळ असलेल्या सर्व रस्त्यांवरील रेल्वे फाटकांवर उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. सध्या शहरात तीन ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी पूर्ण झाली आहे. पण जुना धारवाड रोड आणि गोगटे चौक परिसरात उभारण्यात आलेल्या बसवेश्वर उड्डाणपुलाचा काही भाग खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी बसवेश्वर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. पण पहिल्या पावसातच रस्ता आणि पुलावरील फुटपाथ खचला आहे. सदर रस्ता व फुटपाथ पावसाच्या पाण्याने खचल्याचे रेल्वे खात्याच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. पण काम करताना कामाच्या दर्जाची पाहणी करण्यात आली होती का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. सदर बसवेश्वर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. सदर कंत्राटदारालाच तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपूल उभारणीचे काम देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  तिसरे रेल्वेगेट येथे उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू करण्याच्यादृष्टीने रेल्वे खात्याचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. काम सुरू करण्याच्यादृष्टीने माती परीक्षण, मार्किंगचे काम करण्यात आले आहे. पण बसवेश्वर उड्डाणपूल खचला असल्याने कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अशातच सदर कंत्राटदार तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे काम करणार असल्याने पुलाच्या उभारणीचे काम दर्जेदार होणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. सदर रस्ता सहा पदरी असून अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पुलाची उभारणी होणार का? असे विविध प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल आणि महात्मा बसवेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता खचल्याने तिसरे रेल्वेगेट येथे उभारण्यात येणाऱया उड्डाणपुलाचे काम तरी व्यवस्थित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

Related posts: