|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » शिवनेरीच्या तिकीट दरात कपात; नवे तिकीट दर 8 जुलैपासून लागू

शिवनेरीच्या तिकीट दरात कपात; नवे तिकीट दर 8 जुलैपासून लागू 

 

ऑनलाइन टीम  /मुंबई : 

शिवनेरी व अश्वमेध बसेसने प्रवास करणाऱया प्रवाशासाठी खुशखबर आहे. एसटी महामंडळाकडून मुंबई-पुणे मार्गावर धावणारी शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. ही कपात 80 ते 120 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ते म्हणाले, कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून लागू होणार आहेत.

रावते म्हणाले, गेली 15 वर्षे मुंबई-पुणे मार्गावर ‘शिवनेरी’ बस सेवा देत आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा 7 मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात 435 फेऱया केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जाते. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दर कपात करण्यात आली आहे.