|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वदनी कवळ घेता

वदनी कवळ घेता 

पूर्वी सर्वत्र प्रचलित असलेली जमिनीवर बसून पंगती उठवण्याची प्रथा आता खेडय़ातदेखील उरलेली नाही. त्या पंगतींचा अनुभव आमच्या पिढीने भरपूर घेतला आहे. हॉलमध्ये सहा इंच पन्हा असलेल्या सतरंज्या समांतर पसरलेल्या असत. भोजनार्थींच्या रांगा समोरासमोर किंवा पाठीला पाठ लावून बसत. एक सेवक पत्रावळय़ांची चळत घेऊन धावत येई आणि पत्रावळय़ा मांडी. दुसरा सेवक रिकामी फुलपात्रे मांडून जाई. तिसरा सेवक द्रोण देऊन गेला की पुढला सेवक फुलपात्रात पाणी ओतून जाई. निम्मे पाणी पत्रावळीवर किंवा अंगावर उडायचे. गाण्याच्या मैफलीत सुरुवातीला वाद्यांचे सूर लावण्यात वेळ जातो तसा इथे देखील वेळ जाई. पाण्यानंतर ओळीने मीठ, लोणचे, पापडाचे तुकडे, गार भजी, सुकी भाजी, पुरी, घट्ट वरणाचा ठिपका घातलेल्या भाताच्या मुदी असे एकेक पदार्थ येत. पोटात खड्डा पडलेला असे. कोणीतरी कर्कश्श आवाजात श्लोक म्हटला की दुसरा कोणीतरी ‘करा सुरू, बसा’ म्हणे. एका बादलीत गरम वरण घेऊन सेवक येई. भाताच्या वाळलेल्या मुदीत वरणाने चैतन्य ओतले की मंडळी दोन घासात भात संपवीत आणि पानातल्या पुरी भाजीला हात लावेतो मसाले भात येई. मसाले भातात अख्खे शेंगदाणे, खोबऱयाचे काप आणि तोंडली नसली तर फाऊल धरीत असावेत. अख्ख्या जेवणात हा मसाले भात मला प्राणप्रिय वाटे. त्याच्या संगे उकडलेल्या बटाटय़ांची सुकी भाजी, मटकीची कोरडी उसळ आणि भरली वांगी बहार आणीत.

जिलबीबरोबर तोंडी लावण्यासाठी द्रोणात मठ्ठा मिळे. पण हल्ली विरोधकांमध्ये नि÷ावंतांना टिकवून धरण्याची जितकी ताकद उरलीय तेवढीच ताकद त्या द्रोणात असे. मंत्रीपद, विरोधी पक्ष नेतेपद भूषवलेले नि÷ावंत वेळप्रसंगी पक्ष फोडून सत्ताधारी पक्षाकडे धावतात तद्वत मठ्ठा द्रोण फोडून भाजीत किंवा भातात वाहवत जाई. फूटपाडे कालांतराने राजकारणाबाहेर फेकले जातात तसा तो मठ्ठा देखील पत्रावळीबाहेर वाहत मातीत जाई. 

या पंगतींची आठवण झाली की आजही आम्ही व्याकूळ होतो. बाजारातून जिलबी आणतो. ताकाला फोडणी देतो. मसाला भात शिजवतो. उकडलेल्या बटाटय़ांची सुकी भाजी, मटकीची कोरडी उसळ किंवा भरली वांगी करतो. पानं वाढून घेतो. कोणीतरी खडय़ा भसाडय़ा आवाजात श्लोक म्हटल्याचा भास होतो-वदनी कवळ घेता…

मग भुकेने तोंडाला पाणी सुटते तसेच नोस्टाल्जियामुळे डोळय़ातही पाणी तरळते.

 

Related posts: