|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवस्थान जमीन खरेदी-विक्री करणाऱयांवर कारवाई करणार

देवस्थान जमीन खरेदी-विक्री करणाऱयांवर कारवाई करणार 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे संकेत

प्रतिनिधी / कुडाळ:

सिंधुदुर्गसह कोकणला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. कोकणसाठी आतापर्यंत 50 लाख रुपयांचा निधी दिला, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. ज्यांच्याकडे देवस्थानच्या जमिनी लिलाव पद्धतीने आहेत. त्यापैकी अनेकांनी खंड भरला नाही. तसेच कर्ज वाढले, घरे बांधली, एवढेच नाही, तर तलाठय़ांना हाताशी धरून खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत जाधव यांनी दिले.

जाधव सोमवारी कुडाळ येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दीड वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत देवस्थानबाबतचे 40 पेक्षा जास्त निर्णय घेतले. देवस्थानच्या जमिनींपैकी 40 टक्के जमिनी या वहिवाटदारांकडे आहेत. त्यातून येणाऱया उत्पन्नातून देवस्थान मंदिराची पूजा, अर्चा साहित्य यांचा खर्च करायचा असतो. तसेच त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, तर 60 टक्के जागा ही लिलाव पद्धतीने दिली जाते. ही ठराविक काळासाठी दिली जाते. या जमिनीचा खंड दरवर्षी भरायचा असतो. दुर्दैव असेही खंड अल्प असूनही भरला जात नाही. काहींनी तर या जमिनींवर कर्ज काढले. तसेच खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. यावर कारवाई करावीच लागणार. निधी गोळा करून हिशोब दिला जात नाही. गैरव्यवहार तसेच मानकरी व पुजारी यांचेही वाद आहेत, असे ते म्हणाले. सध्या उत्पन्न 22 कोटी असून 50 कोटींपर्यंत ते वाढविण्यात येईल. विविध शाळा, संस्थांना विविध सामाजिक कामांसाठी निधी दिला जातो. रितसर मागणी केल्यास सिंधुदुर्गातील शाळांसाठी निधी दिला जाईल, असे जाधव म्हणाले.

देवस्थान जमिनीत सिंधुदुर्गचे प्रतिनिधीत्व हवे

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा प्रतिनिधी असावा, अशी मागणी पूर्वीपासून आहे. आज अतुल काळसेकर यांनी याकडे लक्ष वेधले आहे. येत्या तीन महिन्यांत रिक्त होणाऱया जागी एका महिला सदस्याला स्थान देण्यात येईल. नाव सूचवा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हय़ातील देवस्थान समितीच्या पदाधिकाऱयांनी जाधव यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.