|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तरंदळेत अजगर पोल्ट्रीत शिरला

तरंदळेत अजगर पोल्ट्रीत शिरला 

वृद्धाच्या हाताचा घेतला चावा : कोंबडय़ाही केल्या फस्त

कणकवली:

तरंदळे-गावठणवाडी येथील ज्ञानू शंकर सावंत (85) यांच्या घराच्या पडवीनजीकच्या पोल्ट्रीत थेट सहा फुटाचा अजगर शिरला. अजगराने दोन-तीन कोंबडय़ा फस्त करतानाच ज्ञानू सावंत यांच्या उजव्या हाताचा चावाही घेतला. ही घटना सोमवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली.

ज्ञानू यांच्या घराच्या पडवीनजीक त्यांची पोल्ट्री आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ज्ञानू पोल्ट्रीत गेले असता, तेथे टॉवेल असल्याचे वाटून त्यांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, टॉवेल नसून तो अजगर होता. अजगराने हाताचा चावा घेतल्याने ज्ञानू यांनी आरडाओरड केली असता, त्यांचे पुत्र अमित सावंत तेथे आले. अमित यांनी शेजारीच शेतीचे काम करीत असलेल्या ग्रामस्थांना कल्पना दिली व वडिलांना तात्काळ चारचाकीने कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

अजगर कोंबडय़ा फस्त करण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी घरावर चढून, कौले काढून भाल्याने त्याला टिपले. अजगराने काही कोंबडय़ाही गिळल्याचे आढळून आले. त्यानंतर अजगर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र, तो विषारी नसल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. ज्ञानू यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले.