|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महिलेच्या आत्मदहन इशाऱयाने तारांबळ

महिलेच्या आत्मदहन इशाऱयाने तारांबळ 

वैभववाडी नगर पंचायतीच्या कर्मचाऱयांनाही ठेवले कोंडून : हजेरी मस्टरवर मुलाला सही करण्यास विरोध दर्शविल्याच्या रागातून कृत्य

वार्ताहर / वैभववाडी:

वाभवे-वैभववाडी नगर पंचायतीच्या हजेरी मस्टरवर मुलाला सही करण्यास नगर पंचायतीने विरोध दर्शविल्याने व अनुकंपा अंतर्गत प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ करीत असल्याबाबत अनिता करकोटे यांनी नगर पंचायतीमध्ये धडक देऊन रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. याचवेळी नगर पंचायतीच्या कर्मचाऱयांना कोंडून ठेवले होते. अनिता करकोटे यांच्या रुद्र उतारामुळे मुख्याधिकारी व कर्मचाऱयांची पाचावर धारण बसली. मुख्याधिकारी कंकाळ यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून सचिन करकोटे याची मस्टरवर सही घेण्याची कर्मचाऱयांना सूचना केली, तर त्याचा अनुकंपाखाली नोकरीचा प्रस्ताव ताबडतोब जिल्हाधिकाऱयांकडे कर्मचाऱयांमार्फत प्रस्तावित केला आहे.

वाभवे वैभववाडी नगर पंचायतीमध्ये मनोहर करकोटे ग्रामपंचायतीपासून बरीच वर्ष शिपाई पदावर नोकरीला होते. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी सचिन करकोटे याला ठेवण्यात आले. मात्र, सचिनच्या मस्टरवर सहय़ा घेणे बंद केल्याने याच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी अनिता करकोटे यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी दाद मागून त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. अनिता करकोटे यांनी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नगरपंचायत कार्यालयाला आपल्या दोन मुलासह व रॉकेलचा कॅन घेऊन धडक दिली. आपल्या मुलाच्या मस्टरवर सहय़ा न घेतल्यास आपण येथे आत्मदहन करणार, असा इशारा दिला. आत असलेल्या कर्मचाऱयांना कडी लावून कोंडून ठेवले. या घटनेची उपस्थित कर्मचाऱयांनी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना फोनवरून माहिती दिली. अचानक उद्भवलेल्या प्रकारामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. मुख्याधिकारी कंकाळ यांनी उपस्थित कर्मचाऱयांना सचिन करकोटे यांच्या मस्टरवर सही करण्याची सूचना केली व त्याचा अनुकंपाखाली नोकरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांकडे ताबडतोब पाठवून देण्याची व्यवस्था केली. या प्रकारानंतर अनिता करकोटे यांनी कार्यालयाची कडी काढून आपले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, या प्रकरणामुळे सर्वसामान्यांना टोकाची भूमिका का घ्यावी लागते? तोपर्यंत प्रशासन डोळेझाक करून का असते? असा प्रश्न निर्माण झाला आहे.