|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सत्य बाहेर येण्यापूर्वी टीका नको

सत्य बाहेर येण्यापूर्वी टीका नको 

– तिवरेप्रकरणी शरद पवारांचा सबुरीचा सल्ला

प्रतिनिधी/ चिपळूण

तिवरे धरण दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त विशेष समितीला उचित चौकशी आणि त्यानंतर कारवाईसाठी आग्रह धरु, असे आश्वासन सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुर्घटनेतील बाधितांना दिले. चौकशीतून सत्य बाहेर येण्यापूर्वी कुणावरही टीका नको, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शिवाय शैक्षणिक, मूलभूत सोयीसुविधा आणि पुनर्वसन यासंदर्भात राज्य आणि केंद्राकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले..

   गेल्या मंगळवारी तिवरे येथील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेत भेंदवाडीतील 22 जण वाहून गेले आहेत. त्यातील 19 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही तीन बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेत जीवित तसेच आर्थिक हानी झाल्याने अनेक संसार उघडय़ावर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी शदर पवार यांनी सोमवारी सकाळीच दुर्घटनास्थळी भेट दिली. त्यांनी प्रथम भगदाड पडलेल्या धरणाची अवस्था पाहिली व उद्ध्वस्त झालेल्या भेंदवाडीची माहिती घेतली. त्यानंतर तेथील ग्रामदैवत व्याघ्रांबरी मंदिरात दुर्घटनेतील बाधितांच्या व्यथा जाणून घेतल्या.

   यावेळी तानाजी चव्हाण, अजित चव्हाण यांनी दुर्घटनेची वस्तूस्थिती कथन केली. धरणाला लागलेल्या गळतीची माहिती प्रशासन तसेच आमदार सदानंद चव्हाण यांना देण्यात आली होती मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची मोठी किंमत मोजावी लागली असल्याने या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाधितांचे पुनर्वसन, परिसरातील पाणी योजना, नादुरूस्त पूल, मृतांच्या कुटुंबातील वारसांना नोकरी, आर्थिक मदतीबाबत लक्ष देण्याची विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केली.

   बाधितांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, तसेच यंत्रणेला या दुर्घटनेची उचित चौकशी करायला सांगून योग्य कारवाईसाठी आग्रह धरू, असे सांगत मृतांच्या नातेवाईकांना आश्वासित केले. याचवेळी चौकशीतून सत्य बाहेर येण्यापूर्वी कुणावरही टीका नको अशी भूमिकाही त्यांनी मांडली. तिवरे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसल्याचे जाहीर करतानाच शैक्षणिक समस्या असेल तर सहय़ाद्री शिक्षण संस्थेच्या शेखर निकम यांच्याकडे संपर्क साधण्यास पवार यांनी सांगितले.

  आपण येथे भेट दिली यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. गेल्या 50 वर्षाच्या आपल्या राजकीय वाटचालीत अशा अनेक दुर्घटना पाहिल्या आहेत. प्रत्येकवेळी प्रशासन आपल्या पध्दतीने योग्य काम करीत आले आहे. कालच आपण एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर होतो. आपण तिवरे येथे जाणार असल्यासंदर्भात त्यांनी विचारणा केली व पहाणीनंतर तेथील काय सूचना आहेत तेही कळवण्यास सांगितले. यामुळे आपण येथील नुकसान आणि मागण्यासंदर्भात त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदतदेखील करण्यात आली.

   आमदार भास्कर जाधव यांनीही येथील बाधितांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे सांगितले. याबाबत राज्य सरकारशी पाठपुरावा करूच, शिवाय पवार यांनीही केंद्र व राज्याकडून खास बाब म्हणून या भागाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम, आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, पंचायत समिती सभापती पूजा निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सभापती शौकत मुकादम, चिपळूणच्या प्रांताधिकारी कल्पना जगताप, तहसीलदार जीवन देसाई आदी उपस्थित होते..

चौकट

  जिल्हा मध्यवर्ती बॅंक सात घरे बांधणार

  या दुर्घटनेत एकूण 16 घरांचे नुकसान झाले असून त्यातील सात घरे बांधून देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, शेखर निकम यांच्यासह संचालकांनी घेतला असल्याचे आमदार जाधव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्या उपस्थितीत यावेळी जाहीर केले.