|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » देवरुख आगारातही पास घोटाळा

देवरुख आगारातही पास घोटाळा 

500 रुपयांच्या घोटाळ्याचीही गंभीर दखल

प्रतिनिधी/ देवरुख

राजापूरच्या पाठोपाठ देवरुख एसटी आगारामध्ये पास घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळय़ाची रक्कम मोठी नसली तरी एस्टी प्रशासनाने हा विषय गंभीरपणे घेतला आहे. 500 रुपयाचा हा घोटाळा आहे. याप्रकरणी एका कर्मचाऱयाला निलंबित करण्यात आले आहे. 

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एस्टी मध्ये त्यांच्याच काही कर्मचाऱयांकडून केले जाणारे घोटाळे उघड होत असल्याने मोठय़ा टिकेला सामोरे जावे लागत आहे. राजापूर येथे उघडकीस आलेला पास घोटाळा ताजा असतानाच देवरूख आगारातही पास घोटाळा पुढे आला आहे. आगारप्रमुख मृदूला जाधव यांनी वेळीच लक्ष घातल्याने हा घोटाळा 500 रुपयावरच येवून थांबला आहे.

पास खिडकीतून 2500 रुपयांचा पास प्रवाशाला दिला गेला. मात्र हिशोब देताना 2 हजाराचाच देण्यात आला. वरील 500 रुपये या कर्मचाऱयाने जमा केलेच नाहीत. हिशोब तपासणीत ही गोष्ट उघडकीस आली. आगारप्रमुख मृदूला जाधव यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेत संबंधित कर्मचाऱयाला निलंबित केले आहे.

ही घोटाळय़ाची रक्कम मोठी नसली तरी, वेळीच कारवाई केल्याने आगारप्रमुखांचे कौतुक होत आहे. दररोज असे 200 ते 500 रुपये कमी जमा झाले असते तर ही रक्कम वाढतच गेली असती. मात्र आगारप्रमुखांच्या चाणक्षामुळे पुढील मोठा घोटाळा टळल्याचे म्हटले जात आहे. संबंधित कर्मचाऱयाला निलंबित केल्याने कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.