|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पगारासाठी परिवहन कर्मचारी चढले पाण्याच्या टाकीवर

पगारासाठी परिवहन कर्मचारी चढले पाण्याच्या टाकीवर 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱयांचा पगार गेल्या 14 महिन्यांपासून थकीत आहे. तो थकीत पगार मिळावा म्हणून महापालिकेतील परिवहन विभागातील कर्मचाऱयांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर चढून सोमवारी ‘शोले’स्टाईल आंदोलन केले. 14 महिन्यांचा पगार न झाल्यास पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका कर्मचारी आणि प्रहार संघटनेने घेतली आहे.

  महापालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱयांचे बेमुदत आंदोलन गेल्या 11 दिवसांपासून सुरू आहे. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी परिवहन सभापती गणेश जाधव यांनी बैठक घेतली होती. परंतु बैठकीत प्रशासन हे 1 महिन्याचा पगार देण्यासाठी तयार होते. तर परिवहन कर्मचारी थकीत 14 ही महिन्याचा पगार द्यावा, यावर ठाम होते. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. यापूर्वीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून परिवहनच्या कर्मचाऱयांनी वेळोवेळी निवेदने दिली. भीक मांगो आंदोलन, अर्धनग्न आंदोलन केली आहेत. महापालिकेवर मोर्चे काढले होते. परंतु थकीत पगाराचा प्रश्न मार्गी लागला नाही. परिणामी सोमवारी, परिवहन कर्मचारी आणि प्रहार संघटनेच्या माध्यमातून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले.

    महाराष्ट्र शासनातील कर्मचारी आणि महापालिकेतील कर्मचाऱयांना ज्या पद्धतीने पगार मिळतात. त्याच पद्धतीने परिवहन विभागातील कर्मचाऱयांना वेळेवर पगार मिळावेत. परिवहन विभागातील कर्मचाऱयांना महापालिकेत सामावून घ्यावे. याही मागण्या असल्याचे समीर शेख यांनी सांगितले. यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के-पाटील, शहरप्रमुख अजित कुलकर्णी, शहरसंपर्क प्रमुख जमीर शेख, शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार, शहर उपप्रमुख मुस्ताख शेख, परिवहन विभागाचे कर्मचारी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

कामगारांचा हल्लाबोल

हल्लाबोल, हल्लाबोल, कामगारांचा हल्लाबोल. या शासनावर हल्लाबोल. पगार आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. हम सब एक है. कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. या आयुक्ताचं करायचं काय, आदी घोषणा हातात तिरंगा झेंडा घेवून परिवहन कर्मचारी आणि प्रहारच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिल्या.

Related posts: