|Friday, October 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘राज’कीय वळण

‘राज’कीय वळण 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने सध्या राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ईव्हीएम मशिनच्या मुद्दय़ावर ही भेट झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यामागे ‘राज’कीय डावपेच असू शकतात, असे मानण्यास निश्चितच जागा आहे. एकेकाळी गुजरात पॅटर्नचा पुरस्कार करणाऱया राज यांनी अलीकडे आपले वळण बदलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज यांनी मोदींविरोधात उठवलेले रान होय. भाषणातील प्रभावी मुद्दे, ती ऐकण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी यामुळे राज यांच्या सर्वच सभा गाजल्या. तथापि, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खऱया अर्थाने तापवणाऱया राज यांना या प्रतिसादाचे मतदानात रूपांतर करण्यात अपयश आले. राज यांचा प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग नसो. पण, त्यांच्या भूमिकेचा काही प्रमाणात का होईना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला लाभ होईल, असे मानले जात होते. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला केवळ सहा जागांवर समाधान लागले. तर शिवसेना-भाजपाने 41 जागांवर मुसंडी मारत आपला दबदबा कायम राखला. हे पाहता आगामी विधानसभा निवडणूक विरोधकांसाठी सोपी नाही,  हे स्पष्टच आहे. त्यामुळे अस्तित्व टिकविण्याच्या भूमिकेतून राज व सोनिया यांची भेट झाली असणार, हे वेगळे सांगायला नको. राज यांचे परप्रांतीयांविरोधातील धोरण सर्वश्रुत आहे. त्यामुळेच काँग्रेससाठी कालपरवापर्यंत राज अडचणीचे ठरत होते. म्हणूनच राज यांच्याशी थेट हातमिळविणी करण्याचे पक्षाने टाळल्याचे दिसून येते. आता हा विचार कदाचित बदलला असावा. मनसेला दूर ठेऊनही राज्यात पक्षाला अवघी एक जागा कशीबशी मिळत असेल, तर राज यांना घेतल्यास बिघडले कुठे, असा विचार त्यामागे असू शकतो. मुळात आज काँग्रेसकडे गमावण्यासारखे काही नाही. एकप्रकारे शून्यापासूनच त्यांना सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे मनसेला सामावून घेण्याचे धाडस दाखविण्याच्या ते तयारीत आहेत. अनेक काँगेस नेत्यांनीही विधानसभेत टिकाव धरण्यासाठी मनसेला सोबत घेण्याकरिता अनुकूलता दर्शविली आहे. तसे झाल्यास आजतरी ते राजकीय शहाणपणच मानता येईल. वास्तविक, निर्णय न घेणे, हादेखील एक निर्णय आहे, अशाप्रकारची मानसिकता, हा काँग्रेसचा स्थायीभाव. स्वाभाविकच हायकमांडकडून अजून हिरवा कंदीला मिळालेला नसल्याचे कारण देत अनेक धोरणात्मक निर्णय पक्षाकडून प्रलंबित ठेवले जातात. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. हे पाहता त्या आधी काँग्रेसवाले आघाडी व घटक पक्षांचा हा गुंता सोडवतील, अशी आशा करायला हरकत नाही. मनसे म्हणजे बोलून चालून पुनर्निर्माण. म्हणजे शिवसेनेतून फुटून अंकुललेला हा पक्ष. राज यांच्या एकखांबी नेतृत्वातून पुढे आलेल्या या पक्षाने प्रारंभीच्या काळात घेतलेली झेप तशी थक्क करणारी म्हणता येईल. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांनी लाख, दीड लाख मते घेत अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले, तर विधानसभा निवडणुकीत 13 जागांपर्यंत मुसंडी मारत दमदार एन्ट्री केली. नाशिकसारख्या महानगपालिकेवरही मनसेने झेंडा फडकवला. अर्थात नुसतेच यश मिळून चालत नाही, ते राखावे लागते. तिथेच मनसेचे इंजिन गडबडले. तशी राज यांची ब्लू प्रिंटही चांगली होती. फक्त तिचे टायमिंग चुकले. नाशिकमध्येदेखील पक्षाने नक्कीच काही चांगली कामे केली असतील. त्यांच्या काही लोकप्रतिनिधींची कामगिरीही उजवी असेल. पण, प्रॅक्टिकलली मनसेला ठसा उमटविता आला नाही. त्यात मोदी लाटेमुळे पक्षाची आणखी वाताहत झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी आपले निवडून आलेले खासदार केंद्रात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे जाहीर केले होते. हा द्राविडी प्राणायाम करण्याऐवजी मतदारांनी सेना-भाजपाच्याच पारडय़ात मते टाकत मनसेला निष्प्रभ ठरविले. हे शुक्लकाष्ठ जैसे थे असल्याने मनसेपुढचे आव्हान अधिक कठीण असेल. त्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी कसोटीच ठरावी. स्वाभाविकच या पडत्या काळात सावरायचे असेल, तर कुणाची ना कुणाची साथ घेण्यावाचून मनसेला पर्याय नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज यांचे अलीकडे सूर जुळल्यासारखे दिसतात. राज यांनी पुण्यात पवार यांची घेतलेली मुलाखत, हा त्यासाठीचा टर्निंग पॉईंट मानला जातो. सोनिया व राज यांच्यातील तीस-पस्तीस मिनिटांतील चर्चाही पुढे याच वळणाने गेली, तर नवल मानायचे कारण नाही. मोदी लाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव, उद्धव ठाकरे यांची साथ यामुळे महायुतीची बाजू मजबूत आहे. स्वाभाविकच त्यांना टक्कर देणे, सोपे नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या समदु:खी पक्षांना मूठ बांधावीच लागेल. शिवसेनेने राज यांच्या भूमिकेची खिल्ली उडविली, असली तरी त्यांचा इतिहास वेगळा नाही. एकेकाळी सेनेनेही काँग्रेसला पाठिंबा दिला होता, हे विसरता येत नाही. इतकेच काय गमतीने सेनेचा उल्लेख वसंतसेना, असादेखील केला जात असे. आज याच मार्गाने मनसे जात असेल, तर धक्कादायक काही मानता येत नाही. विरोधकांचे गणित बिघडविणाऱया वंचित बहुजन विकास आघाडीचा स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याकडे कल आहे. वंचितही ही रणनीती महायुतीसाठी फायदेशीर, तर महाआघाडीसाठी मारक आहे, हे वेगळे सांगायला नको. लोकसभेत वंचितने आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहेच. त्यामुळे राजकीय अपरिहार्यतेपोटी का होईना हे त्रिकूट एकत्र येण्याची दाट शक्यता संभवते. मनसेचा मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या शहरातील प्रभाव नाकारता येत नाही. शिवाय राज यांच्या माध्यमातून स्टार प्रचारकही पक्षाला उपलब्ध होऊ शकतो. राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरुपी मित्र वा शत्रू नसतो, असे म्हणतात. सगळय़ा आघाडय़ा, युत्या या फायद्यासाठीच असतात. विचारसरणी वगैरे हा मुद्दा गौण ठरतो. निदान आजचे राजकारण तरी त्याच वळणाचे आहे. आता मनसेमुळे तरी आघाडीमध्ये थोडी जान येते का, तेच पहायचे.