|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हतबल कर्मचाऱयानेच ठोकले टाळे

हतबल कर्मचाऱयानेच ठोकले टाळे 

दोडामार्ग दूरध्वनी कार्यालयातील प्रकार : आंदोलनाची कल्पना देऊनही वरिष्ठांची अनुपस्थिती

प्रतिनिधी / दोडामार्ग:

  तिलारी परिसरात बीएसएनएलला गेल्या महिनाभरापासून रेंज नसल्याने जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी मंगळवारी दोडामार्ग दूरध्वनी कार्यालयाला धडक दिली. आंदोलन नियोजित असूनही अधिकारी मात्र अनुपस्थित होते. कार्यालयात उपस्थित असलेल्या लिपीक पी. बी. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना उत्तरे देण्यास असमर्थता दर्शवित आंदोलनकर्त्यांसमवेत कार्यालयाला टाळे ठोकले.

 तिलारी परिसरातील मोबाईल टॉवर गेल्या महिनाभरापासून बंद आहे. या भागात अन्य कंपनीची रेंज नसल्याने ग्राहकांनी बीएसएनएलची सीमकार्ड घेतली आहेत. त्यामुळे या भागात ग्राहकसंख्या मोठी आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून संपर्क यंत्रणा बंद आहे. अर्ज, निवदेने, अधिकाऱयांना फोन या गोष्टी करूनही रेंज सुरू झाली नसल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सरपंच सेवा संघ तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत यांच्यासह महेश लोंढे, हर्षद नाईक, महेश चिरमुरे, रत्नकांत कर्पे, भाजप शहरअध्यक्ष योगेश महाले, शक्तीप्रमुख समीर रेडकर आदी दोडामार्ग दूरध्वनी कार्यालयात हजर झाले.

एका महिन्याचे रिचार्ज वाया!

  या आंदोलनावेळी गेले एक महिना टॉवर बंद का, कधी सुरू होईल. एक महिना साधारण एक हजार ग्राहकांचे 199 रुपयांप्रमाणे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ते कोण देणार? असे अनेक सवाल श्री. म्हापसेकर यांनी केले. वरिष्ठांना आंदोलनाची कल्पना असूनही कार्यालयात आले नाहीत. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तो पर्यंत आपणही कार्यालयाबाहेर थांबतो, असे लिपीक पाटील यांनी यावेळी सांगितले.

आपत्ती आल्यास संपर्क कसा साधायचा?

  यावेळी श्री. म्हापसेकर म्हणाले, या परिसरात धरण आहे. तिवरे धरण फुटल्याने ग्रामस्थांत भीती आहे. शिवाय या भागात पाऊस जास्त असल्याने आपत्तीजन्य स्थिती असते. अशावेळी संपर्क साधण्यासाठी बीएसएनएलचीच संपर्क यंत्रणा महत्त्वाची असून ती महिनाभरापासून बंद आहे.