|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सर्वपक्षीय जेलभरो आंदोलनाचा इशारा

सर्वपक्षीय जेलभरो आंदोलनाचा इशारा 

‘हायवे आंदोलन’ चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप : मंत्र्यांचा कल अधिकाऱयांकडे, जनता वाऱयावर!

प्रतिनिधी / कुडाळ:

मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या दूरवस्थेविरोधात झालेले आंदोलन शासनाने चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन घेतलेली भूमिका व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ज्या पद्धतीने पाहून महामार्गाच्या दूरवस्थेकडे दुर्लक्ष केले, त्याच्या निषेधार्थ सर्वपक्षियांतर्फे येत्या मंगळवारी कुडाळ येथे जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला.

मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष अमित सामंत व मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब हे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महामार्गाच्या अधिकाऱयांनी रस्ता सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य नियोजन न केल्याने व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत 50 जणांचे बळी गेले, असे सांगण्यात आले. या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातलग व अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

मंत्री अधिकाऱयांकडे झुकले आहेत!

महामार्गाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. अनेकांचे बळी गेले असताना दिलीप बिल्डकॉन या ठेकेदारासह अधिकाऱयांना पाठिशी घालणारे भाजप-शिवसेनेचे नेते, मंत्री यांना जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय एकत्र आल्याचे अमित सामंत यांनी सांगितले. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंता शेडेकर यांच्या घरी जाऊन खुनाचे कलम संशयित आरोपींना लावायला सांगितले होते, असे सांगणे म्हणजे मंत्री अधिकाऱयांकडे झुकल्यासारखे आहेत, असेच म्हणावे लागेल. सिंधुदुर्गातील जनतेचा हा अपमान असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मंत्र्यांची टिपणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी!

मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महामार्ग दूरवस्थेच्या आंदोलनाबाबत केलेली ही टिपण्णी म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते काका कुडाळकर यांनी सांगितले. बांधकाममंत्र्यांनी हायवेची कधी पाहणी केली नाही. प्रत्येक वेळी आढावा बैठक घेतल्याचे सांगतात. त्यांनी बैठकीचे इतिवृत्त जाहीर करावे. म्हणजे त्यांनी लोकांच्या कोणत्या अडचणी समजून घेतल्या, ते लोकांना समजेल. आंदोलनाबाबत त्यांनी जी भाषा वापरली, त्याचा निषेध करतो, असे सांगून प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्याची दक्षता त्यांनी घेतली नाही. याबाबत ते साधा चकार शब्द काढत नाहीत. शेडेकर या एकाच अधिकाऱयावर सर्व जबाबदारी का सोपविली जाते? पालकमंत्र्यांना झाराप ते कसालपर्यंतच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ नसल्याचे ते म्हणाले.

निष्क्रिय जिल्हाधिकाऱयांना संवेदना समजत नाही!

चंदकांत पाटील हे आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देतात. म्हणजे हा विरोधकांना ठेचण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला. जिल्हाधिकारी निष्क्रिय आहेत. त्यांना जिल्हय़ातील लोकांच्या संवेदना समजत नाहीत. आतापर्यंत 50 जणांचा हायवेवर मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. याला सर्वस्वी ठेकेदार व अधिकारी जबाबदार आहेत. महामार्गावरील खड्डे व डायव्हर्शन डांबरीकरणाने भरायला हवेत. मात्र, कंपनी ही कामे न करता हे पैसे स्वत:च्या खिशात घालते. ठेकेदार व शासनाच्या कराराप्रमाणे काम करून घेण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे.  त्यामुळे आता सर्व पक्षियांनी संघटीतपणे आवाज उठवूया, असे त्यांनी सांगितले.

भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचार-गवस

हायवेची भूसंपादन व पैसे वाटप प्रक्रिया चुकीची असून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरेश गवस यांनी केला. जिल्हाधिकारी, कुडाळचे प्रांताधिकारी, कार्यालयातील कारकून व हायवेचे अभियंता शेडेकर व सहकाऱयांचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रांत कार्यालयात चुकीच्या पद्धतीने जागेचे पेमेंट देण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून त्यांनीही दुर्लक्ष केले. बांधकाममंत्र्यांनीही यात लक्ष घातले नाही, असे ते म्हणाले.

चांगले काम करून घेण्यात पालकमंत्री अपयशी

रस्ता व पूल यांच्यात लेव्हल नाही. महामार्ग उंच-सखल झाल्याचे सांगत भविष्यात अपघात होण्याची भीती सुरेश गवस यांनी व्यक्त केली. पावसात अजूनही रस्ते व काँक्रिटीकरण खचेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गच्या जनतेच्या हितापेक्षा कंपनी मोठी नाही, असे ते म्हणाले. कसाल-वेताळबांबर्डे येथील पूल अपूर्ण आहेत. काम चांगल्या प्रकारे करून घेण्यात पालकमंत्र्यांना अपयश आल्याचे सावळाराम अणावकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी हटाव मोहीम राबवावी, असे धीरज परब यांनी सांगितले.

साळगावकरांची पुन्हा केसरकरांवर टीका

आपले गेल्या 20 वर्षांतील जवळचे सहकारी दीपक केसरकर हे आमदार-पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल आणि त्यांची जनतेशी तुटलेली नाळ यामुळे त्यांच्यासोबत आता काम करणे आपणास जमणार नाही, अशा शब्दांत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केसरकरांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. केसरकर यांनी जनतेची कामे न करता हा कार्यकाळ त्यांनी एन्जॉय केला. आपले अपयश झाकण्यासाठी आता ते लोकांवर दबाव टाकतात, अशी टीका करीत लोकांच्या प्रश्नांसाठी आपण रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. कालच आपल्याला निरोप मिळाला, जे कणकवलीला घडले ते सावंतवाडीतही होऊ शकते. कोणाची हिंमत असेल, तर गुन्हे दाखल करून दाखवा, असे आव्हानच साळगावकर यांनी केसरकर यांचे नाव न घेता दिले.

पालकमंत्र्यांबरोबर काम करणे जमणार नाही!

साळगावकर म्हणाले, महामार्गाच्या दूरवस्थेमुळे कणकवलीत उद्रेक झाला. त्यानंतर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. तुम्ही म्हणाल पालकमंत्र्यांच्या जवळचे साळगावकर आज इथे कसे? तर गेली 20 वर्षे आपण व केसरकर एकत्र काम करीत होतो. ते आमदार व्हावे, असे आम्हाला वाटत होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, आमदार झाल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल खूपच वेगळा आहे. केसरकर आमदार झाल्यावर आम्ही स्थिरावू, असे वाटले होते. मात्र, त्यांची भूमिका पाहून या माणसाबरोबर आपणास काम करणे आता जमणार नाही. यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी नमूद केले.

अपयश झाकण्यासाठी जनतेवर दबाव!

पालकमंत्री म्हणून त्यांना येथील प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याचे सांगत शिरोडा, सावंतवाडी, आंबेगाव, कलमठ येथे तीन आंदोलने होत आहेत. हे पालकमंत्र्यांचे अपयश आहे. मात्र, अपयश झाकण्यासाठी ते संबंधितांवर दबाव टाकतात. मात्र, आपण दबावाला बळी न पडता रस्त्यावर उतरून जनतेसाठी आंदोलन करणारच, असेही साळगावकर यांनी सांगितले.