|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जनतेचा उद्रेक शांत करणे कठीण जाईल!

जनतेचा उद्रेक शांत करणे कठीण जाईल! 

महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर यांचा इशारा

वार्ताहर / कणकवली:

आतापर्यंत लोकशाही मार्गाने अर्ज, निवेदने, आंदोलने करूनही हायवे बाधीत व प्रकल्पग्रस्तांच्या एकाही मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. अनेक कुटुंबे हायवे बाधीत झाली असतानाही शांततेत आंदोलने करण्याचे फळ काय? या उलट जनतेच्या व हायवे बाधितांच्या समस्या मांडून नीतेश राणे यांनी जनतेचा उद्रेक दाखवून दिला आहे. यापूर्वी हायवेच्या प्रत्येक आंदोलनात राणे यांनी प्रकल्प बाधितांची बाजू घेत, पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता या उद्रेकानंतर प्रशासन व शासनाने दखल घेत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा जनतेचा उद्रेक शांत करणे कठीण जाईल, असा इशारा महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर यांनी दिला आहे.

प्रसिद्धी पत्रकात वरवडेकर म्हणतात, महामार्ग चौपदरीकरणात सर्वाधिक नुकसान कणकवली शहराचे झाले. सुमारे 50 व्यापारी व उद्योजक या चौपदरीकरणात बाधीत झाले. महामार्गालगत ही वसलेली बाजारपेठ उद्ध्वस्त होत अनेकांचे संसार वाऱयावर आले. मात्र, शासनाने याची दखलच घेतली नाही. हायवेप्रश्नी शांततामय मार्गाने अनेक आंदोलने केली. मूक मोर्चा काढले, कणकवली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी उपोषण केले. सुमारे 35 हून अधिक अर्ज दिले. तरीही याबाबत कोणतीच दखल शासन व प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. आतापर्यंत शांततामय आंदोलने केली ही आमची चूक होती का? आमदार  राणे यांनी अधिकाऱयांवर चिखल उडविल्यानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. मात्र, त्याच अधिकाऱयांच्या चुकांमुळे अनेक कुटुंबे, व्यावसायिक चिखलात गेले. मात्र, याची जराही खंत शासनाला वाटली नाही. सर्वसामान्यांना कायद्याचा बडगा दाखवून आंदोलने चिरडून टाकायचे काम शासन व प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विकास करताना सर्वसामान्य नागरिक उद्ध्वस्त होणार नाही, हे पाहणे शासनाचे कर्तव्य आहे. ते शासनाने पाळले पाहिजे. अन्यथा यापुढे जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही.