|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आमदार राणेंसह सर्वांना न्यायालयीन कोठडी

आमदार राणेंसह सर्वांना न्यायालयीन कोठडी 

जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज : प्रकृती बिघडल्याने होणार पाच संशयितांवर उपचार

कणकवली:

महामार्ग व सर्व्हिस रोड दूरवस्थेच्या पाहणीदरम्यान संतप्त होऊन महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर बादल्या भरून चिखल ओततानाच त्यांना बांधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेल्या आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आदींसह 19 जणांच्या कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. एस. ए. जमादार यांनी संशयितांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची पोलिसांची मागणी फेटाळली व संशयिताना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.

नीतेश राणे, मेघा गांगण, संजय कामतेकर, राकेश राणे, विठ्ठल देसाई यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार व्हावेत, अशी मागणी संशयितांच्या वकिलांनी केली. त्यानुसार न्या. जमादार यांनी या पाचजणांवर वैद्यकीय उपचार व्हावेत, असे आदेश सावंतवाडीच्या कारागृह अधिकाऱयांना दिले. सरकार पक्षातर्फे ऍड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. दरम्यान, संशयितांना जामीन मंजूर व्हावा, यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती संशयितांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली.

4 जुलैला घडलेल्या या घटनेची खबर महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी पोलिसांत दिली होती. महामार्ग चौपदरीकरणांतर्गत झालेल्या दूरवस्थेची पाहणी करताना संशयितांनी चिखलाने भरलेल्या दोन बादल्या शेडेकर यांच्या अंगावर ओतत त्यांना पुलाला बांधण्याचाही प्रयत्न करतानाच पुढे चिखलाच्याच कपडय़ांनी शेडेकर यांना रस्त्याची पाहणी करायला लावली होती. शेडेकर यांच्या या तक्रारीनुसार 19 जणांना अटक व पोलीस कोठडीत रवानगी झाली होती. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले.

कोठडी वाढविण्याची मागणी

यावेळी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ऍड. गजानन तोडकरी यांनी, या गुन्हय़ात शेडेकर यांच्यावर चिखल ओतण्यासाठी वापरलेल्या तीन बादल्या तसेच या बादल्या व चिखल आणण्यासाठी वापरेली वॅगनर कार व ऍक्टिवा दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. शेडेकर यांना 3 जुलैला ‘कणकवलीत भेटायला या’ असे सांगण्यासाठी ज्या क्रमांकावरून संपर्क केला गेला होता, तो व संशयित संदीप सावंत याचा मोबाईल असे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. फिर्यादी शेडेकर यांचे चिखलाने भिजलेले कपडेही जप्त करण्यात आले आहेत. मात्र, गुन्हय़ात वापरलेली काही वाहने जप्त करायची आहेत. तसेच संशयित अद्यापही पसार असून त्यांना अटकेतील संशयित ओळखतात. म्हणूनच अटकेतील संशयितांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांनी वाढ करावी, अशी मागणी केली.

सावंतवाडी कारागृहात हलविणार

संशयितांतर्फे युक्तिवाद करताना ऍड. संग्राम देसाई यांनी, पोलिसांना तपासासाठी पाच दिवस मिळाले होते. काही वस्तू जप्तही करण्यात आल्या आहेत. साहजिकच पोलीस कोठडी वाढविण्यासाठी विशेष कारणच नसल्याने संशयितांची पोलीस कोठडी वाढवू नये, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. एस. ए. जमादार यांनी संशयितांना न्यायालयीन कोठडी दिली. संशयितांची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करून नंतर त्यांना सावंतवाडी येथील कारागृहात नेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोख पोलीस बंदोबस्त

मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करताना कार्यकर्ते, नागरिक मोठय़ा संख्येने जमण्याची शक्यता लक्षात घेऊन अगदी दुपारी एक पूर्वीच न्यायालय परिसरात पोलीस मोठय़ा संख्येने तैनात करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके, वेंगुर्लेचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी आदी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. दुपारी तीनच्या सुमारास संशयितांना न्यायालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हाताचे कडे करून संशयितांना न्यायालयात नेले. 3.15 च्या सुमारास न्यायालयीन सुनावणी सुरू झाली. सुनावणीप्रसंगी माजी खासदार नीलेश राणे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आदींसह स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते.