|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » एक जीव जन्मा घालूनी मादी माकडाने सोडीला प्राण…

एक जीव जन्मा घालूनी मादी माकडाने सोडीला प्राण… 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

येथील यल्लामा चौकातील मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चिंचेच्या झाडावर एका माकड मादीने पिल्लाला जन्म देऊन जीव सोडला. महाराष्ट्र ऍनिमल रिट्रायविंग असोसिएशनच्या प्राणिमित्रांनी पिल्लावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले. तर वनविभागाच्या लोकांनी मृत मातेला खाली उतरवून अंत्यसंस्कार केले. पिल्लाची प्रकृती चांगली असून माते विना पोरक्या झालेल्या या पिल्लास कात्रज येथील वन्यजीव अनाथालयामध्ये पाठवण्यात येणार असल्याचे प्राणीमित्रांनी सांगितले.

     येथील श्री यल्लम्मा देवीच्या मंदिरामागील चिंचेच्या झाडावर शुक्रवारी सकाळी  8 वाजल्यापासून एक मादी माकड तडफडत होते. झाड उंच असल्यामुळे लोकांना काही समजत नव्हते. साडे नऊ वाजेपर्यंत तिची हालचाल कमी होवून तिने प्राण सोडला. पण त्यापुर्वीच या झाडावर या मादी माकडाने एक जीव जन्माला घातला.  पिलाला कशाचाही आधार नसल्यामुळे ते झाडावरून खाली असलेल्या घराच्या पत्र्यावरती पडले. तिथे राहणाऱया लोकांनी त्याला खाली घेऊन दूध पाजले व उबे साठी एका कापडात गुंडाळून ठेवले. पण याच पुढं काय करायचं याचा त्यांना प्रश्न पडला होता. तिथे बघ्यांची ही गर्दी वाढलेली होती.

    दरम्यान त्यातील एका व्यक्तीने महाराष्ट्र ऍनिमल रिट्रायविंग असोसिएशनच्या प्राणिमित्रांना संपर्क करून माहिती दिली. तेव्हा संस्थेचे अध्यक्ष प्राणीमित्र विकास माने, विवेक शेटे व रणजित औताडे तेथे आले व त्यांनी या पिल्लाची पहाणी करुन वनविभागाच्या अधिकाऱयांना कळवले. पिल्लाला वैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. वनविभागाच्या लोकांनी त्या म्त मादीला खाली काढून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पिल्लू आता चांगल्या स्थितीत असून त्याला कात्रज येथे वन्यजीव अनाथालय मध्ये पाठवण्यात येणार आहे.

          महाराष्ट्र अनिमल रिट्रायविंग असोसिएशन(ए. आर. ए.) या संस्थेचे सध्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी व बेळगाव या जिह्यांमध्ये निसर्ग संवर्धनाचे काम चालू आहे. संस्थेमार्फत आजपर्यंत मानवी वस्तीमध्ये आलेले 30 हजारांहून अधिक साप व 7 मगरी पकडून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले आहे. तसेच 500 हुन अधिक जखमी पक्षी, 300 हुन अधिक जखमी प्राणी यांच्यावर वैदयकीय उपचार करून जीवदान दिले आहे. तसेच मागील वर्षी “रोज एक शाळा सर्पजनजागृती” हा उपक्रम राबवून 50 हजाराहून अधिक मुलांना सापांविषयी माहिती दिली आहे.

 

मध्यान्ह भोजनात मिळणार भाकऱया

 

वार्ताहर

सोन्याळ

केंद्र सरकारपुरस्कृत शालेय पोषण आहार अर्थात मध्यान्ह भोजन योजना पहिली ते  आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता लागू आहे. यापुढे आहारात आता ज्वारी, बाजरी आणि नाचणीची भाकरी मिळणार आहे.

  ऑक्टोबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीसाठी शाळांना किती ज्वारी, बाजरी आणि नाचणी लागेल याची माहिती जिल्हा परिषदांकडून शासनाने मागवली आहे. विद्यार्थी संख्येनुसार प्रतिविद्यार्थी प्रतिदिन अनुक्रमे शंभर ग्रॅम व दिडशे ग्रॅम प्रमाणे तांदूळ अथवा इतर धान्य मंजूर केले जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता येण्याकरिता तांदळाची मागणी 25 टक्क्यांनी कमी करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी व बाजरी या धान्यांचा वापर ऑक्टोबरपासून करण्याबाबतचा आदेश धडकला आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी हा आदेश दिला आहे. या आदेशाने यापुढे शाळांमध्ये भाकरीही द्याव्या लागणार  आहेत.

  शालेय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग रायगड येथे पाच व सहा जून रोजी राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डायट चे प्राचार्य यांची शिक्षण परिषद झाली. या परिषदेत शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा झाली. योजनेची प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. त्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिह्यांनी तांदळाची मागणी 25 टक्क्यांनी कमी करावी. त्याऐवजी ज्वारी, बाजरी व नाचणी या धान्यांचा वापर करून विविध पाककृती जिल्हास्तरावर निश्चित करण्याचे सुचविण्यात आले. ज्वारी, नाचणी व बाजरी या धान्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना देण्याकरिता विविध पदार्थ जिल्हास्तरावर निश्चित करायच्या आहेत. या निश्चितीनंतर ऑक्टोबर 19 ते मार्च 20 पर्यंतची ज्वारी, बाजरी व नाचणीची मागणी शाळांनी इयत्ता तपशील, पटसंख्या, शाळेचे कार्य दिवस यानुसार विहित नमुन्यात नोंदविण्याचे कळविण्यात आले आहे.

  चौकट

  या आदेशाच्या अंमलबजावणीने यापुढे शाळांत भातासोबत ज्वारी, बाजरी, नाचणीची  भाकरीचा समावेश होणार आहे. मात्र, भाकरीसाठी लागणारा वेळ आणि सध्या स्वयंपाकी महिलेला मिळणारे मासिक एक ते दोन हजार हजारांचे अल्प मानधन यात कशी सांगड घालायची, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा राहणार हे निश्चित आहे.