|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जागा दिल्यास तत्काळ पाचशे स्क्वेअर फूटची घरे बांधणार!

जागा दिल्यास तत्काळ पाचशे स्क्वेअर फूटची घरे बांधणार! 

प्रतिनिधी/ चिपळूण

तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांनी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांना तत्काळ 500 स्वेअर फूट बांधकामाची घरे बांधून देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत दिली. शिवाय तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी 15 शेडच्या उभारणीला तत्काळ सुरूवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  तिवरे धरण दुर्घटनेतील बाधितांना मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री वायकर यांच्या माध्यमातून साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी बाधितांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी माहिती देताना पालकमंत्री वायकर म्हणाले, यानंतर गाव परिसरातील वाहून गेलेले साकव, पूल आणि रस्ते जेथे दुरूस्त होणारे असतील तर करा, अन्यथा नव्याने उभारा, पाणी योजना नव्याने करून घ्या, तात्पुरत्या निवासासाठी 300 स्क्वेअर फुटाच्या 15 शेड तत्काळ उभारण्याच्या कामालाही सुरूवात केली जाणार आहे. तसेच कायमस्वरूपी निवासासाठी अन्य ठिकाणच्या जागा शोधल्यास त्यामध्ये वेळ जाऊ शकतो. त्यामुळे गावातच जागा उपलब्ध झाल्यास प्रत्येकाला 500 स्क्वेअर फूट बांधकाम असलेली घरे बांधून दिली जातील. मृताच्या वारसांना शासकीय नोकरी हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुनर्वसन करताना आवश्यक सोयीसुविधा देतानाच पूर्वी जसे गाव होते तसे निर्माण करू, अशी ग्वाही दिली.

  यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सदानंद चव्हाण, प्रांताधिकारी कल्पना जगताप, तहसीलदार जीवन देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

  मृतदेहांचा शोध सुरूच

  दुर्घटनेनंतर सलग सातव्या दिवशीही दोघा बेपत्तांचा शोध घेण्याचे काम सुरूच होते. आतापर्यत 20जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, धरण बाधितांना ठिकठिकाणांहून मदतीचा ओघ सातव्या दिवशीही सुरूच आहे.