|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह दोघांना अटक

खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह दोघांना अटक 

प्रतिनिधी./ खेड

भरणे येथील नव्या जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या दोन अधिकाऱयांना पुलाला बांधल्याप्रकरणी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे या दोघांना मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. या दोघांना 10 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी अन्य एकास अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

भरणे येथील नव्या जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी व मनसेने एक तास महामार्ग रोखून धरला होता. नगराध्यक्ष खेडेकर यांच्या आक्रमकतेनंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले होते. यादरम्यान, दोन्ही अधिकाऱयांना धारेवर धरत नगराध्यक्ष खेडेकर यांच्यासह मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनी पुलाला दोरीच्या सहाय्याने बांधण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर नगराध्यक्ष खेडेकर व सहकाऱयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच रहिम सहीबोले यास सर्वप्रथम अटक करण्यात आली. यानंतर सागर कवळे, सुनील चिले, राजेश कदम, शाम मोरे, प्रमोद दाभिळकर, राजेंद्र खेडेकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या 7जणांना दोनवेळा पोलीस कोठडी ठोठावल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

नगराध्यक्ष खेडेकर, विश्वास मुधोळे, संतोष राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी  न्यायालयात अर्ज केला होता. 12 जुलैपर्यंत अटक न करण्याच्या शर्थीवर सर्वप्रथम तिघांना अंतरिम जामीन मंजूर झाला होता. मात्र अटकपूर्व जामिनावर झालेल्या सुनावणीदरम्यान नगराध्यक्ष खेडेकर व विश्वास मुधोळे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान संतोष राऊत याचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले.

दोन अधिकाऱयांना पुलाला बांधल्याच्या प्रकरणात आणखी काहीजणांचा सहभाग असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱयाचे फुटेज तसेच घटनेनंतर व्हायरल झालेले व्हीडीओ तपासण्यात येणार आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की करत आहेत. 

बाजारपेठ बंद राहणार नाही!

दरम्यान, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अटकेच्या कारवाईनंतर बुधवारी बाजारपेठ बंदचा एसएमएस सोशल मिडियावर व्हायरल झाला. मात्र नगराध्यक्ष खेडेकर यांना जनकल्याणासाठीच अटक झाली असून कुठल्याहीप्रकारे बाजारपेठ बंद राहणार नसल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट करत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणत्याहीप्रकारचे सार्वजनिक अथवा वैयक्तिक मालमत्तांचे नुकसान करू नये, असे आवाहनही एसएमएसद्वारे सोशल मिडियावर केले. मात्र नगराध्यक्ष खेडेकर यांच्या अटकेनंतर येथील एस. टी. बसस्थानक परिसरातील रिक्षा व्यावसायिकांनी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत दोन तास रिक्षा व्यवसाय बंद ठेवला.