|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोंडी टाळण्यासाठी खणआळीला हवीय ‘एकेरी’

कोंडी टाळण्यासाठी खणआळीला हवीय ‘एकेरी’ 

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच कोंडी टाळून ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना रस्त्याने सुरक्षितपणे प्रवास करता यावा, यासाठी पुन्हा एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. यामध्ये व्यापाऱयांसाठी माल लोडींग व अनलोडींगची वेळ बदलण्यात आली होती. त्याबाबत व्यापाऱयांची अडचण लक्षात घेवून पुन्हा ती पूर्वीप्रमाणे करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधडक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. मात्र, एकेरी सुरु राहणार असल्याचे त्यांनी सूचित केले असून खालच्या आणि वरच्या रस्त्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकल्यानंतर या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱया रस्त्यांची कहाणी एकेरीच्या निमित्ताने मांडत आहोत.

खणआळी, सदाशिव पेठ, मोती चौक या व्यापारी पेठा. खणआळी ही कापड व्यापारासाठी प्रसिध्द आहे. तर सदाशिव पेठेत देखील कापडाबरोबरच ज्वेलर्सची व इतर उत्पादने विक्री करणाऱया व्यापाऱयांची दुकाने आहेत. पूर्वी जुनीच घरे होती. त्याच्यातच दुकाने होती. हळूहळू जुनी घरे पडून तिथे नवीन इमारती उभ्या राहू लागल्यामुळे खणआळी व सदाशिव पेठेतील रस्ता आता थोडा मोठा झाला आहे. पूर्वी या रस्त्याने प्रवास करायचा म्हणजे मोठी कसरतच होती व आत्ताही सिझनला ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढत तेव्हा ती होतच असते.

खणआळीतील रस्ता सुमारे 20 फुटाचा आहे. सध्या येथे सम-विषम पार्किंग असते. त्यामुळे गाडय़ा पार्क केल्यानंतर 15 फुटांचा रस्ता उरतो त्यातून वाहतूक सुरु असते. एकेरी वाहतुकीस येथील व्यापाऱयांचा जाणवला नाही. वाहतूक सुरळीत रहावी व ग्राहकांना कोंडीचा त्रास होवू नये ही येथील व्यापाऱयांची भावना आहे. त्यामुळेच मग जेव्हा रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करण्याची कारवाई नगरपालिका करु लागली तेव्हा काही व्यापाऱयांनी स्वतःहून ही रस्त्यावर होणारी अतिक्रमणे काढली आहेत. त्यामुळे मुळात अपुरा असणारा रस्ता थोडा प्रशस्त झाला आहे. एकेरी वाहतुकीस व्यापाऱयांचा विरोध अशी आवई उठवली जात असली तरी खणआळी, सदाशिव पेठेत एकेरीस विरोध असल्याच्या फार प्रतिक्रिया नव्हत्या.

खणआळीतही एकेरीची गरज

शहरातील दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरु केल्यानंतर खणआळीत खालच्या रस्त्याने सम्राट चौकातून वरच्या रस्त्याकडे येण्यास वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी टळत होती.

ज्यावेळी ग्राहकांची गर्दी जास्त होते तेव्हा किरकोळ कोंडीचा प्रकार घडतो मात्र तेवढे सातारकर सहन करतात. सध्या एकेरी वाहतूक सुरु करण्यात आल्यानंतर खणआळीत दुहेरी वाहतूक सुरु आहे. ती पूवीप्रमाणे एकेरीच ठेवण्याची गरज व्यापाऱयांनी व्यक्त केली. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळता येवू शकते.

किरकोळ विक्रेत्यांचा रस्त्यावर वावर

खणआळी, सदाशिवपेठेत किरकोळ विक्रेत्यांचा रस्त्यावरील वावर वाहतुकीस अडचणीचा ठरतो. विक्रेत्यांना पर्यायी जागा देवून त्यांना रस्त्यावरुन हटवण्याची गरज आहे. दोन्ही बाजूला गाडा लावून विक्री करणारे गाडे पालिका प्रशासन व वाहतूक शाखेच्या नजरेतून कसे काय सुटतात हा प्रश्न व्यापाऱयांना पडलाय.