|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातेवाडीच्या ‘त्या’ बंधाऱयाची तातडीने दुरुस्ती करा

सातेवाडीच्या ‘त्या’ बंधाऱयाची तातडीने दुरुस्ती करा 

प्रतिनिधी/ वडूज

सातेवाडी (ता. खटाव) येथील गाव ओढय़ावरील बांधण्यात आलेल्या त्या दोन निकृष्ट बंधाऱयांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, सातेवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेतून सन 2016-17 मध्ये गांव ओढय़ावर श्री. साळुंखे व श्री. गोसावी तसेच श्री. रोमन व श्री. गोसावी यांच्याकडेला दोन बंधारे झाले आहेत. या बंधाऱयांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे एका वर्षाच्या आत त्यास भेगा पडल्या आहेत. तसेच काही ठिकाणचे प्लास्टर गळून पडून खडी उघडय़ावर आली आहे. या प्रकारामुळे बंधाऱयात पाणी साचू शकणार नाही. तसेच एखादा मोठा पूर आल्यास संपूर्ण बंधारा वाहून जावू शकतो. तसे झाल्यास शेतकऱयांची हानी होण्याबरोबरच एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. या निवेदनावर जेष्ठ कार्यकर्ते अशोकराव फडतरे, सरपंच हणमंतराव बोटे, अधिकराव बोटे यांच्या सह्या आहेत.

 निवेदन देवून आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी कृषी खात्याकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याबद्दल ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसात कारवाई नाही झाली तर खोलात जावून चौकशी करण्याबरोबर प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी निवेदन आले आहे, असे सांगितले.