|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोव्यातील कृषी उपक्रम कितपत यशस्वी?

गोव्यातील कृषी उपक्रम कितपत यशस्वी? 

शेतकऱयांना शेतीकडे वळविण्याच्यादृष्टीने व गोव्यात खऱया अर्थाने हरितक्रांती अवतरण्यासाठी आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच सर्वांचे सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. कृषिमंत्री सरदेसाई यांच्या घोषणेची अंमलबजावणी कितपत होते, हे आता पहावे लागेल.

 

शेतकऱयांना चांगल्याप्रकारे शेती करता यावी, यासाठी त्यांना बिनव्याजी कर्ज पुरविण्याची योजना राबविण्याचा कृषी खात्याचा विचार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी नुकतीच सांगे येथील विभागीय कृषी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केली. आजपर्यंत गोव्यातील शेतकऱयांना अनेक सवलतींचे गाजर दाखविण्यात येते. तसेच अनेक कृषी मेळावेही झालेले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या योजनांमुळे म्हणा किंवा कृषी मेळाव्यातून गोव्यातील शेतकरी शेतीबद्दल कितपत सकारात्मक आहे, हा संशोधनाचा विषय आहे. आज अनेक शेतकऱयांनी जमिनी पडीक ठेवून परवडत नसल्याचे निमित्त करून शेतीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शेतकऱयांना शेतीकडे वळविण्याच्यादृष्टीने व गोव्यात खऱया अर्थाने हरितक्रांती अवतरण्यासाठी आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच सर्वांचे सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. कृषिमंत्री सरदेसाई यांच्या घोषणेची अंमलबजावणी कितपत होते, हे आता पहावे लागेल. 

राज्यात कृषी क्रांतीसाठी नाबार्डसारखी संस्था पुढे येते, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. गोव्यामध्ये सामूहिक शेतीचे प्रयोग व्हावेत यासाठी नाबार्डसारखी संस्था शेतकऱयांना आर्थिक पाठबळ देण्यास पुढे सरसावली आहे. सत्तरी तालुक्यातील म्हाऊस पंचायत क्षेत्रात तसेच काणकोण तालुक्यात अशाप्रकारचे प्रयोग यशस्वी करण्यासाठी शेतकरीवर्ग पुढे सरसावला आहे. गोव्यातील अन्य तालुक्यांनीही नाबार्ड संस्थेच्या आर्थिक साहाय्यातून अशा प्रकारचे प्रयोग हाती घेऊन गोव्यात कृषी क्रांती निर्माण करण्याच्यादृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे.

पाण्याअभावी काहींनी शेतीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यामुळे पाण्याचे व्यवस्थापनही शेतीच्या प्रगतीच्यादृष्टीने केंद्रस्थानी असणारी बाब आहे, हे लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा शास्त्रीय दृष्टीने तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावा. यंदा पाऊसही समाधानकारक असून गोमंतकियांचा कल शेतीकडे झुकेल, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. शेतीत पाणी वापरताना आधुनिक दृष्टी ठेवणे व नव्या तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्वक वापर करणे महत्त्वाचे आहे. जलसंवर्धन करण्यासाठी गोवा सरकारने ठिकठिकाणी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबवावा, अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या आवाहनाला अनुसरून गोव्यातील सर्व ग्रामपंचायतींनी खास ग्रामसभा घेतलेल्या आहेत व गावातील पाणी संवर्धनाच्यादृष्टीने आवाहन केलेले आहे. जलयुक्त अभियानाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’मध्येही मांडला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्याच्यादृष्टीने जलसंवर्धन महत्त्वाचे आहे. एकीकडे शेतीचा विचार चालू असतानाच शेती वाचविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन, जलसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे.

इस्त्रायल हा शेतीच्या बाबतीत खूप पुढे गेलेला देश आहे. तेथे पाण्याची नासाडी होत नाही तर ते फेरप्रक्रिया करून वापरले जाते. तेथे जलसिंचनाच्या बाबतीत प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. गोव्यातील कृषिक्षेत्रात इस्त्रायलचा मॉडेल वापरता येतो. इस्त्रायलचे काही तज्ञ ऑगस्ट महिन्यात गोव्यात येणार असून पाणी वितरणासंदर्भात ते प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. याचा गोव्यातील शेतकऱयांनी जास्तीत जास्त लाभ घेणे आवश्यक आहे.

खाण व्यवसाय हा गोवा राज्याचा कणा होता मात्र हा व्यवसाय संकटात आल्यामुळे काही खाणसंबंधित घटकांनी आपला ओढा कृषी क्षेत्राकडे वळविला आहे. हरितक्रांतीचे त्यांचे स्वप्न खऱया अर्थाने पूर्ण होण्यासाठी कृषी संचालनालयाकडून त्यांना आवश्यक ते पाठबळ लाभणे आवश्यक आहे. आज-काल कृषी मेळावे घेऊन तसेच विविध योजनांची घोषणा करून जागृती होणे कठीण असून गोवा राज्य कृषी व्यवसायात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शेतकऱयांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. आज गोवा राज्याची मदार केवळ पर्यटनावरच अवलंबून असून पर्यटनासंबंधित व्यवसायही डबघाईस आलेले आहेत. त्यामुळे युवकांनी आज कृषी क्षेत्राशी निगडित पशुपालन, दूध उत्पादनात रस घेऊन स्वत:बरोबरच समाजाचा विकास घडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. एकीकडे गोवा सरकार शेतकऱयांसाठी विविध योजना जाहीर करीत आहे तर दुसरीकडे योजनांचा बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे. ऑर्किड शेतीच्या हव्यासापायी काणकोण, सांगे व केपे तालुक्यातील अनेक शेतकऱयांची फसगत झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या शेतकऱयांची बाजू ऐकून घेऊन योग्य तोडगा काढण्यासाठी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. दुसऱया बाजूने गोवा डेअरी सध्या विविध आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. गोवा डेअरीमधील भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन, शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी दोघा शेतकऱयांचे सध्या गोवा डेअरीसमोर आमरण उपोषण सुरू आहे.  

पूर्वीच्या काळात उच्च-शेती, मध्यम उद्योग व कनिष्ठ नोकरी असे चित्र होते परंतु आता उच्च नोकरी, मध्यम उद्योग व कनिष्ठ शेती असे चित्र आहे. आता हलक्या, कष्टकरी कामाकडे गोमंतकीयांचा ओढा कमी होत आहे. गोमंतकीय आजकाल शेतीकडे पाठ फिरवत असून आजच्या युवकांचा कल पांढरपेशा सरकारी नोकरीकडे आहे. आज गोव्यात शेतजमिनीवर मोठमोठय़ा इमारती, राहण्यासाठी घरे बांधली जात असल्याने शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जास्तीत जास्त शेती कसली जावी, यासाठी कृषी संचालनालयाने सध्या पावले उचलणे आवश्यक आहे.

गोव्यात शेतीविषयक जागृती करण्याच्यादृष्टीने संबंधितांकडून प्रयत्न होत आहेत. गोव्यातील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कृषी विषयक ज्ञान प्राप्त व्हावे, या हेतूने गोव्यातील काही विद्यालयांनी शिक्षकांसह आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन शेत बांधावर शाळा भरवल्या आहेत. शेत नांगरणी, पेरणी याची प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांकडून करवून घेतली आहेत. या उपक्रमाबद्दल या विद्यालयाचे तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱया माध्यान्ह आहाराला आणखी एक जोड देत विद्यार्थ्यांना पौष्टिक भाज्या शाळेतच उत्पादित करण्यासाठी उद्याने उभारण्याचा गोव्यातील शिक्षण खात्याचा विचार आहे.   यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्यही पुरविण्यात येणार आहे. शेतीविषयी सध्याच्या पिढीमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी तसेच कृषी विषयक जागृती निर्माण करण्यासाठी विद्यालयांचे हे प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहेत. अशाप्रकारचे उपक्रम अन्य स्वयंसेवी संस्थांनीही राबवावे.

कृषी व्यवसायात चांगले भवितव्य आहे, अशी भावना ‘गोंयकारां’मध्ये निर्माण करणे तसेच शेतकऱयांनी आपल्या जमिनी राखून ठेवणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱयांनी हरितक्रांती घडवावी. गोमंतकीय युवकांनीही शेतीत काम करणे कमीपणाचे न मानता अभिमान बाळगून या व्यवसायात मजल मारून जास्तीत जास्त पिके घ्यावीत. शेती व्यवसायामध्ये गोवा राज्य आदर्श बनविण्यासाठी व गोव्यात हरितक्रांती आणण्यासाठी सर्वांनी कंबर कसणे, काळाची गरज आहे.

राजेश परब

Related posts: