|Friday, October 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पोहे प्रेम का रोग लगाये गयो

पोहे प्रेम का रोग लगाये गयो 

कांदेपोहे म्हटलं की आमच्या पिढीतल्या लग्नाळू मुलांना गुदगुल्या व्हायच्या. लग्नाळू मुली लाजायच्या. मुले ‘मुली बघायला’ जात. सलज्ज मुलगी पोहय़ांच्या बशा घेऊन बैठकीच्या खोलीत येई. आधी वडीलधाऱयांना आणि शेवटी लग्नाळू मुलाला बशी देई. पोहे मुलीच्या आईने केलेले असत, परंतु मुलीने केले आहेत असे ठासून सांगितले जाई. पूर्वीच्या मुलींना पोहे बनवणे ग्रेस वगैरे मोठय़ा कवींची कविता समजून घेण्याइतके कठीण वाटत असेल. पण पोहे करणे आनंद बक्षी यांची गाणी समजावून घेण्याइतके सोपे आहे. काळाच्या ओघात मुलगी बघणे, कांदेपोहे खाणे कमी झाले. पण आजही न्याहारीकरांना पोहे प्रिय आहेतच. मिसळीने कितीही रूबब केला तरी पोहय़ांशिवाय तिचे पान हलत नाही किंवा तिची प्लेट हलत नाही! मराठी मुलखाबाहेर देखील पोहय़ांची मुलुखगिरी दिसतेच.

ऐंशीच्या दशकात पुण्याहून इंदौरला जाण्यासाठी फक्त लालपरी किंवा खाजगी बसेस होत्या. संध्याकाळी सहाच्या सुमाराला बसेस निघत. रात्री नऊ-दहाच्या दरम्यान अहमदनगरला जेवणासाठी थांबत. मग रात्रीचा अंधार कापीत चलो इंदौर. खिडकीतून बाहेरचे काही दिसत नसे. नुसता सूं सूं वारा. मुंबई-आग्रा महामार्ग खूप सुनसान होता. आकाश गुलाबीसर होऊ लागले की सैंधवा गाव येई. बसमधून उतरलो की ‘पोवा! पोवा!’ अशा आरोळय़ा… मोठय़ा ताटात पिवळा धम्मक पोहय़ांचा ढीग. त्यात सजावट म्हणून खोचलेल्या हिरव्या मिरच्या आणि गुलाब. मध्य प्रदेशात सगळीकडे फोडणीत मोहरीऐवजी जिरे-बडीशेप आणि अख्खे शेंगदाणे घातलेले पोहे मिळत. आजही घरी पोहे असे बनवून खाल्ले की सासुरवाडी स्मरते. देवास आणि उज्जैन इथे बायकोच्या भावंडांच्या, मैत्रिणींच्या घरी पोहे आणि तोंडी लावायला लोणची-तळलेले पापड आठवतात. मन कातर होते.

नव्वदच्या दशकात पोहय़ांसह सांबार आणि चटणी मिळू लागली. हे म्हणजे साध्यासुध्या मुलीला फिरायला नेताना सक्काळी सक्मकाळी ब्रायडल मेकअप करण्यासारखे आहे. पण ती प्रथा पडून गेली. उत्तर महाराष्ट्रात चना पोहे लोकप्रिय आहेत. पुण्यात केईएम रुग्णालयाच्या कँन्टिनमध्ये सुंदर आणि सात्त्विक पोहे मिळतात. पण तिथे मिसळदेखील मिळते. एकदा पोहे आणि मिसळीची भाजी घेतली. पांढऱया वाटाण्यांची-चण्यांची लालजर्द तिखट उसळ आणि पोहे यांचा संकर…. आम्हा तो संकर सुखकर जाला!