|Sunday, October 20, 2019
You are here: Home » क्रिडा » स्वप्न भंगले, भारताचे आव्हान संपुष्टात

स्वप्न भंगले, भारताचे आव्हान संपुष्टात 

विवेक कुलकर्णी/ मँचेस्टर

रवींद्र जडेजा (59 चेंडूत 77) व महेंद्रसिंग धोनी (72 चेंडूत 50) यांच्या 116 धावांच्या शतकी भागीदारीला शेवटच्या क्षणी सुरुंग लागल्यानंतर आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत भारताला न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सलग दुसऱया दिवशी चाललेल्या या लढतीत न्यूझीलंडने 8 बाद 239 धावा केल्या तर प्रत्युत्तरात भारताचा डाव 49.3 षटकात 221 धावांतच आटोपला.

विजयासाठी 240 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा (1), केएल राहुल (1) व विराट कोहली (1) हे आघाडीचे तिघेही फलंदाज प्रत्येकी एका धावेवर बाद झाले आणि इथेच भारताच्या पराभवाची पहिली झलक दिसून आली.

चेंडू बऱयापैकी स्विंग होत असताना किवीज जलद गोलंदाज हेन्रीने त्याचा लाभ उठवला. केएल राहुल व रोहित शर्मा यांनी निराशा केली तर विराटही आल्या पावलीच परतल्यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला. चौथ्या स्थानावर ऋषभ पंतने 56 चेंडूत 32 धावा जमवल्या. मात्र, पाचव्या स्थानावर दिनेश कार्तिक अवघ्या 6 धावांवर बाद झाला तर हार्दिक पंडय़ाने 62 चेंडूत 32 धावा जमवल्या.

त्यानंतर धोनी व जडेजा यांनी या सामन्यात रंग भरला. धोनीने गुप्टीलच्या थेट थ्रोवर धावचीत होण्यापूर्वी 72 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी साकारली तर जडेजाने 59 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 77 धावांची खेळी साकारत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. अर्धशतक साजरे केल्यानंतर त्याने आपली बॅट तर हवेत गोलाकार फिरवलीच. पण, आपल्यावर टीका करणाऱया समालोचक कक्षेच्या दिशेनेही अंगुलीनिर्देश केला.

वास्तविक, हार्दिक पंडय़ा बाद झाल्यानंतर भारताची 6 बाद 92 अशी बिकट स्थिती होती. यावेळी जडेजा व धोनी यांनी सातव्या गडय़ासाठी 116 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारत न्यूझीलंडच्या तोंडचे पाणी पळवले होते. अर्थात, शेवटच्या काही षटकात धावगती आटोक्याबाहेर जात राहिली आणि त्यानंतर धोनी व जडेजा यांना काही धोके स्वीकारण्याशिवाय पर्यायच नव्हता. जडेजा उत्तूंग फटका लगावण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला तर धोनीला धोकादायक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना गुप्टीलच्या थेट थ्रोमुळे धावचीत होऊन परतावे लागले.

धोनी बाद झाला, त्यावेळी भारताच्या 48.3 षटकात 8 बाद 216 धावा झाल्या होत्या. त्यानंतर उर्वरित दोन फलंदाजांना यात जेमतेम 5 धावांची भर घालता आली. किवीज संघातर्फे ट्रेंट बोल्टने 10 षटकात 42 धावात 2 तर हेन्रीने 10 षटकात 37 धावात 3 बळी घेतले. न्यूझीलंड संघाचे अव्वल दर्जाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण हे या सामन्याचे ठळक वैशिष्टय़ ठरले.

जडेजाची बॅट तळपली, पण…..

डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजाने आठव्या स्थानी फलंदाजीला उतरत 59 चेंडूतच 4 चौकार व 4 षटकारांसह 77 धावांची आतषबाजी केली. पण, धावगती आटोक्याबाहेर जात असताना जडेजाचा एक उत्तूंग फटका फसला आणि त्याची खेळीही संपुष्टात आली. बोल्टच्या चेंडूवर जडेजाने लाँगऑफकडे फटका लगावला. मात्र, विल्यम्सनने सोपा झेल टिपला आणि जडेजाची महत्त्वाकांक्षी खेळी संपुष्टात आली. आघाडीचे तिन्ही फलंदाज प्रत्येकी एका धावेवर बाद झाले असताना आठव्या स्थानावर जडेजाने फटकावलेल्या 77 धावा भारतासाठी आश्वासक ठरल्या. अंतिमतः अपयश पदरी आल्याने त्याची ही खेळी संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकली नाही.

थेट थ्रोवर धोनी धावबादआणि उरल्यासुरल्या आशा संपुष्टात!

2011 च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत धुवांधार खेळी साकारणाऱया धोनीकडून येथील उपांत्य लढतीतही त्याच प्रकारच्या धमाकेदार खेळीची अपेक्षा होती आणि त्या दिशेने धोनीची निर्णायक टप्प्यात आगेकूचही सुरु होती. पण, फर्ग्युसनच्या 49 व्या षटकात स्क्वेअरकडे फटका लगावत दुहेरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात  किंचीत चूक झाली आणि गुप्टीलने विद्युतवेगाने यष्टीचा थेट वेध घेतला. धोनी यावेळी अगदी किंचीत फरकाने क्रीझबाहेर होता आणि त्याची ही अर्धशतकी झुंज अर्ध्यावरच संपुष्टात आली.

 

विराटची कबुली…पहिल्या 40 मिनिटातील खराब खेळामुळे आम्ही बाहेर

विजयासाठी 240 धावांचे आव्हान असताना पहिल्या 40 मिनिटात आम्ही अतिशय खराब खेळलो आणि या खराब खेळामुळेच आमचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, अशी कबुली भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिली. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या उपांत्य लढतीत 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता.

भारताने येथे पहिल्या 33 मिनिटातच 3 फलंदाज गमावले होते. केएल राहुल 18 मिनिटे खेळला, रोहित शर्मा 7 मिनिटेच खेळपट्टीवर राहिला तर दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहलीही आपल्या आठव्या मिनिटालाच बाद झाला होता. ‘आमच्यापेक्षा न्यूझीलंडच्या संघाने दडपण अधिक उत्तम प्रकारे हाताळले, हा देखील या सामन्यातील महत्त्वाचा फरक ठरला’, असे निरीक्षण विराटने नोंदवले. याशिवाय, त्याने जडेजा व धोनीच्या शतकी भागीदारीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

तो म्हणाला, ‘पहिल्या दिवशी आम्ही उत्तम क्रिकेट साकारले होते. त्या पूर्ण दिवसावर आमचे बऱयापैकी वर्चस्व प्रस्थापित झाले होते. तेच सातत्य येथे कायम राखायचे होते. पण, किवीज गोलंदाजांनी अतिशय भेदक मारा साकारला आणि आम्हाला दडपण हाताळण्यात अपयश आले. आमच्या काही फलंदाजांची खराब फटक्यांची निवड फटका देणारी ठरली. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत बाद फेरीत अशा बाबी चिंतेच्या ठरतात’.

धावफलक

न्यूझीलंड : मार्टिन गुप्टील झे. कोहली, गो. बुमराह 1 (14 चेंडू), हेन्री निकोल्स त्रि. गो. जडेजा 28 (51 चेंडूत 2 चौकार), केन विल्यम्सन झे. जडेजा, गो. चहल 67 (95 चेंडूत 6 चौकार), रॉस टेलर धावचीत (जडेजा) 74 (90 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), जिम्मी नीशम झे. कार्तिक, गो. पंडय़ा 12 (18 चेंडूत 1 चौकार), कॉलिन डे ग्रँडहोम झे. धोनी, गो. भुवनेश्वर कुमार 16 (10 चेंडूत 2 चौकार), टॉम लॅथम झे. जडेजा, गो. कुमार 10 (11 चेंडू), सॅन्टनर नाबाद 9 (6 चेंडूत 1 चौकार), मॅट हेन्री झे. कोहली, गो. कुमार 1 (2 चेंडू), ट्रेंट बोल्ट नाबाद 3 (3 चेंडू). अवांतर 18. एकूण 50 षटकात 8 बाद 239.

गडी बाद होण्याचा क्रम

1-1 (मार्टिन गुप्टील, 3.3), 2-69 (हेन्री निकोल्स, 18.2), 3-134 (केन विल्यम्सन, 35.2), 4-162 (जेम्स नीशम, 40.6), 5-200 (कॉलिन डे ग्रँडहोम, 44.4), 6-225 (रॉस टेलर, 47.6), 7-225 (लॅथम, 48.1), 8-232 (हेन्री, 48.6)

गोलंदाजी

भुवनेश्वर कुमार 10-1-43-3, जसप्रित बुमराह 10-1-39-1, हार्दिक पंडय़ा 10-0-55-1, रवींद्र जडेजा 10-0-34-1, यजुवेंद्र चहल 10-0-63-1.

भारत : केएल राहुल झे. लॅथम, गो. हेन्री 1 (7 चेंडू), रोहित शर्मा झे. लॅथम, गो. हेन्री 1 (4 चेंडू), विराट कोहली पायचीत गो. बोल्ट 1 (6 चेंडू), ऋषभ पंत झे. ग्रँडहोम, गो. सॅन्टनर 32 (56 चेंडूत 4 चौकार), दिनेश कार्तिक झे. नीशम, गो. हेन्री 6 (25 चेंडूत 1 चौकार), हार्दिक पंडय़ा झे. विल्यम्सन, गो. सॅन्टनर 32 (62), धोनी धावचीत गुप्टील 50 (72 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रवींद्र जडेजा झे. विल्यम्सन, गो. बोल्ट 77 (59 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), भुवनेश्वर कुमार त्रि. गो. फर्ग्युसन 0 (1 चेंडू), यजुवेंद्र चहल झे. लॅथम, गो. नीशम 5 (5 चेंडू), जसप्रित बुमराह नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 16. एकूण 49.3 षटकात सर्वबाद 221.

गडी बाद होण्याचा क्रम

1-4 (रोहित शर्मा, 1.3), 2-5 (विराट, 2.4), 3-5 (केएल राहुल, 3.1), 4-24 (दिनेश कार्तिक, 9.6), 5-71 (ऋषभ पंत, 22.5), 6-92 (पंडय़ा, 30.3), 7-208 (जडेजा, 47.5), 8-216 (धोनी, 48.3), 9-217 (भुवनेश्वर, 48.6), 10-221.

गोलंदाजी

ट्रेंट बोल्ट 10-2-42-2, मॅट हेन्री 10-1-37-3, लॉकी फर्ग्युसन 10-0-43-1, कॉलिन ग्रँडहोम 2-0-13-0, जेम्स नीशम 7.3-0-49-1, सॅन्टनर 10-2-34-2.