|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पाचगाव रस्त्यावरील बंद बंगला फोडला

पाचगाव रस्त्यावरील बंद बंगला फोडला 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

येथील शाहू कॉलनीमधील बालाजी पार्काशेजारील बंद बंगला चोरटय़ांनी फोडला. सीसीटीव्हीची तोडफोड करत पाच बेडरूममधील सात तिजोऱया फोडून चार तोळे सोन्याचे दागिने आणि 53 हजारांची रोकड लंपास केली. बंगल्यामध्ये लावलेली नवीन कारदेखील पळवून नेली. दरम्यान, पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

                      पाच बेडरूममधील सात तिजोऱया फोडल्या!

ध्यानचंद हॉकी स्टेडीयम चौक ते पाचगाव रस्त्यावरील शाहू कॉलनीमधील बालाजी पार्कच्या मुख्य रोडलगत निखिल मुळे यांचा बंगला आहे. ते उद्यमनगरातील  कारखान्यात नोकरी करतात. ते आणि त्यांची आई उर्मिला हे दोघेच बंगल्यात राहतात. निखिल शनिवारी रात्री सोलापूराला कामानिमित्त गेले होते. त्यांची आई उर्मिला जुना बुधवार पेठेतील भाऊ संजय आयरे यांच्याकडे गेल्या होत्या. बंद बंगल्याच्या मुख्य लोखंडी गेटचे कुलुप तोडले. बंगल्याच्या बाहेर लावलेले सहा सीसीटीव्ही पॅमेऱयांची मोडतोड केली.  मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. पाच बेडरुममधील सात तिजोऱया फोडल्या. चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, 53 हजारांची रोकड, सीसीटीव्ही पॅमेरा डिव्हीआर असा लाखो रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला. य्चोरटय़ांच्या हाती किचन हॉलमध्ये बंगल्यातील नवीन चार चाकी गाडीची चावी लागली. चोरटय़ांनी याच कारमधून पोबारा केला. सोमवारी पहाटे निखिल घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  जुना राजवाडा पोलीस  ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, शाहुपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक सवंत बाबर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आदी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्यासह पोलीस कर्मचारांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली.  ठस्से तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. श्वान बंगल्यापासून रामानंदनगरकडे जाणाऱया रस्त्यापर्यत जावून घुटमळले. चोरटे रामानंदनगर मार्गे निघून गेले असावेत या शक्यतेने पोलिसांनी या मार्गावरीलसह शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱयाची तपासणी सुरू केली आहे.